मस्तानी

 

मस्तानी 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 04/07/2025 :

राजा छत्रसाल बुंदेला हे प्रौढप्रतापी, सहिष्णू, आनंदधर्म उद्गाते, बुंदेल खंडाचे भाग्यविधाते. आजही बुंदेल खंडात परमेश्वरा अगोदर त्यांची पूजा केली जाते. बुंदेल खंड हा उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या दोन राज्यामध्ये येतो. इथली भाषा बुंदेली असल्यामुळे छत्रसाल महाबली! कर दे भली! कर दे भली! अशी प्रार्थना म्हणून राजा छत्रसाल बुंदेला महाराजांचा आशीर्वाद घेतला जातो.  

मस्तानी ही अशा राजा छत्रसाल बुंदेला यांची पर्शियन यवन पत्नी रुहानीबाई बेगम पासुन २९ ऑगस्ट १६९९  रोजी झालेली औरस राजकन्या होती. मस्तानीचे शिक्षण, संगोपन, तिच्यावरचे धार्मिक, सामाजिक संस्कार हे राजा छत्रसाल बुंदेलानेच केले होते. म्हणूनच ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात अतिशय प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. राजा छत्रसाल बुंदेलाची लाडकी राजकन्या असल्यामुळे ती अतिशय लाडात व वैभवात वाढली असली तरी तिच्यावर छान व खानदानी संस्कार झाले होते. साक्षात गजान्तलक्ष्मीचा अनुभव तिला होता. तिच्या अंगरख्याला गुंडी म्हणून हिरे लावण्यात येत असत आणि हे हिरे त्या काळात लाख लाख रुपये किमतीचे असत. प्रसिद्ध पन्ना सारख्या हिऱ्याची खाणीचे मालक असलेल्या राजा छत्रसाल बुंदेलास काही कमी नव्हते.

दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर राजा छत्रसाल बुंदेलास शरणागती पत्करावी लागली. मोहम्मद खान बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्याच्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या राजा छत्रसाल महाराजाला छावणीत बंदिस्त केले. मात्र राजा छत्रसाल बुंदेला मोहम्मद खान बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा त्या काळात तोच एकच परमप्रतापी पुरुष संपुर्ण हिंदुस्थानात होता. तो म्हणजे बाजीराव बाळाजी भट (पेशवे).

"जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥"

याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात राजा छत्रसाल बुंदेला याने  "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥

असा "गजन्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. वेगवान हालचाल हा बाजीरावांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या होत्या .बेसावध मोहम्मद खान बंगेश एका गढीत अडकला.

बाजीरावाच्या झंझावातापुढे मोगल सैनिक हैराण झाले. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेशचा पराभव करून आपल्या पराक्रमी बाजीरावाने राजा छत्रसाल  बुदेंला यांना मुक्त केले. आपत्कालीन काळात बाजीरावाने केलेल्या मदतीने खुश होउन राजा छत्रसाल बुंदेलाने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. आणखीन परतफेड आणि कृतज्ञता म्हणून आपल्या अनेक राण्यांपैकी एक म्हणजे रुहानीबाई बेगमची पण स्वतःची लाडकी व सुदंर लावण्यवती राजकन्या म्हणजेच मस्तानीचा शाही विवाह बाजीराव पेशवे यांच्याशी केला.

छत्रसाल राजाने त्यावेळी बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा जहागिरीचा प्रदेश व पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीतील तिसरा हिस्सा भेट दिला. हा तिसरा हिस्सा म्हणजे त्याची किती किंमत त्याकाळात होती? हे आपण कल्पना करू शकत नाही. एक मात्र खरे की, बाजीरावांच्या शौर्याची किंमत त्याकाळात कोणी करू शकत नव्हते. इतके ते शुर व पराक्रमी होते. राजा छत्रसाल याने ही  दिलेली भेट म्हणजे बुंदेल खंडावर आक्रमण करणाऱ्या महमंद बंगेषला बाजीरावांनी पराभूत केल्याची कृतज्ञता होती. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास पिलाजीराव जाधव, नारोशंकर, तुकोजी पवार, राणोजी शिंदे, गोविंदपंत खेर, दावलजी सोमवंशी असे मातब्बर मराठा सरदार उपस्थित होते. मस्तानीच्या लग्नाच्या निमित्ताने छत्रसाल राजाने मराठे व बुंदेला ही सोयरीक निर्माण केली. त्यावेळी, बाजीराव आधीच विवाहित आणि स्वभाव आणि कौटुंबिक परंपरेनुसार एकपत्नी होते. मात्र त्यांनी राजा छत्रसाल बुंदेलाचा आदर करून स्वीकार केला. बाजीरावांचाही या विवाहा मागील हेतू पाहिला तर मस्तानी लावण्यवती होतीच पण खरा हेतु म्हणजे बाजीरावांनी तो एक राजकीय व्यवहारच केला होता.

