🟩अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्ताराला गती: १०० खाटांच्या नवीन इमारतीसाठी शासकीय जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय

🟩अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्ताराला गती: १०० खाटांच्या नवीन इमारतीसाठी शासकीय जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 16/09/2025 : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण आणि अथक पाठपुराव्यामुळे शासनाने रुग्णालयाच्या नवीन १०० खाटांच्या इमारतीसाठी अकलूज येथील गट क्रमांक ८४/६/२/ब, क्षेत्रफळ ० हेक्टर ५६ आर इतकी शासकीय जमीन आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्याचा महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी हा आदेश काढला असून, यामुळे रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाला आणि विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे.

सध्या सध्या कार्यरत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची जागा अपुरी पडत होती. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.या निर्णयामुळे अकलूज उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय सुविधा, विभागीय विस्तार आणि अधिक खाटांची उपलब्धता साकार होणार आहे. नवीन इमारतीच्या उभारणीनंतर रुग्णालयाची क्षमता वाढणार असून, अकलूज आणि परिसरातील हजारो रुग्णांना याचा थेट लाभ होणार आहे. यामुळे स्थानिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल आणि त्यांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून जमीन हस्तांतरणाचा निर्णय घडवून आणला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक जनतेच्या आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

नवीन इमारतीच्या बांधकामासाठी पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होईल यामुळे अकलूज उपजिल्हा रुग्णालय हे परिसरातील आरोग्य सेवांचे एक प्रमुख केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल. स्थानिक नागरिकांना आता सुसज्ज आणि आधुनिक रुग्णालयाच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या