‼️ राजा बिरबल ‼️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 01/06/2025 : अकबर हा मध्ययुगीन इतिहासात मोगल साम्राज्याचा तिसरा शासक. त्याचा जन्म १५ ऑक्टोबर १५४२ रोजी पाकिस्तान मधील अमरकोट येथे झाला. अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टी सर्वांना परिचित आहेत. त्यामध्ये कायम बिरबल या गोष्टी मधून हुशार होता हे दिसून येते. बिरबल हा अकबराच्या ‘नवरत्न’ दरबारातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. पण बिरबल कोण होता? त्याचे मूळ नाव काय? अकबराच्या दरबारात त्याने स्थान कसे मिळविले?
राजा बिरबल चे मूळ नाव हे महेशदास होते. याचा जन्म हा उत्तरप्रदेश मधील कानपुर पासून ७८ किमी अंतर असलेल्या काल्पी (जिल्हा जालौन) या गावात १५२८ मध्ये झाला. याच्या आजोबांचे नाव हे रूपंधर असून वडिलांचे नाव गंगादास होते. बिरबल हा वडिलांचा तिसरा मुलगा होता. बिरबलला त्याच्या आईने आपल्या माहेरी वडिलांकडे शिकायला ठेवले. बिरबलाने वयाच्या ५ व्या वर्षापासून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. लहानपणीच त्याने हिंदी, संस्कृत, फारसी या भाषा उत्तम रीतीने शिकल्या. फारसी शिकण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या काळात मुघलांचे भारतावर राज्य होते आणि भारतात सगळे पत्रव्यवहार हे फारसी मध्ये होत असत. या शिक्षणाच्या काळात त्याने कविता रचणे आणि गाणे म्हणणे या कला आत्मसात केल्या. ह्या गोष्टी करत असताना त्याची बुद्धी अजून तल्लख झाली. कोणताही श्लोक तो पटकन म्हणून दाखवत असे.
या सर्व गोष्टीमुळे तसेच त्याच्या मधुर आवाजामुळे तो काल्पी आणि आजूबाजूच्या परदेशात प्रसिध्द झाला. तसेच बिरबल हा उत्तम कथाकार होता. लोकांना विविध कथा सांगणे आणि त्यातून महत्वाच्या गोष्टी पटवून देणे ही त्याची ओळख आजूबाजूच्या गावात झाली होती. या सर्व गोष्टींमुळे त्याने भाठ्याचा राजा रामचंद्र यांच्याकडे नोकरी केली. त्याच्या नंतर त्याने अंबर येथील दरबारात देखील काही काळ नोकरी केली. या संपूर्ण काळात तो ‘ब्रम्ह कवी’ या नावाने प्रसिध्द होता. याच काळात त्याचे कालिंजर येथील एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीशी झाले. त्याच्या आधी पर्यंत त्याची जास्त परिस्थिती नसल्याने तो स्वतः भिक्षुकी करून आणि गायन आणि कथाकथन करून पैसे मिळवत असे.
बिरबल च्या नावाची चर्चा आजूबाजूच्या गावापर्यंत जेव्हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, ते अकबराच्या कानापर्यंत जाऊन पोहोचले. अकबराच्या दरबारात त्याला बोलावले असता त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर अकबराचे मन जिंकले. याच दरम्यान अकबराने तानसेन आणि बिरबल यांच्या गाण्याची जुगलबंदी देखील केली होती, आणि हे दोघेही एकमेकांना पुरून उरले होते. जवळपास दीड दिवस तानसेन आणि बिरबल यांची जुगलबंदी चालली होती. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अकबर हा आपला दरबार रात्री भरवायचा. या गोष्टीने अकबराचे मन बिरबलाने जिंकले आणि अकबराच्या दरबारात प्रवेश मिळवला.
बिरबलाची उपजत बुद्धी ही तल्लख होती. बिरबल हा दरबारात मुळातच प्रसिध्द होता, तो प्रसंग बघून विनोद करणे आणि हजरजबाबी पणासाठी. बिरबल हा अकबराच्या दरबारातील एकमेव हिंदू होता, ज्याचे सल्ले अकबर ऐकत असे. बिरबलाची काव्य प्रतिभा इतक्या उंच दर्जाची होती की, त्याने सांगितलेल्या गोष्टी, सल्ले, वेगवेगळ्या ठिकाणच्या कहाण्या आज अजरामर झाल्या आहेत. हिंदीत ‘कविराय’ म्हणजेच ‘राजकवी’ हा किताब मिळवणारा पहिला माणूस 'बिरबल’ हा होय.
