🅾️ ज्ञानदेवा, आता तुमच्या गळ्याला विषवृक्षाची मुळी टोचत नाही का ?
⭕किर्तनकार संग्राम भंडारे आणि संघाचे वगनाट्य
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/09/2025 :
गत आठवड्यात तथाकथीत किर्तनकार संग्राम भंडारे आणि कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात जे काही घडले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रचलेले वगनाट्य होते. कितर्नकार संग्राम भंडारे याने या निमित्ताने महाराष्ट्राच्या पटलावर संघाच्या पदराखाली लपलेल्या मावशा समोर आणल्या. पण या निमित्ताने आम्हाला संत ज्ञानदेवांनाच एक प्रश्न विचारण्याची इच्छा झाली आहे. वारकरी सांप्रदायात घुसलेल्या सनातनी धर्म मार्तंडांच्या धर्मांधतेच्या विषवल्लीचा काटा ज्ञानदेवा तुमच्या गळ्याला टोचत नाही का ? तुम्ही का शांत आहात ? सनातन्यांचे हे थैमान पाहून अस्वस्थ होतय. माऊली ज्ञानदेवा राष्ट्रपतींच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या स्वप्नात जावा आणि या नमकहरामांच्या तावडीतून लोकशाही वाचली पाहिजे यासाठी त्यांचे कान पकडा अशी विनंती ज्ञानदेवांना करावी वाटते. संत एकनाथांच्या स्वप्नात जाऊन, "माझ्या गळ्यात अजान वृक्षाची मुळी टोचते आहे आणि ती काढा !" असे संत ज्ञाननेश्वरांनी सांगितल्याचे बोलले जाते. संत एकनाथ आळंदीला गेले व समाधी उलगडून त्यातली अजान वृक्षाची टोचणारी मुळी काढली. त्यानंतर ज्ञानदेवांची घसादुखी थांबली अशी अख्यायिका सांगितली जाते. संत ज्ञानेश्वरांचा काळ हा बाराव्या शतकातला. त्यानंतर तब्बल अडीचशे वर्षानंतर संत एकनाथांचा काळ येतो. अडीचशे वर्षानंतर ज्ञानेश्वर एकनाथांच्या स्वप्नात जातात आणि आपला गळा मोकळा करावयास सांगतात. सध्या वारकरी सांप्रदायचा गळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आवळला आहे. सांप्रदायात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या विषारी वल्लीच्या मुळ्या खुपच खोलवर पसरू लागल्या आहेत. या विषारी मुळ्यांनी संताचे मुलभूत विचार भ्रष्ट करण्याचा धडाका लावला आहे. राजकीय पक्षांची छुपी झुल घेवून अनेक भामटे वारकरी सांप्रदायात घुसले आहेत. हे विषारी मनोवृत्तीचे भामटे किर्तनकार, प्रवचनकार म्हणून वावरत आहेत. ज्या संतांनी समतेचा संदेश दिला, ज्या संतांनी तमाम प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा सल्ला दिला त्याच संतांचे नाव घेत 'ब्राम्हण्याचे' विष समाजात भिनवले जात आहे. या भामट्यांनी वारकरी सांप्रदायाचा आत्माच भ्रष्ट करण्यास सुरूवात केली आहे. ज्या धर्मांध लोकांनी, धर्माच्या ठेकेदारांनी ज्ञानदेवांच्या आई-वडीलांना आत्महत्या करण्यास भाग पाडले त्याच धर्ममार्तडांच्या आधुनिक वारसदारांनी वारकरी सांप्रदायात थैमान घातले आहे. ते वारकरी सांप्रदायात आपल्या धर्माची राजकीय दुकानदारी चालवू पहात आहेत. संग्राम भंडारे नावाच्या तथाकथित किर्तनकाराचा राजकीय तमाशा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. सदरचा तमाशा याच कटातला एक भाग होता. या भामट्यांचे उपदव्याप म्हणजे ज्ञानदेवांच्या गळ्याला टोचणा-या विषारी वृक्षाच्या मुळ्याच आहेत. अशा संघ प्रणीत अनेक भामट्यांनी वारकरी सांप्रदायात उच्छाद मांडला आहे. या तथाकथित किर्तनकार नावाच्या भामट्यांचे उपदव्याप पाहिल्यावर वारकरी सांप्रदायाची परंपरा आणि विचार माहित असणारा कुठलाही माणूस ज्ञानेश्वर माऊलींना प्रश्न करेल की, "ज्ञानदेवा, आता तुम्हाला या विषारी वल्लीच्या मुळ्या टोचत नाहीत का ?
