🟢 सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याची ८२ कोटींची थकीत रक्कम ५ दिवसात मिळणार 🟣 आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा थकीत रक्कम तात्काळ उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न

 

🟢 सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याची ८२ कोटींची थकीत रक्कम ५ दिवसात मिळणार 

🟣 आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा थकीत रक्कम तात्काळ उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 08/07/2025 :

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा आणि नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्नावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आवाज उठवला. सोलापूर जिल्ह्यातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांची सुमारे ८१ कोटी ८० लाख रुपयांची नुकसानभरपाई  मिळालेली नाही. परिणामी हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे ही रक्कम तातडीने वितरित करावी. तसेच,शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गट व तालुका पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी,जेणेकरून स्थानिक पातळीवरच तक्रारींचा जलद निपटारा होईल.

मोहिते पाटील यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर एक टोल-फ्री क्रमांक सुरू करण्याची मागणी केली.त्याचबरोबर, विविध विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या तक्रारींचे एकत्रीकरण करून एकत्रित डिजिटल यंत्रणा निर्माण करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्या कंपनीने किती मोबदला दिला, याची पारदर्शक माहिती मिळू शकेल अशी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली.

या मुद्द्यांवर  मंत्री आशिष जयस्वाल यांनी उत्तर देताना सांगितले की, २० जून २०२५ अखेर सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लाख ३२ हजार ८५१ अर्जदार शेतकऱ्यांची नुकसानभरपाई २७८.७१ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.त्यात स्थानिक व व्यापक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत १ लाख ५९ हजार ६९९ शेतकऱ्यांना १९७.६३ कोटी रुपये भरपाई वितरित करण्यात आली आहे. तर काढणी पश्चात नुकसान व उत्पादनातील घट यासाठी ६९,९५४ शेतकऱ्यांसाठी ८१.८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होण्यासाठी विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून विमा हप्ता अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ४ ते ५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले.

मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गट व तालुका पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा व विमा कंपन्या आणि कृषी विभागाचे संकेतस्थळ यांचे एकत्रीकरण करून एकत्रित डिजिटल यंत्रणा निर्माण करण्याच्या मुद्यावर शासन सकारात्मक निर्णय घेईल जेणेकरून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने होईल असे आश्वासित केले आहे.आ मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवल्याने पिकविम्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून त्यांच्याप्रती आभाराची भावना व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या