बिरबलाच्या कामावर खुश होऊन काही दिवसांनी अकबराने त्याला ‘कांग्रा’ जिल्ह्यातील नागरकोट हे गाव जहागिरी म्हणून दिले. यानंतर लगेचच त्याच्या उत्तम वकीलातीमुळे त्याला अकबराने सुभेदारीची वस्त्रे ‘राजा’ हा किताब आणि ‘कालिंजर’ येथील जहागिरी देण्यात आली, तसेच २००० ची मनसबदारी दिली. १५८३ साली न्यायखात्यावर बिरबलाची नेमणूक झाली. या न्यायखात्यात बिरबलाचे काम हे अर्ज दाखल करून त्याची छाननी करणे आणि न्याय मागण्यासाठी आलेल्या लोकांना अकबराच्या दरबारात उभे न्यायासाठी उभे करणे हे होते. काही महत्वाच्या जिनसा खरेदी करणे आणि विक्री करणे हे देखील काम त्याच्याकडे होते. खूप हिंदू राजांकडे तसेच इराणच्या बादशाह कडे बिरबल बऱ्याचदा ‘अकबर’ याचा वकील म्हणून गेलेला आहे. अकबराने जो ‘दिन-ए-ईलाही’ हा पंथ स्थापन केला तेव्हा त्या पंथाचा हा एकमेव हिंदू अनुयायी होता.
स्वतः बिरबल हा सूर्यउपासक होता. अकबर आणि बिरबल यांचे जेवढे संदर्भ आहेत त्यात बऱ्याच ठिकाणी हेच आढळून येते की, अकबराला सूर्यउपासनेकडे बिरबलाने वळविले. जेव्हा अकबर हा सर्व धर्मगुरूंशी चर्चा करायला बसत असे, तेव्हा स्वतः बिरबल तेथे असे. अकबराचे राहणीमान बदलण्यास आणि विचार हे हिंदू धर्मासाठी अनुकूल करण्यात बिरबलाचा महत्वाचा वाटा होता.
१५८६ च्या दरम्यान ‘स्वात’ आणि ‘बाजोर’ येथील डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या ‘युसुफझाई’ या टोळ्यांच्या विरुध्द अकबराने जी मोहीम उघडली होती त्या मोहिमेसाठी अकबराने बिरबल यास निवडले. या मोहिमेवर आधीच झैन खान कोका आणि सैद खान हे होतेच, परंतु झैन खान कोका याच्या हाताखाली अजून सैन्य पाठवायचे अकबराने ठरविले. जे सैन्य अकबराने पाठवले त्याचे आधिपत्य हे राजा बिरबल याला दिले. याचे अजून एक मुख्य कारण असे होते की, या सर्व काळात अबुल फझल आणि बिरबल यांनी अकबराची खूप मर्जी संपादन केली होती. या युसूफझाई यांच्या विरुध्द आखलेल्या मोहिमेसाठी अबुल फझल जाणार की बिरबल जाणार या चर्चा संपूर्ण दिल्लीत रंगल्या होत्या.
टीकाकारांना प्रतीउत्तर देण्यासाठी अबुल फझल आणि बिरबल हे दोघेही फार उत्सुक होते. दोघांना देखील या मोहिमेवर जायचे होते. परंतु मोहिमेवर कोणीतरी एकजण जाऊ शकत होता, म्हणून अकबराने दरबारात चिठ्या टाकल्या. चिठ्यांचा निकाल हा बिरबलच्या बाजूने लागला. २२ जानेवारी १५८६ रोजी बिरबलाला सैन्यात दाखल व्हायला परवानगी मिळाली. दानिषकोल च्या वाटेने झैन खान कोका हा बाजोरात येथे शिरला आणि तेथील ताबा घेऊन स्वातच्या दिशेने निघाला. या स्वात मध्ये ४०००० टोळीवाले राहात होते. स्वात नदीच्या किनाऱ्याच्या पलीकडे चकदरा येथे झैन खान कोका याने एक किल्ला बांधला. याच दरम्यान या युसुफझाई यांच्या विरुध्द मोहिमेत झैन खान कोका याला बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह अटक येथून पेशावर आणि तेथून स्वात नदीच्या जवळ असलेल्या समाहा पठाराच्या उत्तरेकडे जाण्यास निघाले.
दुर्दैवाने याच वाटचाली दरम्यान बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह यांच्यात भांडण सुरू झाले. या भांडणाचे मुख्य कारण होते, ते म्हणजे आप आपले अधिकार आणि प्रतिष्ठा मोठी आहे असे ते दोघेही समजत होते. मालखंड येथील खिंडीत झैन खान कोका आणि बिरबल व हकीम अब्दुल फतेह यांचे सैन्य एकत्र येऊन मिळाले. परंतु दोन्ही सेना नायकांच्या मध्ये बरीच भांडणे झाली. शेवटी चकदऱ्याच्या किल्ल्यात एकत्र बसून भांडणे सोडवण्याचा निर्णय घेतला आणि तेथेच पुढील गोष्टी कश्या करायच्या याची सल्ला मसलत करण्याचे ठरविले. त्यामध्ये असे ठरले की, जिंकून घेतलेल्या भागाचे रक्षण करायला झैन खान कोका मागे राहील आणि काराकार व बुनेर येथील टोळीवाल्यांचे पारिपत्य हे बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह हे करतील; असा सल्ला झैन खान कोका याने सुचविला. तसेच याच्या विरुध्द देखील पर्याय त्यांनी सुचविला, परंतु बिरबल याने झैन खान कोका याचा सल्ला ऐकला नाही.
