तुजविण मागु कुणाला साथ...!


 तुजविण मागु कुणाला साथ...!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 13/09/2025 : जीवनातील एका अंतिम सत्याकडे लक्ष वेधले की, जीवनात कितीही नातेगोते, लोक सोबत असले तरी जेव्हा मृत्यूचा काळ येतो तेव्हा त्या व्यक्तीला एकटेच जावे लागते. त्यावेळी कुणीही साथ देत नाही. "नाही रे नाही कुणाचे कोणी, अंती जाईल एकटाच माझे माझे म्हणूनी" गुरुच्या मार्गदर्शना शिवाय जीवनातील संकटातून पार पडणे शक्य नाही. थोडक्यात गुरु हा अंधकार दूर करुन प्रकाशाकडे नेणारा आणि  जीवनाचा मार्ग दाखविणारा असतो. यशाच्या दिशेने स्वतःलाच चालावे लागते. जसे- नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आत मधील अमृताचा आस्वाद घेता येत नाही. "सारी दुनियाका तूही करणधार है, बिना तेरे ना किसीको लगापार है" ईश्वर हाच आपला पालक आहे. तो संपूर्ण विश्वाचा कर्णधार आहे. जर त्याचे नाम मुखी घेतले तर तोच कठिण भवसागर पार करून नेतो. कुणाची साथ नसली तरी देवाची साथ असते.

सगळे सोडुनी देतील हात ।

तुजविण मागु कुणाला साथ ।।धृ।।

    सगळे लोक मला सोडून जातील. हे ईश्वरा तुझ्याशिवाय मी कोणाकडे आधार मागू? व्यक्तीची ईश्वरावरची किंवा गुरुदेवावरची अटळ श्रद्धा दिसून येते. ईश्वराशिवाय असहाय्यतेची भावना येथे व्यक्त होते. आपले सर्व मित्र, गणगोत किंवा जगातले कोणीही जेव्हा अत्यंत कठीण प्रसंग येईल तेव्हा साथ सोडून जातील. ते मदत करायला पुढे येणार नाही म्हणूनच "आपला तो एक देव करुनी घ्यावा, तेणेविण जीवा सुख नव्हे" ईश्वर भक्ती करा. तेच शेवटी आपल्या सोबत येईल.

परलोकांचा मार्ग दुजाला, नच ठावा गुरुविण कुणाला "

सारेचि कोणी न परके येतील, न्याया प्रभु सदनात ।।१।।

   परलोकांचा मार्ग दुसऱ्याला कळत नाही, त्याचा ठाव ठिकाणा गुरुशिवाय कळणार नाही. हा परलोकांचा मार्ग मोक्ष किंवा मुक्तीचा मार्ग दर्शवितो. जो जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आध्यात्मिक प्रगती साधनेने आत्म्याला आनंद, शक्ती, ज्ञानाचा अनुभव मिळवून संसारातून मुक्त करणे होय. परलोकांचा मार्ग हा जीवनातील दुःख आणि बंधन झुगारून आत्म्याच्या पूर्ण स्वातंत्र्याकडे नेणारा आध्यात्मिक मार्ग आहे. "गुरुबिन कौन बतावे बाट, बडा कठिण यमघाट" संत कबिरांचा हा दोहा आहे. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो. गुरुशिवाय तरणोपाय नाही. तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बनणे म्हणजे गुरुला, संताला आवडेल तेच वर्तन करणे होय.

   या मार्गाने सर्वच किंवा कुणी परके अनोळखी, अपरिचित येतील असे काही नाही. प्रभु सदन म्हणजे प्रभुचे निवासस्थान किंवा ईश्वराचे घरी कुणी आपल्या सोबत येणार नाही. "जाऊ देवाचिया गांवा, घेऊ तेथेची विसावा" देवाच्या घरी गेल्यावर संसार बंधनातून मुक्त होऊन विसावा मिळेल असे संत तुकाराम महाराज म्हणतात. आपल्याला देवाचे घरी मुळीच जावे वाटत नाही पण देव आपले घरी यावा असे सर्वांना वाटत असते. ज्यांच्यासाठी कुणी नाही त्यांच्यासाठी देव आहे. देवाचे गांवाला जायचे असेल तर आपल्या हृदयात नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा, तेव्हा कुठे मुक्ती मिळेल.

कासाविस जव प्राण करील हा, केविलवाणा तुला स्मरील हा ।

तुकड्यादासा तुझा भरवसा, घेशील ना पदरात?।।२।।

     जेव्हा आपला प्राण ओढून नेईल तेव्हा जीव कासावीस होतो. जीव कासावीस होणे म्हणजे प्राण कंठाशी येणे. प्राण म्हणजे जीवनशक्ती ती शरीरात वाहणारी, मन नियंत्रित करणारी सूक्ष्म ऊर्जा आहे. केविलवाना म्हणजे दयेस पात्र, असहाय्य, दुबळा, दयनिय स्थिती. सहानुभूती मिळविण्यासाठी केविलवाणे वाटते. मरणाचे समयाला ईश्वराचे स्मरण केविलवाणा व्यक्ती करीत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "मरणाचे संकटाला नच कोणी आपुले, देशील ना साथ तै तू, शिरी धरुनी कर भले" मृत्यूच्या संकटात, कठीण प्रसंगी सोयरे, मित्र कोणीही साथ देत नाही. आपणांस ईश्वराचे चिंतन करीत, स्मरण करीत सामोरे जावे लागते.

         राष्ट्रसंत म्हणतात, हे गुरुदेवा, परमेश्वरा तुझा भरवसा मला आहे. तुझ्या शिवाय माझा कुणीच आधार नाही कारण या जगात स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. येथे भगवंतावर पूर्णपणे विसंबून राहण्याचा आणि त्याच्या चरणी सर्वस्व अर्पण करण्याचा भाव व्यक्त होत आहे. हे परमेश्वरा मला पदरात घेशील काय? देवा माझ्यावर कृपेची आणि मायेची पाखर घालणार का? मला तुझ्या आश्रयाखाली घेणार का? देवावर भरवसा, विश्वास, भाव असेल तर तो आपल्याला संकटातून वाचवेल आणि सर्व परिस्थितीत तोच आपला आधार बनेल.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर

श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- ९९२१७९१६७७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या