🔲 ही आहे वेदना गरीबाची

 

🔲 ही आहे वेदना गरीबाची 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 18/8/2025 :

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, ऐकायला खूप छान वाटते आपल्याला पण पाऊस सगळ्यां साठीच रोमँटिक नसतो. ही आहे वेदना गरीबाची.

तहानलेल्या धरतीप्रमाणेच माणसंही या मृगाची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतात.सर्वांना नकोस झालेला उन्हाळा पावसाच्या शिडकाव्यामुळे काहीसा शितल होतो. धरित्रीही तहानल्याप्रमाणे सर्व पाणी आपल्यात सामावून घेते आणि शंभर अत्तरांच्याही सुवासा पुढे फिका  पडेल असा सुरेख पहिल्या पावसाचा सुगंध सगळीकडे दरवळतो.जो कितीही हवाहवासा वाटला तरी फक्त एक दोन वेळेलाच अनुभवता येतो. म्हणून तो आपण भरभरून नाकात आणि मनात साठवून ठेवतो.

हे झाले सुखद पावसाचे आगमन. परंतु काहींना मात्र हा पावसाळा सुखद वाटत नाही कारवीच्या लाकडांपासून बनलेली झोपडी, मातीची जमीन, त्यावर झावळ्यांचे छप्पर. अशा घरांमध्ये मात्र हा पाऊस म्हणजे त्यांना जीवनातील दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या परीक्षेप्रमाणेच वाटत असणार. जिकडे गळते तिकडे भांडी ठेवणे, कसेबसे अंथरूण सावरून ठेवणे, चूल कशी पेटणार? न पेटताच धूर ओकणारी ओली लाकडं, मुलांना काय खाऊ घालणार? धुरामुळे खोकला होतो, डोळे चुरचुरतात, हा धूर डोळ्यांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नसतो. अशा अनेक चिंता घेऊन त्यांचा पावसाळा सुरू होतो. अगदी कितीही छत अच्छादले तरीही चुकार पागोळ्या त्यातून खाली ठिबकतातच. झोपडीमध्ये अक्षरशः ओलावा पसरतो. निरनिराळे दम्यासारखे रोग त्यामुळे होऊ शकतात. चूल पेटली नाही तर अन्न शिजवता येत नाही. धान्य साठवणूक केली तरीही ते भिजून खराब होते, शिवाय हातावरचे पोट, त्यामुळे कितीही धो धो पाऊस असला तरीही मजुरीला गेल्याशिवाय त्यांच्या घरात धान्य आणून चूल पेटणार नसते. आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या तर डॉक्टर कडे जाऊन औषध आणायला ही पैसे नसतात. अशावेळी मात्र हा पाऊस त्यांना अगदी संकटाप्रमाणेच भासतो.

आपण मात्र पावसाळी सफर आयोजित करतो, पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटत असतो, घर न गळणारे व मोठे असल्याने कपडे सुकविण्याचाही प्रश्न उद्भवत नाही.अन्नधान्य साठवू शकतो. म्हणून कधी नुसतीच पावसाळी सफर आयोजित न करता मुलांना घेऊन या लोकांकडे जावे, त्यांच्या अडीअडचणी समजावून घ्याव्यात, जमेल तितकी मदत आपल्याकडून होते का हे पहावे. म्हणजे त्यांनाही असेही एक जग असते. याची जाणीव होईल. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ असे म्हणून त्यांची ही परिस्थिती सुधारण्यास काहीशी मदतच होईल.

दर वेळेस शासनच या गोष्टी करेल,आपल्याला काय करायचे आहे? अशी भावना मनात नसावी. आपला शेतकरीही आभाळाकडे डोळे लावूनच बसलेला असतो. वेळेत पाऊस आला तर त्याची कामांची लगबग सुरू होते. शेत नांगरणे,शेतातील तण काढणे, ते जाळणे, नांगरणी करणे,बियाणे पेरणे अशी एक ना अनेक कामे असतात.

हा पाऊस मात्र लहरी असतो, त्याच्या लहरीपणावरच त्याचे पुढील वर्षाचे भवितव्य अवलंबून असते कधी तो अवेळी पडतो, कधी खूप काळ पडतच नाही त्यामुळे पेरणी केलेले धान्य थोडेसेच उगवून पिवळे पडून सुकण्याची भीती असते. अशावेळी दुबार पेरणीचे संकट उद्भवते. तर कधी  प्रकोप झाल्याप्रमाणे अतिवृष्टी होते आणि उभे पीक वाहून जाते किंवा साठलेल्या पाण्यामध्ये कुजून जाण्याची भीती असते. जो आपल्या सर्वांना खाऊ घालतो त्या बळीराजालाच स्वतःचे पोट कसे भरणार याची चिंता लागून राहते. हवामान आणि निसर्गापुढे शेतकरी स्वतःला पराधीन समजतो, हतबल ठरतो.

मनाप्रमाणे पाऊस झाला तर मात्र त्यांचे सुगीचे दिवस सुरू होतात. आणि तरच त्यांचे घरातील लग्नकार्य, सणवार सुरळीतपणे पार पडू शकतात. अतिवृष्टीमुळे केव्हा केव्हा गावातील नदी ही उग्ररूप धारण करते आणि पूर येऊन आपले पात्र ओलांडून गावात, शेतात शिरते. अशावेळी उभे पीक वाहून जाते घरदार, घरातील मालमत्ता नष्ट होते. नैसर्गिक आपत्ती ओढवते, कित्येकदा जीवितहानीही होते कशी काळनागिणी, सखे ग वैरीण झाली नदी, अशी स्थिती उत्पन्न होते. या परिस्थितीला सुद्धा काही प्रमाणात मानवच  जबाबदार आहे. अनियंत्रित लोकसंख्या वाढ, वारेमाप वृक्षतोड, घर बांधणीसाठी शेतीसाठी झाड, वृक्ष तोडून जमीन तयार करणे,सिमेंटचे जंगल उभारणे यामुळे अवर्षणाचा किंवा अतिवृष्टीचा धोका उद्भवला आहे. या सर्वामुळे धरतीचे तापमानही काहीसे वाढले आहे.

उपकारक अशी तीवराची जंगले जमिनीच्या हव्यासा पायी तोडली गेली आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे, हवा पाणी जमीन साऱ्याचेच प्रदूषण झाले आहे. यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. आपला भारत देश कृषीप्रधान असल्यामुळे आपल्याकडे या समस्या जास्त प्रमाणातच उद्भवलेल्या असतात. त्यावर प्रगती करून अभ्यास करून ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

✍️ विनया भट :9167381012.

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या