पहाडी टोळ्यांचा बंदोबस्त करावा, त्यांचा मुलुख घेऊ नये, असा आदेश त्यांना मिळाला होता, हे बिरबलाचे म्हणणे होते. परंतु बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह या दोघांना युध्दाचे डावपेच जास्त माहिती नसल्याने त्यांना हे लक्षात आले नाही की, या टोळ्यांची घरे जप्त करणे फार महत्वाचे आहे. परंतु बिरबल याचे अकबराच्या दरबारातील वजन बघता झैन खान कोका याने स्वतःचा आग्रह धरला नाही. १२ फेब्रुवारी १५८६ रोजी सगळे सेनापती हे चकदऱ्याच्या किल्ल्या मधून बाहेर पडले आणि कराकार येथे निघाले. दुसऱ्या दिवशी कराकार येथील जवळच्या खिंडीत लढाई झाली आणि बादशाही सैन्याचा विजय होऊन हजारो टोळीवाले कैद केले. दुसऱ्या दिवशी देखील खूप युध्द झाले, त्यात बादशाही सैन्यावर मागून देखील युसुफझाई टोळ्यांनी हल्ला चढवला आणि बादशाही सैन्याची खूप हानी केली.
संपूर्ण डोंगराळ मुलुखात पुढे जात असताना १६ फेब्रुवारी १५८६ रोजी झैन खान कोका याने एक धोक्याची सूचना बिरबलाला दिली की, शत्रू रात्री हल्ला करेल, परंतु ती सूचना बिरबलाने मान्य केली नाही. बिरबलाचे सैन्य हे एका अरुंद खिंडी जवळ पोहोचले आणि सूर्यास्त झाला. अंधाराचा फायदा घेऊन अफगाणी टोळ्यांनी बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह यांच्या खिंडीतील सैन्यावर हल्ला चढवला. दगड धोंड्याचा मारा संपूर्ण मुघल सैन्यावर चारही बाजूने व्हायला लागला. यात बिथरलेले सैन्य हे सपाटीच्या बाजूला पळत सुटले. या गोष्टीमुळे सैन्याची महत्वाची फळी अस्ताव्यस्त होऊन गोंधळ वाढला. मुघल सैन्यामधले पळत असलेले लोकं मारले गेले. याच दरम्यान बाकीचे सैन्य चुकून एका घळी जवळ पोहोचले. तेथे युसुफझाई’ टोळ्यांनी बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह यांच्या जवळील ८००० सैनिकांची कत्तल केली. यामध्ये जीवानिशी पळून जाणारा बिरबल मात्र मारला गेला आणि झैन खान कोका व हकीम अब्दुल फतेह हे थोडक्यात बचावले.
जेव्हा या स्वात जवळील खिंडीत झालेल्या हल्ल्यात बिरबल मारला गेल्याचे वृत्त दुसऱ्या दिवशी अकबर याला कळाले तेव्हा त्याला खूप दु:ख झाले. याबाबत अबुल फझल लिहितो की, स्वामिनिष्ठ नोकरांचा मृत्यू त्यातल्या त्यात धार्मिक बाबी मधला त्याचा सहकारी असलेला बिरबल मारला गेल्यामुळे बादशहाला अतिशय वाईट वाटले. दोन दिवस त्याने अन्नपाण्याला स्पर्श देखील केला नाही.
बिरबल याच्या मृत्य बाबत बदायुनी पुढील प्रमाणे लिहितो, बिरबलाच्या मृत्यु मुळे बादशहाला जितके दु:ख झाले तितके दु:ख कोणत्याही सरदाराच्या मृत्यू मुळे झाला नाही. घळीत पडलेला बिरबलाचा मृतदेह आणून त्याला अग्नी सुध्दा देता आला नाही ही अत्यंत दुःखद घटना आहे. बिरबलाचा विश्वासघात केला म्हणून बादशहाने झैन खान कोका आणि हकीम अब्दुल फतेह यांना दोष दिला. एकंदिरतच बिरबल हा अकबराचा अत्यंत विश्वासू होता. तसेच दोघात खूप चांगली मैत्री होती. असे हे बिरबल याचे चरित्र मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.
अनुराग वैद्य
संदर्भ : थिंक मराठी
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या