आज सर्वाधिक पुस्तके इतिहास किंवा भूतकाळ बाबत लिहली जातात पण प्रश्न आहे ......
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 : आज सर्वाधिक पुस्तके इतिहास किंवा भूतकाळ बाबत लिहली जातात पण प्रश्न आहे — त्या इतिहासातून आज तुमच्या आयुष्यात काय बदल झाला..? किंवा होईल..
राजे-महाराजांच्या युद्धांच्या कथा वाचून तुमच्या घरात शांती आली का...?...स्वातंत्र्यलढ्याच्या चरित्रातून तुमच्या मनाची गुलामी सुटली का? जर नाही, तर मग ते फक्त कागदावरचे शब्द.
आपण बघतो, इतिहासावर किती लिहिलं जातं. इतिहासाची आठवण हवी, पण आजच्या समस्येला भिडणं जास्त गरजेचं आहे. भूतकाळाच्या गोष्टी लिहिणं सोपं आहे — कुणी आक्षेप घेणार नाही, सगळे मान डोलावतील. पण आजच्या वास्तवावर लिहिलं, तर लोक त्रासून जातील आणि म्हणूनच जास्तीत जास्त लेखक तिथेच पळ काढतात. आणि इतिहासावर आधारित लिहीत बसतात.
चांगले पुस्तक तेच जे तुमच्या वर्तमानाला स्पर्श करतं. भूतकाळ सांगणं वाईट नाही पण फक्त कालगतीचा वर्णन करून थांबलं तर त्याचा उपयोग शून्य. पुस्तकाने प्रश्न विचारले पाहिजेत "आज तू कुठे आहेस?"...."तुझं जीवन कुठे जातंय?" "तू का जगतोयस?" इतिहास हा फक्त पार्श्वभूमी असावी, कथा नव्हे. शिवाजी महाराज , गांधीजी, नेहरू चांगलं आहे, आदर आहे.
पण सांगा — त्या सगळ्या पानांमधून आज तुमच्या आयुष्यात काय बदललं?
तुमचं कर्ज फेडलं गेलं का? तुमचा राग, मत्सर, भीती संपली का? तुमच्या घरातले भांडण थांबले का? नाही ना? मग काय उपयोग त्या पुस्तकांचा? फक्त वाचून छाती ठोकण्यापुरता इतिहास ठेवायचा का?
चांगलं पुस्तक तेच जे तुमचं वर्तमान फाडून उघडतं....जे तुम्हाला प्रश्न विचारतं —
"तू आता कुठे चाललाय?"
"तुझं जीवन तू जगतोयस की इतरांच्या सांगण्यावर?"
"तू बदलायला तयार आहेस का?"
चांगली पुस्तके निर्माण कशी होतात? लेखक स्वतःशी प्रामाणिक असतो, वाचकाला खुश करण्याच्या नादात नसतो. घटना, विचार, कथा — या सगळ्या आजच्या वास्तवाशी जोडलेल्या असतात. मजकूर वाचकाला सुखावणारा नसून हलवणारा असतो. वाचनानंतर वाचकाला काहीतरी करायला भाग पाडणारी ती पुस्तके असतात.
माझ्यासाठी चांगलं पुस्तक म्हणजे जे वाचून मी फक्त “छान लिहिलंय” म्हणत नाही, तर पुस्तक बंद करताच विचारतो, "आता मी काय करणार?" पानांमध्ये अडकवून ठेवणाऱ्या शब्दांना विसरा. तुमच्या रक्तात उतरणाऱ्या शब्दांचा शोध घ्या तेच खरी पुस्तकं असतात.
चांगली पुस्तके ही वाचकाला केवळ आनंद न देता, त्याला विचार करायला, नवे दृष्टिकोन स्वीकारायला, आणि स्वतःत काही सकारात्मक बदल घडवायला प्रेरित करणारी असतात...
"चांगली पुस्तके" याचा अर्थ फक्त नावाजलेल्या लेखकांच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाही, तर विषय, विचारसरणी, मांडणी, आणि वाचकावर होणारा परिणाम यावर आधारित आहे. माझ्या दृष्टीने चांगले पुस्तक हे असे आत्मचरित्रे ज्यातून एखाद्या व्यक्तीचा संघर्ष, अनुभव, विचारसरणी, आणि मूल्ये जाणून घेता येतात.
उदाहरणार्थ, सत्यघटनांवर आधारित प्रामाणिक आत्मकथन. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी पुस्तके जी संशोधन, प्रयोग, आणि तर्काधारित विचार मांडतात, तसेच अंधश्रद्धेपासून मुक्त करतात.
सध्याच्या परिस्थितीवरील वस्तुनिष्ठ सत्यकथा ज्या घटनांचा प्रामाणिक, पुराव्यावर आधारित लेखाजोखा देतात आणि वाचकाला विचार करायला लावतात. आरोग्यावर आधारित पुस्तके – जे वैद्यकीय शास्त्रावर, जीवनशैलीवर आणि स्वास्थ्यवर्धनावर प्रमाणित माहिती देतात. अशी पुस्तकं लिहली गेली पाहिजेत, आणि ती सामान्य वाचकापर्यंत पोहचली पाहिजेत
72 190 17700

0 टिप्पण्या