🟦 आषाढात लेकीला माहेरी बोलवण्याची प्रथा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 02/07/2025 :
आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
काही जुन्या परंपरा या केवळ धर्म, शास्त्राची नव्हे तर नात्यांची मोट बांधलेली राहावी या दृष्टीनेही आखल्या आहेत, लेकीला माहेरी बोलवण्याची प्रथाही त्यापैकीच एक!
आषाढ मास हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. या महिन्यात येणारी आषाढी एकादशी तर महत्त्वाची ठरतेच शिवाय त्याच दिवसापासून सुरु होणाऱ्या चातुर्मासालाही खूप महत्त्व असते. या काळात पावसाळा मुरायला लागतो त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी गोडा-धोडाचे, तळणीचे पदार्थ ओघाने आलेच. हे ओळखून आपल्या पूर्वजांनी 'आषाढ तळण' ही प्रथा सुरु केली असावी. यालाच आषाढ तळणे असेही म्हणतात.
आषाढ महिन्यात मुबलक पाऊस पडतो. अशा वातावरणात केवळ कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो. मे महिन्यात केलेले वाळवणाचे पापड, कुरडया, सांडगे, शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते. श्रावणात व्रत वैकल्यांमुळे खाण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे आषाढ तळण अगदी दणक्यात पार पाडले जाते. हे घरगुती पदार्थ जिभेचे चोचले तर पुरवतातच, शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात.
पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट मिठाच्या पुऱ्या, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, भजी, कडबोळी, अळू वडी, कोथिंबीर वडी, पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जात असत. त्याला खीर, लाडू, शिरा इ. गोड धोड पदार्थांची जोड असे. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आले पाकची वडी याचाही समावेश केला जातो. आता त्यात नवनव्या खाद्यपदार्थांची भर पडते आणि आखाड तळला जातो.
एवढे पदार्थ केल्यावर सासरी गेलेल्या लेकीची आठवण होणार नाही, हे शक्य आहे का? म्हणूनच...
आषाढात सासरी गेलेल्या लेकीला माहेरी बोलावण्याची परंपरा :
लाडकी लेक माहेरी आली की घर आनंदून जाते. लग्नाला कितीही वर्ष लोटली तरी माहेराबद्दलचं आकर्षण, प्रेम, ओढ तसूभरही कमी होत नाही. माहेरच्या मंडळींबद्दल एक शब्दही वावगा ऐकून घेतला जात नाही. अशा माहेरी गेलेल्या लेकीचा सासरी जाताना पाय जड होतो. जशी तगमग तिची होते, तशीच घरच्यांचीदेखील होते. म्हणून सणवारांचे निमित्त काढून तिला घरी बोलावले जाई. सध्याच्या काळात सासर माहेर जवळ असल्याने निमित्त शोधावे लागत नाही, परंतु दर वेळी माहेरी जाताना वाटणारी ओढदेखील कमी होत नाही.
ही प्रथा कशी सुरु झाली?
पूर्वी एप्रिल-मे महिन्यात लग्न होत असत. सासरी गेलेली आपली लेक कशी नांदत असेल? तिला कामातून उसंत मिळत असेल का? तिला समजून घेणारे कोणी असेल का? नवरा नीट वागवत असेल का? अशा अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी, लेकीला माहेरपण देण्यासाठी, विश्रांती देण्यासाठी आषाढात तिला माहेरी बोलावले जात असे. आषाढ तळला की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खाऊ घातले जात असत. ती मनाने तृप्त झाली की तिची पाठवणी केली जात असे. कारण त्यानंतर गौरी-गणपती आणि दिवाळीतच आगमन होत असे. त्यामुळे आषाढात बाहेर पावसाच्या आणि घरात मायेच्या सरींनी भिजून प्रेमाने ओथंबलेली लेक सासरी जात असे.
मात्र बुधवारी पाठवणी केली जात नसे, कारण...
पूर्वीची म्हण :
'जाशील बुधी, तर येशील कधी?' बुध प्रदोषाच्या व्रतकथेवरुन ही म्हण आली असावी. पूर्वी आई-आजी म्हणत की बुधवारी गेलीस तर पुढचा बराच काळ सासरी परत येणार नाहीस अशी काळजी व्यक्त केली जात असे. या मायेपोटी लेकींना बुधवारी सासरी न पाठवण्याची प्रथा सुरु झाली असावी.
तर तुम्ही कधी बोलावणं धाडताय तुमच्या लेकीला?
0 टिप्पण्या