🅾️ शाकाहारी अतिरेकी…

 

🅾️ शाकाहारी अतिरेकी…

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 22/8/2025 : आता पर्युषण काळात १० दिवस कत्तलखाने बंद ठेवावे यासाठी जैन संस्था हायकोर्टात गेलेल्या आहेत आणि कोर्ट त्यांना उभे आडवे घेत आहे.

या लोकांचे काही समजत नाही.  इतका अतिरेकीपणा सात्विक शाकाहार करून यांच्यात येतो कुठून?  अरे, तुम्हाला खायचे नाही तर नका खाऊ!  खायचे त्याला खाऊ द्या!  इतका सोपा विचार आहे.  पण नाही, हे लोक स्वतःला उच्च दर्जाचे समजतात आणि इतरांना पापी समजतात. ही एक प्रकारची पाकिस्तानी वृत्ती आहे. “पाकिस्तान” म्हणजे पवित्र प्रदेश; म्हणजे इतर प्रदेश अपवित्र? तसेच हे “शुद्ध शाकाहारी” लोक म्हणजे, शुद्ध!  तर मग इतर लोक अशुद्ध असे कंसातले न लिहिलेले शब्द आहेत.

आपल्या धर्मग्रंथांनुसार सात्विक, राजस आणि तामस आहारानुसार खाणाऱ्याची वृत्ती सात्विक, राजस आणि तामस बनते म्हणे. ते धार्मिक वचन किती खोटे आहे ते जणू सिद्ध करण्याची खास दैवी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे अशी या तामसी शाकाहारींची सध्या वागणुक आहे. इतरांनी काय खायचे ते हे ठरवणार!  यांना वेळीच थांबविले नाही तर हे हिंदू सणांचे निमित्त सांगून वर्षातले २०० दिवसही मांसाहार बंद करतील आणि आपले चिंटू पिंटू नवहिंदुत्ववादी त्यांना पाठींबाही देतील.

बरे, यांना खरेखुरे अहिंसेचे पुजारी म्हणावे तर गरीब लोकांची पिळवणूक करून त्यांचे रक्त पिण्यात हे आघाडीवर, सगळ्या आर्थिक व्यवहारात लोकांना पिळून काढण्यात यांचा हातखंडा. म्हणून लोक म्हणतात की ते पापक्षालन करण्यासाठी म्हणे हे कबुतरांना दाणे टाकतात.  हा विनोद म्हणावा तर तसेही नाही.  ही सांगोवांगी गोष्टही नाही.

माझा सख्खा भाऊ रेशनिंग इन्स्पेक्टर होता आणि कडक स्वभावाचा होता. तो धारावीत पोस्टेड असतांना त्याने तपासणीत एका रेशनिंग दुकानदाराला धान्यात भेसळ करतांना पकडले. संतापून त्याने त्याला विचारले की असे गरिबांच्या जीवाशी खेळताना तुला देवाची भीती वाटत नाही का? त्यावर त्या दुकानदाराने नम्रपणे सांगितले की, साहेब म्हणूनच मी कबुतरांना दाणे खाऊ घालतो. आपल्यासारखा माणूस यावर फक्त हतबुद्ध होऊ शकतो

विशेष म्हणजे कोर्टात युक्तिवाद करताना अभिनव चंद्रचूड यांनी जैन लोकसंख्येबद्दल दोन मुद्दे मांडले. एक तर ते म्हणाले की अहमदाबादपेक्षा मुंबईत जैन जास्त आहेत. असतीलही.  पण तुलना अशी होत नसते.  लोकसंख्येच्या टक्केवारीत बघा की ते किती टक्के आहेत. दुसरे म्हणजे चंद्रचूड म्हणाले की मुंबईत शाकाहारी लोकांची संख्या मांसाहारी लोकांपेक्षा जास्त आहे.  हा सर्व्हे चंद्रचूड यांनी कधी केला?

खरे तर अशी टक्केवारी काढली तर शाकाहारी १५ टक्केही निघणार नाहीत.  कारण मराठी, पंजाबी, सिंधी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, मुस्लिम, ख्रिश्चन असे सगळे लोक (काही अपवाद वगळून) मांसाहारीच असतात.  अगदी गुजराती, मारवाडी लोकातही खूप लोक मांसाहारी असतात. मग कोर्टाची अशी दिशाभूल अभिनव चंद्रचूड यांनी का करावी?  मोठे वकील झाले म्हणून खोटेही मोठेच बोलायचे असते का?  आणि लोकसंख्या वाढत गेली म्हणजे आपली आहार पद्धती दुसऱ्यांवर लादावी असे काही नाही. पण ही धोक्याची घंटा आहे. तुम्ही खरेच अल्पसंख्य झालात तर काय होईल यांचे हे ट्रेलर आहे

🪴 72190 17700🪴

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या