🟢 निंदिया से जागी बहार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 21/8/2025 : मला वाटतं की ते १९८३ वगैरे साल होतं आणि त्यावर्षी नोकरीच्या निमित्ताने मी आजऱ्यामध्ये होते. त्याच वर्षी हिरो नावाचा एक पिक्चर आला होता, जो प्रचंड गाजला. त्यावेळी हा पिक्चर व्हीसीआर वरती मी पाहिला होता. त्यातलं 'निंदिया से जागी बहार ऐसा मौसम देखा पहली बार' हे गाणं मला प्रचंड आवडलेलं..!! आजही तितक्याच तीव्रतेने ते आवडतं. असो.
तर मंडळी, आपल्या जीवनात अनेक समस्या येतच असतात. पण बहुतांशी लोकांच्या जीवनातली सर्वात मोठी समस्या कोणती असते माहिती आहे का..? ती म्हणजे मऊ उबदार अशा अंथरुणातून उठून खोलीतल्या थंडगार अशा फरशीवर पाऊल ठेवणे. अर्थात हे माझं वाक्य नाही तर एका विनोदी लेखकाने लिहिलेले आहे. ज्यांच्या बोलण्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. मला सांगा.. अंथरुणावर पडल्या पडल्या जर उठणं किती त्रासदायक आहे असा विचार तुम्ही सतत करत राहिलात, तर मंडळी.. उठणं अधिकाधिक अवघडच होत राहील. खरेतर ही छोटीशी गोष्ट आहे. पण जर या छोट्याशा गोष्टीत देखील अंगावरील पांघरून फेकून देऊन जमिनीवर सरळ उभ राहण्याची क्रिया यांत्रिक पद्धतीने केली तर भीती निघून जाईल.. नाही का..? एकंदरीत यातला मुख्य मुद्दा अगदी स्पष्टपणे दिसतो की जगामध्ये काहीतरी करून दाखवणारे लोक प्रेरणा उत्पन्न होण्याची वाट पाहत नाहीत, तर ते स्वतः प्रेरणा निर्माण करतात.
एक गंमत बघा मंडळी , भारतीय स्त्रीला म्हणजे गृहिणीला जगातलं बेस्ट मॅनेजर म्हटलं जातं... का तर त्या सगळी काम वेळेत पार पाडत असतात. हीच कामे अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र कंटाळवाणी ठरतात. तसे पाहिले तर जगातील सर्व स्त्रियांच्या दृष्टीने कंटाळवाणं काम कोणतं आहे ते माहिती आहे का..? तर ते आहे भांडी घासणे. पण गंमत बघा. आपण जेवून उठलो आणि यांत्रिकतेने तिथली दोन-चार भांडी उचलली आणि लगेच फार विचार न करता घासायला घेतली तर ते काम काही मिनिटात संपत. त्या भांड्यांचा ढीग साठवून ठेवायचा आणि मग ते न आवडणारे काम हातात घेऊन चालढकल करत राहण्यापेक्षा ही गोष्ट केव्हाही चांगलीच. बरोबर ना..? आपल्याला काय केलं पाहिजे, तर तुम्हाला अजिबात जी आवडत नाही अशी एखादी गोष्ट निवडायची आणि मग त्या कामाबद्दल जास्त विचार न करता लगेचच त्या कामाला हात घालायचा. कंटाळवाणे काम पूर्ण करण्याचा हा अत्यंत उत्तम मार्ग आहे. थोडक्यात काय तर एखादी गोष्ट करण्याची प्रेरणा उत्पन्न होण्याची वाट पाहत बसायचं नाही.
आता या कामात आपल्याला काय मदत मिळू शकते तर सांगते. तुम्ही कागद आणि पेन याचा वापर करा. एकाग्रता साधण्याचं सर्वात परिणामकारक साधन म्हणजे पेन आणि कागद. कागद आणि पेनाच्या मदतीने तुम्ही तुमचं मन तुमच्या पुढील समस्या सोडवण्याच्या कामात पूर्णपणे गुंतवू शकता. लक्षात घ्या मंडळी की जेव्हा तुम्ही एखादा विचार कागदावर लिहून काढता तेव्हा आपोआपच तुमचे संपूर्ण लक्ष त्याच विचारावर केंद्रीत होत असतं. याचं एक कारण म्हणजे एक विचार लिहीत असताना दुसरा कोणताही विचार तुमच्या मनात येऊ शकत नाही.. नव्हे येतच नाही, कारण आपल्या मनाची घडणच तशी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कागदावर आपण आपला विचार लिहीत असताना तोच विचार आपल्या मनावर सुद्धा लिहिला जातो. म्हणजेच आपण कागदावर जे काही लिहितो ते आपल्या जास्त काळ आणि जास्त अचूकतेने लक्षात राहतं. खरे तर ही गोष्ट अनेक प्रयोगांमधून सप्रमाण सिद्ध झालेली आहे.
म्हणूनच मी म्हणते की...
दिसामाजी काहीतरी लिहीत जावे
आणि
आळस झटकून कामाला लागावे
फोटो सौजन्य गुगल
राजश्री (पूजा) शिरोडकर
एम ए मानसशास्त्र
कोल्हापूर
0 टिप्पण्या