बाजीरावांचे दिल्ली हे निश्चित लक्ष्य होते आणि त्यासाठी त्यांना बुंदेल खंडासारखे संपन्न आणि मोगलांचे शत्रूराज्य कायम आपल्या बाजूने राहणे गरजेचे होते. ही गरज बाजीरावांनी ओळखली होती. पुण्यात, एकपत्नीत्वाच्या परंपरेमुळे हे लग्न सर्रास मान्य नव्हते. मस्तानी काही काळ बाजीरावां सोबत पुणे शहरातील शनिवार वाड्याच्या वाड्यात राहिली. राजवाड्याच्या ईशान्य कोपऱ्यात मस्तानी महल होता आणि त्याला मस्तानी दरवाजा नावाचा स्वतःचा बाह्य दरवाजा होता. बाजीरावांनी नंतर १७३४ मध्ये कोथरूड येथे राणी मस्तानीसाठी स्वतंत्र निवासस्थान बांधले. शनिवार वाड्यापासून काही अंतरावर कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिरात ती जागा आजही अस्तित्वात आहे.   

बाजीरावाची पहिली पत्नी काशीबाई हिला मुलगा झाल्यावर काही महिन्यांत दुसरी पत्नी म्हणजेच  मस्तानीला कृष्णराव नावाचा मुलगा झाला. मस्तानीच्या पोटी जन्मलेल्या आपल्या मुलाला पवित्र धाग्याने सजवून ब्राह्मण घोषित करावे अशी बाजीरावांची तीव्र इच्छा होती. पण बलाढ्य  व पराक्रमी असूनही बाजीरावही पुण्याच्या सनातनी ब्राह्मण पुरोहितांना पटवून देऊ शकले नाहीत. जड अंतःकरणाने त्यांना स्वतःच्या मुलास मुस्लिम म्हणून वाढवावे लागले. कृष्णराव हे नाव बदलून नाईलाजाने शेवटी समशेर बहादूर प्रथम असे ठेवण्यात आले.   

बाजीरावाच्या मृत्यूनंतर २८ एप्रिल १७४० रोजी मस्तानीचा मृत्यू झाला पण तिच्या मृत्यूचे कारण शेवटपर्यंत कोणालाच कळले नाही. काहींच्या मते, आपल्या पतीचा मृत्यू समजल्यानंतर धक्का सहन न झाल्याने तिचा मृत्यू झाला. काहींच्या मते बाजीरावाचा मृत्यू झाल्याचे समजल्या नंतर तिने विष प्राशन करून स्वतःला संपवून टाकले. असेही अनेकांचे मत आहे.

मृत्युनंतर राणी मस्तानीला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ गावात दफन करण्यात आले. तिच्या थडग्याला मस्तानीची मजार म्हणजेच समाधी  म्हणतात.   

बाजीराव पेशवे मस्तानी यांच्या प्रेम कहाणीचा साक्षीदार असलेल्या कसबे पाटस (तालुका दौंड, जिल्हा पुणे) येथील राजवाडे, बारव, तलाव व ऐतिहासिक अनेक वास्तू मात्र सरकारकडून, इतिहास प्रेमींकडून उपेक्षितच राहिल्या आहेत.

