शेतकऱ्यांनो, चला आपण सारे एकत्र येऊया!

 

शेतकऱ्यांनो, चला आपण सारे एकत्र येऊया! 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 02/09/2025 : भारतभरातील लाखो शेतकरी, कामगार, कष्टकरी बांधवांनो—आज आपण एका अशा महापुरुषाची आठवण करत आहोत ज्यांनी शेतकऱ्यांच्या आवाजाला नवी दिशा दिली. पंचप्राण ऋध्देय युगपुरुष शरद जोशी यांची ९० वी जयंती हा केवळ एक दिनांक नाही, तर ही आपल्या अस्तित्वाची, आपल्या संघर्षाची, आपल्या शेतमजुरांच्या घामाच्या किमतीची आठवण करून देणारी एक पवित्र पर्वणी आहे.

शरद जोशींनी शिकवले की शेतकरी हा केवळ उत्पादन करणारा नाही, तर तो राष्ट्रनिर्मितीचा कणा आहे. त्यांचा विचार, त्यांचा संघर्ष, त्यांची स्वप्ने—हे सगळे आपल्या रक्तामध्ये मिसळलेले आहेत. म्हणूनच या जयंतीदिनी आपण प्रत्येकाने आपल्या घराघरात हा आदर, ही आठवण आणि हा संकल्प जागवणे गरजेचे आहे.

आपल्या घरी, आपल्या अंगणात, आपल्या कुटुंबासोबत युगपुरुष शरद जोशी यांचा फोटो लावून आपण त्यांच्या ९० व्या जयंतीचे औचित्य साधा. त्यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, फुलांचा हार अर्पण करा आणि क्षणभर डोळे मिटून त्या महापुरुषाचे विचार मनात रुजवा. हीच खरी त्यांना वाहिलेली आदरांजली ठरेल.

आज शेतकरी संकटात आहे. कधी कर्जाच्या जंजाळात, कधी भावाच्या तडजोडीत, कधी हवामानाच्या अन्यायात—पण या सगळ्यातूनही आपला आत्मविश्वास जगतो कारण आपल्याला शरद जोशीसारख्या नायकांनी लढायला शिकवले आहे. म्हणूनच या जयंतीतून आपण ठरवूया की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कधीही तडजोड होणार नाही. आपल्या हक्कासाठी, आपल्या किमतीसाठी, आपल्या सन्मानासाठी आपण लढत राहू.

आपण जयंती साजरी करून त्या क्षणाचे छायाचित्र माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर अथवा ९४२२५१७०४४ / ८४२१०६११६४ या क्रमांकावर जरूर पाठवा. ह्या प्रत्येक छायाचित्रात केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण शेतकरी समाजाचा आवाज उमटेल.

प्रिय शेतकरी बांधवांनो, हा उत्सव तुमच्या-आमच्या मनांचा आहे. यातून संघटनेची ताकद वाढेल, विचारांना नवा उभारी मिळेल आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपण संघर्षाचा वारसा जपून ठेवू.

माझ्या आयुष्याचा एकच ध्यास आहे—शेतकऱ्यांचा सन्मान! आणि माझे हृदय सदैव या मातीत राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. युगपुरुष शरद जोशींच्या विचारांची मशाल मी तुमच्या हातात सोपवत आहे. चला, आपण सारे मिळून ही मशाल पेटवूया आणि शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी अखंड लढूया.

आपल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि या लढ्यातील सहकार्याचा मी ऋणी आहे.


किसान सेवक,

विठ्ठल राजे पवार

अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक

शरदजोशी विचारमंच – शेतकरी कामगार एम. एस. फाउंडेशन,

शेतकरी संघटना महासंघ, नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या