कदाचित या विषवल्लीच्या मुळ्या ज्ञानदेवांच्या गळ्याला टोचतही असतील पण ते सांगणार कुणाला ?वारकरी सांप्रदायात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दलाल घुसले आहेत. त्यांनी वारकरी सांप्रदाय आणि संतांचा मुळ विचारच भ्रष्ट करण्याचा प्रकार चालवला आहे. भट-भटजींची धर्माच्या नावाने मिळणारी मिळकत व भाजपाची राजकीय दुकानदारी अबाधीत रहावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असे अनेक विषारी प्रचारक निर्माण केले आहेत. सांप्रदायात अशा नमुन्यांची सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. भाजपाच्या या राजकीय दलालांनी वारकरी सांप्रदायाच्या मुळावर घाव घालण्याचे काम चालवले आहे. ते धर्माचा धंदा करू लागलेत. संतांनी वेगळा धर्म, जात-पात कधीच शिकवली नाही. आपले काम जे आहे तेच काम निष्ठेने करणे हाच आपला खरा धर्म आहे. तो 'स्वधर्म' संतांनी आग्रहाने शिकवला.
"आता विश्वात्मके देेवे" अशी वैश्विक ईश्वराला साद घालणा-या, कुठल्या धर्माच्या देवाला, जातीच्या देवाला, किंवा ब्रम्हदेवाला वगैरे साद न घालता "आता विश्वात्मके देवे" म्हणत अवघ्या विश्वात सामावलेल्या देवाला साद घालणा-या ज्ञानदेवांचा सांप्रदाय धार्मिक कट्टरतेला थारा कसा देईल ? तिथं असल्या धर्मांध पाखंडाचा बोलबोला कसा चालेल ? "विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ" असं आपल्या अभंगातून जगाला सांगणा-या संत तुकोबारायांचा वारकरी सांप्रदाय धार्मिक कट्टरता जन्माला घालेल काय ? ज्या संतांनी हयातभर समतेचा व ममतेचा विचार सांगितला. जात-पात, धर्म व लिंगभेदाच्या चाैकटी मोडीत काढून समता शिकवणा-या संतांचा वारकरी सांप्रदाय धार्मिक कट्टरतेचं विष कसा पेेरेल ? याचाच दुसरा अर्थ असा की असे विष पेरणारे संग्राम भंडारेसारखे भामटे संत ज्ञानेश्वरांचे व संत तुकारामांचे अनुयायी होवूच शकत नाहीत. ते सच्चे वारकरी असूच शकत नाहीत. हे भामटे स्वत:ला किर्तनकार म्हणवून घेत असतीलही पण खरे वारकरी त्यांना किर्तनकार म्हणतात का ? हा खरा प्रश्न आहे.
