पुण्यतिथी निमित्त लेख.......
चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ रहस्य कथा लेखक
बाबुराव अर्नाळकर
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/07/2025 :
आपल्या आवडीनिवडी सुद्धा आपल्या वयानुसार नकळत बदलत जातात. हा बदल कसा, केव्हा, सुरू होतो हे आपलंच आपल्याला देखील कळत नाही. हा बद्दल सूक्ष्म असला तरी एका आयुष्याच्या टप्प्यावर, वळणावर तो आपल्याला प्रकर्षानं जाणवायला लागतो. भटकंती मध्ये पूर्वी गजबजलेल्या जागी हिंडताना काहीच वाटतं नसे. उलट त्या वेळी मॉल, मेळावे, जत्रा, थियेटर पालथे घालतांना मनापासून आनंद मिळत असे. काही वर्षानंतर आपल्याला शांत ठिकाण, आपल्या घरीच राहणं आवडायला लागतं. एका विशिष्ट वयात भरजरी पोशाख घालायला खुप आवडतं तर काही वर्षांनी नाजूक, तलम, हलकी पयुरसिलक आवडते तर अजून काही वर्षांनी सुती साडीच फक्तं हवीहवीशी वाटायला लागते. ह्याच प्रमाणे वाचनाचे सुद्धा. आधी जे हाती पडेल ते सटरफटर देखील वाचून काढायचे. काही वर्षांनी मात्र चोखंदळपणें पुस्तकं निवडून वाचतो.
मध्यंतरी बस मधे एक मुलगी वाचनात इतकी गढली होती की तिला तिचा स्टॉप आला तरी त्या तंद्रितून ती बाहेरच येईना. जोरजोरात पुकारा झाल्यानंतर ती मग हडबडून उठली. अर्थात तिला वाचतांना बघून खुप आनंद झाला आणि आपलं स्वतःच लहानपण आठवलं.
मला एकदम माझ्या मामाच घर आठवलं. त्याच्या घरी जाण्याचे एक आकर्षण म्हणजे त्याच्या घरी असलेली मोठ्ठ्या कपाटभर असलेली बाबुराव अर्नाळकर ह्यांची रहस्यकथाची पुस्तके. आज सुप्रसिद्ध आवडते लेखक बाबुराव अर्नाळकर ह्यांचा स्मृतिदिन.
ह्यांचे खरे नावं चंद्रकांत सखाराम चव्हाण. हे बाबुराव अर्नाळकर ह्या टोपण नावाने जवळपास चौदाशे, पंधराशे रहस्य कथा लिहीण्यामुळे गिनीज बुकमध्ये नोंद झालेले बहुतेक हे पाहिलेच मराठी लेखक.
गुप्तहेर झुंजार, सुदर्शन, धनंजय, रामराव, काळा पहाड यासारखी शंभर मानसपुत्र कथामधे जन्माला घातली. ही पुस्तके वाचणाऱ्या लोकांना झुंजार, विजया, काळा पहाड ऊर्फ चंद्रवदन, सुहासिनी, धनंजय छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे सगळे खुप जास्त आवडायचे. बाबुराव ह्यांनी नाटके, ललित साहित्य देखील लिहिले परंतु वाचकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले ह्यांच्या रहस्य कथांना. मंगेशकर कुटुंबीयांचा आणि ह्यांचा खुप घरोबा होता. ह्यांच्या लिखाणातील खासियत म्हणजे हे लिखाण त्यांनी शेवटपर्यंत निर्भेळ ठेवले.त्यांच्या रहस्य कथांमध्ये त्यांनी कधीही जादूटोणा, मंत्रतंत्र, भूत पिशाच्च, पर ग्रहावरील जीव अशा गोष्टी येऊ दिल्या नाहीत. बुवाबाजी ला थारा दिला नाही.त्यांच्या रहस्य कथा म्हणजे बुध्दी चातुर्य, हिंमत, साहस ह्यांचा सुरेख मिलाफ असायचा.
त्यांच्या लिखाणातील एक नायक हा रात्री काळ पहाड बनून अन्याया विरूद्ध पुरावे गोळा करायचा आणि दिवसा उजेडी तोच नायक चंद्रवदन होऊन पीडितांना न्याय द्यायचा. सामान्य जनतेचे शत्रू असलेल्या बदमाशाला अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचा. ह्याशिवाय गोलंदाज, कोदंडराव, अशीही पात्र होती. धर्मसिंग हा त्यातील बदमाश तसेच शेरखान व सुंदरा ही झुंजार विजया प्रमाणेच एक जोडी, दर्यासारंग एक चाचा. आबा दरेकर हे एक बेरकी पात्र. पोलिस निरीक्षक आनंदराव हे पण एक अफलातून व्यक्तिमत्व त्यांनीच लेखनातून खुलविले.
5 जुलै 1996 रोजी त्यांचें निधन झाले.त्यांच्या लेखनाच्या स्मृती जागवत त्यांना ही आदरांजली.
कल्याणी बापट(केळकर)
9604947256
बडनेरा अमरावती
05/07/2025
0 टिप्पण्या