कठोर शिक्षेने बलात्कार कमी किंवा बंद होतील?

 

कठोर शिक्षेने बलात्कार कमी किंवा बंद होतील?

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 21/7/2025 : 

कठोर शिक्षेने बलात्कार कमी किंवा बंद होतील? बलात्कारी लोकांना जबर शिक्षा देणारे अरब अमिरातीचे कायदे इथे असावेत अशी मागणी काही लोक करतात. ती करण्यापूर्वी त्या कायद्यात महिलांचे स्थान काय आहे हे एकदा त्यांनी कृपया तपासून पहावे.

शिक्षा कठोर केली की बलात्काराला आळा बसेल असे मानणे हा भाबडेपणा आहे. कारण पुरुष स्त्रियांवर बलात्कार करतो ते कायदा कठोर आहे की नाही हे पाहून करत नाही तर त्याच्या स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याच्या विकृत पुरुषी मानसिकतेतून करतो. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ती बदलण्याची जबाबदारी पुरुषाला जन्म देणारी आणि त्याच्यावर संस्कार करणारी स्त्री जी त्याची आई असते, कुटुंब-जिथे तो वाढतो, समाज-ज्याचे प्रतिबिंब त्याच्या मानसिकतेत उमटते, धर्म-जो त्याला पापपुण्य शिकवतो, यांची आहे.

शिक्षा ही स्त्रीवर "बलात्कार केल्यानंतर", तिला उद्ध्वस्त केल्यानंतर आणि गुन्हा कोर्टात सिद्ध झाल्यानंतर दिली जाते. बलात्काराच्या जखमा स्त्री जीवनभर शिरावर वाहते. आणि शिक्षा भोगून, शिक्षेत माफी मिळवून  बलात्कारी मात्र समाजात सानमानाने परत येतो.  मग, बलात्कार करण्याची इच्छा पुरुषाच्या मनात येऊच नये, त्याने कायम स्त्रीचा आदर राखावा, यासाठी पुरुषाची आई, कुटुंब, समाज आणि धर्म कोणता "बलात्कार प्रतिबंधक उपाय" करतात ?

आजचे चित्र भयावह आहे, एका मुलीला पळवून नेणार्‍या पुरुषाला 'मदर इंडिया' मध्ये गोळ्या घालणारी त्याची आई जाऊन आज आपल्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी धडपडणारी आई (आणि कुटुंब, समाज, धर्म देखील) दिसते.  बलात्कार करणारा आणि बलात्कार - पीडिता यांची जात, धर्म, राजकीय विचारधारा, भाषा, राज्य हे पाहून मग त्याचा निषेध करावा की नाही किंवा बलात्कार्‍याचा सन्मान करावा की विरोध, हे संबंधित व्यक्ति, समाज, राजकीय पक्ष, संघटना, ठरवतात. म्हणजे बलात्कार आता व्यक्ति- समाज- जात-धर्म सापेक्ष झाला आहे. 'दुसर्‍यांच्या' महिलेवर बलात्कार झाल्यावर आनंदाच्या उकळ्या तर 'आपल्या' महिलेवर झाल्यास संतापाचा उद्रेक, हे चित्र बदलायला पाहिजे.

बलात्कार हा रोग आहे. त्यासाठी शिक्षा हे रोग झाल्यानंतरचे औषध आहे. पण हा रोग हौच नाये म्हणून या रोगावर "रोग प्रतिबंधक उपाय" देखील केला पाहिजे , तो करण्यास प्रत्येक स्त्री, कुटुंब, समाज, धर्म यांनी आज मनापासून सुरुवात केली तर पुढील दुसर्‍या-तिसर्‍या पिढीपासून बलात्कार लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. पण, आजचे चित्र तसेच राहिले तर स्त्रियांसाठी भविष्यकाळ भयानक दिसतो आहे

9326365396

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या