तथाकथित किर्तनकार आणि वारकरी सांप्रदायात घुसलेला भाजपाचा छूपा कार्यकर्ता संग्राम भंडारे याचा ड्रामा आणि त्यातले कट-कारस्थान वारक-यांनी ओळखावे. खरेतर संग्राम भंडारे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यापासूनच संतांच्या विचारांना धोका आहे. बाळासाहेब थोरातांनी संग्राम भंडारेचे थोतांड पुराव्यासह बाहेर काढले. सर्वात भयंकर प्रकार म्हणजे संग्राम भंडारेने कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना, "आम्हाला नथूराम गोडसे व्हावे लागेल !" अशी धमकी दिली आहे. त्याने त्याच्या किर्तनातून बिश्नोईचेही समर्थन केले आहे. संग्राम भंडारे ज्या पध्दतीने बोलतो आहे ते पाहता हा 'आर एस एस' चा पाळीव पोपट असल्याचे लक्षात येते आहे. गेल्या काही वर्षात वारकरी सांप्रदायात 'आर एस एस' ने आपली पाळीव पिलावळ मोठ्या प्रमाणात घुसवली आहे. ही सर्व पिलावळ संतांच्या मुळ विचारांना कलंकीत करत आहेत. या दलालांनी वारकरी सांप्रदायाला राजकारणाचा अड्डा बनवले आहे. राजकीय पक्षाची विचारधारा घेवून, राजकीय पक्षाची झुल अंगावर घेवून हे बोके सांप्रदायात घुसले आहेत. ज्या मंबाजीने संत तुकारामांना छळले त्याच्याच या औलादी 'आर एस एस' चा अजेंडा घेवून सांप्रदायत घुसल्या आहेत. वारकरी सांप्रदायातून ही घाण काढून टाकावी लागेल. स्वत:च्या जगण्यात शुन्य टक्के परमार्थ असणारे तथाकथित किर्तनकार नावाचे हे 'पाकीटमार' इतरांना परमार्थ कसा काय सांगू शकतात ? भल्या मोठ्या बिदाग्या घेत हे किर्तनाच्या गादीवर कसे काय उभे राहू शकतात ? किर्तनाला पैसे घेणे म्हणजे मुलीची विक्री करण्यासारखे असल्याचे तुकोबारायांनी सांगितलं आहे. "कन्या, गाै करी कथेचा विकरा, चाडाळ तो खरा तया नावे" हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संग्राम भंडारेसारखे पाकीटबाज किर्तनकार संत विचाराला कलंक आहेत. तुकोबाराय अशा भामट्यांना चांडाळ म्हणतात. संतांच्या गळ्याला टोचणा-या या विषवल्लींना वारकरी सांप्रदायतून खड्यासारखे बाजूला काढावे लागेल. धर्मांधांनी स्वत:च्या आई-बापांचा जीव घेतला, त्यांना आत्महत्या करायला भाग पाडले. अतोनात छळ केला गेला तरीही ज्ञानेश्वरांनी अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार केला नाही. त्यांचा मुडदा पाडावा, जीव घ्यावा, त्यांची वाट लावावी, त्यांची बरबादी करावी असा विचार केला नाही. त्यांना शिव्या-शाप दिले नाहीत. खळांच्यातले दुष्टपण जावे असे वैश्विक देवाला साकडे घातले. ज्ञानदेवांनी पसायदान मागताना, "जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भुता परस्परे जडो मैत्र जीवांचे !" असे म्हणत नालायकांची नालायकी नष्ट होवू दे आणि त्यांच्यात सत्कर्मांची वाढ होवू दे अशी प्रार्थना केली. या सांप्रदायाने ब्राम्हणी धर्माचा कुठेही उदोउदो केला नाही. सगळे संत 'भागवत धर्म' म्हणत होते, लिहीत होते. दैदिप्यमान, उज्वल व महान परंपरा असणा-या आमच्या भागवत धर्माचा कब्जा नागपुरी भागवत (मोहन भागवतवाले) धर्मवाले घेवू पाहत आहेत. हिंदू धर्माच्या नावाखाली तमाम बहूजन जनतेला, वारकरी सांप्रदायला शेंडी लावू पाहत आहेत.
स्वत:ला किर्तनकार म्हणवून घेणारा संग्राम भंडारे नथूराम गोडसे होण्याची धमकी देतो ? तुकोबारायांचा खून करणारी औलाद, ज्ञानेश्वरांच्या आई-वडीलांना आत्महत्या करायला लावणारी औलाद, संत कबीर, बसवेश्वर ते काल परवा दाभोळकरांची हत्या करणारी औलाद वेगवेगळी नाही. याच औलादींनी धर्माच्या नावे इथं उच्छाद मांडला आहे. नथूराम गोडसेला आदर्श समजणारा भामटा आमच्या ज्ञानदेवांचा व तुकोबारायांचा पाईक असूच शकत नाही. ही जमात मंबाजीच्या जातकुळीतली आहे याचे भान सर्व वारक-यांनी ठेवायला हवे.
दत्तकुमार खंडागळे, संपादक
वज्रधारी, मो. 9561551006
0 टिप्पण्या