🟩 मी भिकारी नाही, मी व्यापारी आहे.......‼️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 02/07/2025 :
एक भिकारी रेल्वे प्रवासादरम्यान लोकांकडून भीक मागत होता. तेवढ्यात त्याने एका सूट बूट घातलेल्या श्रीमंत शेठला पाहिले. भिकाऱ्याला वाटले, “हा माणूस खूप श्रीमंत वाटतो, याच्याकडून नक्कीच चांगली रक्कम मिळेल.” म्हणून तो त्या शेठकडे भीक मागायला गेला.
शेठने त्याला पाहिलं आणि विचारलं, "तू नेहमी मागतोसच, पण कधी कुणाला काही दिलं आहेस का?"
भिकारी म्हणाला, "साहेब, मी तर भिकारी आहे. माझ्याकडे काहीच नाही, मग मी इतरांना काय देणार?"
शेठ म्हणाला, "जेव्हा तू कुणाला काही देऊ शकत नाहीस, तेव्हा मागण्याचाही तुला अधिकार नाही. मी एक व्यापारी आहे. माझा विश्वास फक्त ‘देणं घेणं’ या व्यवहारात आहे. जर तुझ्याकडे काही देण्यासारखं असेल, तरच मी तुला काही देईन."
तेवढ्यात शेठचे स्टेशन आले आणि तो ट्रेनमधून उतरला.
भिकारी मात्र शेठच्या त्या एका वाक्यावर विचार करत राहिला. त्या विचारांनी त्याचं डोकं हलवून टाकलं. त्याला वाटलं, “कदाचित मला भीकच मिळत नाही कारण मी त्या बदल्यात कुणालाही काही देत नाही.” पण लगेचच दुसरा विचार डोक्यात आला, “मी तर भिकारी आहे, देणार काय?”
संपूर्ण दिवस तो याच विचारात घालवतो, पण उत्तर मिळत नाही.
दुसऱ्या दिवशी स्टेशनजवळ बसलेला असताना त्याला जवळच्या झाडांवर फुलं उमललेली दिसतात. त्याच्या डोक्यात विचार येतो, “जर मी लोकांना भीक दिल्यावर फुलं दिली, तर?”
हा विचार त्याला आवडतो. तो काही फुलं तोडतो आणि ट्रेनमध्ये जातो.
जेव्हा कोणी त्याला पैसे देतं, तो त्यांच्याकडे हसून बघतो आणि म्हणतो, "या पैशांसाठी तुमचं आभार! हे घ्या, हे फुल तुमच्यासाठी."
लोक ती फुलं आनंदाने स्वीकारतात. अशा पद्धतीने त्याचा भीक मागण्याचा व्यवहार हळूहळू बदलतो. आता त्याला अधिक लोक पैसे देतात. फुलं संपेपर्यंत लोक भीक देतात, फुलं संपली की पैसेही थांबतात.
अशातच काही दिवसांनी पुन्हा एकदा त्याला तोच शेठ ट्रेनमध्ये दिसतो. भिकारी लगेच त्याच्याकडे जातो आणि म्हणतो, "साहेब, आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला काही पैसे द्या, मी तुम्हाला फुलं देतो."
शेठ हसतो आणि पैसे देतो. भिकारी त्याला फुलं देतो.
शेठ म्हणतो, "वा! काय मस्त! आता तू पण माझ्यासारखा व्यापारी झालास."
ते ऐकून भिकाऱ्याच्या डोळ्यात चमक येते. तो ट्रेनमधून उतरतो, आकाशाकडे पाहून जोरात म्हणतो, "मी भिकारी नाही. मी व्यापारी आहे! मी शेठ होऊ शकतो, मी श्रीमंत होऊ शकतो!"
लोक त्याला पाहतात आणि समजतात की तो वेडा झाला आहे, पण दुसऱ्या दिवसापासून तो भिकारी त्या स्टेशनवर दिसेनासा होतो.
एक वर्षानंतर
त्याच स्टेशनवर दोन सूटबूट घातलेले माणसं गप्पा मारत ट्रेनमध्ये बसलेले असतात. त्यापैकी एकजण दुसऱ्याला हात जोडतो आणि म्हणतो,
"आपण पुन्हा भेटलो आहोत. ओळखलंत का मला?"
शेठ म्हणतो, "नाही, आपली पहिली भेट नाही आठवत."
तो हसतो आणि म्हणतो, "आपण एकदा नाही, दोनदा भेटलोय. मी तोच भिकारी आहे जो एके काळी फुलं देत असे. तुम्ही मला दोन वेळा काहीतरी दिलं. पहिल्यांदा समज दिली की जेव्हा काही देऊ शकत असेल तेव्हाच काही मागावं. आणि दुसऱ्यांदा समज दिली की मी फक्त भिकारी नाही, मी व्यापारी आहे."
"आज मी एक मोठा फुलांचा व्यापारी आहे आणि दुसऱ्या शहरात व्यापाराच्या कामासाठी जात आहे."
"तुम्ही मला माझी ओळख दिली."
तर सांगायचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की,
आपण स्वतःला काय समजतो, हेच आपलं वास्तव ठरवतं. भिकारी स्वतःला भिकारी समजत राहिला, म्हणून तो भिकारी होता. जेव्हा त्याने स्वतःला व्यापारी समजलं, तेव्हा तो व्यापारी झाला. स्वतःची खरी ओळख समजून घेणं हेच परिवर्तनाचं खरं बीज आहे.
समजून घ्या, आपण कोण आहोत, बाकी सगळं आपोआप घडतं.
jyotinimbalkar ©️®️
बोधकथा मराठी जीवनाचे सत्य motivational भावनात्मक
0 टिप्पण्या