बाजीराव पेशवे यांचे जहागिरी व वतन म्हणून पाटस या गावाचा इतिहासात उल्लेख आहे. बाजीरावने मस्तानीला शिरूर तालुक्‍यातील पाबळला नेण्यापूर्वी पाटस येथे वास्तव्यास ठेवल्याची अनेक कांदबऱ्या व ग्रंथात नोंद आहे. दोन ते तीन वर्षे मस्तानी पाटस येथे वास्तव्यास होती. बाजीराव हे मस्तानीला भेटण्यास पाटसला येत असत, अशी नोंद अनेक कादंबऱ्या व समकालीन ग्रंथांत असल्याचे आढळते. बाजीराव यांनी मस्तानीला पाटस येथे राजवाडा बांधून दिला होता. त्या वाड्याला आजही मस्तानी वाडा म्हणून ओळखले जाते. गावाच्या पश्‍चिमेला असलेल्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर पाण्यासाठी बारव (विहीर) बांधण्यात आली आहे. तिला मस्तानीची बारव म्हटले जाते. श्री आनंदेश्वर मंदिर व त्यालगत तलाव बांधला असून, त्याला मस्तानी तलाव म्हणून ओळखले जाते.

मस्तानी वाड्याची दुरवस्था झाली आहे. वाड्या समोर त्या काळापासून दर्गा आहे. हा दर्गा मस्तानीच्या जवळच्या सेवेकऱ्यांचा असावा, असे सांगण्यात येते. बाजीराव मस्तानी यांच्या प्रेम कहाणीचा साक्षीदार असलेल्या पाटस येथील अनेक वास्तू सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.   

बाजीराव आणि मस्तानी यांच्या मृत्यूनंतर, विधवा काशीबाईंनी स्वतःची सवत मस्तानीचा सहा वर्षांचा मुलगा समशेर बहादूर (याचे नाव कृष्णराव) याला आपल्या घरी नेले आणि आपल्या कुटुंबाचा सदस्य समजुन योग्य पालन पोषण करून वाढवून मस्तानीचा पुत्र समशेर बहादर याला पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचे स्थान दिले, ह्याचे सगळेच श्रेय बाजीरावांची पहिली मराठमोळी पत्नी काशीबाई यांना आपण दिले पाहिजे. 

समशेर बहादूरला त्याच्या वडिलांच्या म्हणजे बाजीरावांच्या बांदा आणि काल्पीच्या वर्चस्वाचा काही भाग बहाल करण्यात आला. समशेर बहादूर एक प्रबळ योद्धा म्हणून मोठा झाला आणि १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत त्याचे सावत्र चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ आणि त्याचा सावत्र पुतणे विश्वासराव, जे नानासाहेबांचे चिरंजीव होते यांच्या समवेत अहमदशाह अब्दाली दुराणी विरुद्ध लढला. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या समवेत त्या लढाईत जेमतेम २७ वर्षांचे समशेर बहादूर तो जखमी झाला आणि काही दिवसांनी डीग येथे त्याचा मृत्यू झाला.    

समशेर बहादूरचा मुलगा अली बहादूर पहिला याला त्याच्या आजीच्या म्हणजे मस्तानीच्या हुंड्यात आलेले राजपुताना प्रांत देण्यात आले, झाशी, सागर आणि काल्पी, १८५७ च्या भारतीय बंडाच्या वेळी त्यांचा मुलगा नवाब अली बहादूर दुसरा याने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी पाठवलेल्या राखीला प्रतिसाद देऊन आणि ब्रिटिशां विरुद्ध लढा दिला. अली बहादूर (कृष्ण सिंह) यांनी बुंदेलखंडच्या मोठ्या भागावर आपला अधिकार प्रस्थापित करून बांदाचा नवाब बनला. 

वाचकहो! बांदा हे भारताच्या उत्तरप्रदेश राज्यात असून बुंदेलखंड प्रदेशात यमुना नदीच्या दक्षिणेला आहे. मस्तानी बद्दल मी माहिती संकलन  करताना मला गुगलबाबाने एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली ती म्हणजे प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब हा मस्तानीच्या नात्यातील होता.

लेखन व माहिती संकलन :

रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी

फोटो : गुगल 

माहिती संदर्भ व सौजन्य : गुगल व विकिपीडिया


😊

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या