पुण्यश्लोक कर्मयोगिनी : अहिल्याबाई होळकर

 

पुण्यश्लोक कर्मयोगिनी : अहिल्याबाई होळकर

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 01/06/2025 :       भारताच्या इतिहासात अनेक समाजसुधारक, महापुरुष आणि वीरांगना यांनी आपली कर्तबगारी दाखवून दिलेली आहे. याच इतिहासाच्या एका पानांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा उल्लेख करावा लागतो, त्यांची आज ३०० वी जयंती. त्या महान शासक, पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धरही  होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेऊन, त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय मिळविला. 

🟡 बालपण , शिक्षण आणि संस्कार : पुण्यश्लोक  अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५  महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड जवळील चौंडी येथे झाला. अहिल्याबाई  यांचे आजोळ चोराखळी जि. धाराशिव (उस्मानाबाद ) मामांचे आडनाव मैंदाड होते.  त्यांचे वडील गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या ! त्यांचे वडील आधुनिक विचारसरणीचे असल्याने त्यांना नेहमीच वाटत होते,”की महिलांनी शिक्षित व्हायला हवं. ज्या काळात महिलांना घराचा उंबरठा ओलांडण्याची परवानगी नव्हती,त्या काळात माणकोजी शिंदेनी आपल्या मुलीला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.” बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या, कोणताही विषय त्यांना फार सहजपणे अवगत होत असे. अद्भुत, साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सर्वांना चकित करून सोडले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षकाळात देखील विचलित न होता आपलं लक्ष्य प्राप्त , केल्यामुळेच आदर्श ठरल्या.

*विवाह आणि अपत्ये :  भूकेल्याना  अन्न भरवत असतांना छोट्याश्या अहिल्येला पुण्याला जात असलेले मावळ प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांनी पाहीलं. त्यावेळी ते चौंडी येथे विश्राम करण्याकरता थांबले होते. बालवयातच अहिल्याबाईंमधील दया,प्रेम आणि  करुणा पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले, कि त्यांनी लगेचच माणकोजी  शिंदे यांच्याकडे आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्येला मागणी घातली. त्यानंतर १७३३मध्ये वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत झाला. अशा पध्दतीने बालवयातच त्या मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध असणाऱ्या होळकर कुटुंबाच्या सुनबाई झाल्या.   लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे १७४५ साली अहिल्याबाईंना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नाव मालेराव. पुढे तीन वर्षांनी म्हणजे १७४८ ला मुक्ताबाई नावाची  कन्या झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत,  त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित देखील करीत असत. खंडेराव स्वतः उत्तम युद्धचातुर्य होते. वडिलांच्या नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य आत्मसात केले होते.   अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वातील एवढ्या गुणांमागे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. वेळोवेळी मल्हाररावांनी आपल्या सूनबाईंना सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. अहिल्याबाईंमधील अद्भुत प्रतिभा पाहून मल्हारराव खूप समाधानी होत असत.

*जीवनातील कठीण प्रसंग आणि संघर्ष :-  अहिल्याबाईंचं आयुष्य सुखासमाधानाने व्यथित होत असतानांच अचानक त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला. १७५४ मध्ये  अहिल्याबाई फक्त २१ वर्षांच्या असतानाच,  त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाले.    इतिहास अभ्यासकांच्या  मते तत्कालीन परिस्थिती व परंपरानुसार आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पतीनिधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना  रोखले. पुढे १७६६ मध्ये  मल्हारराव होळकरांचे देखील निधन झाले.     अहिल्याबाईंना अतिशय दुखः झाले, तरीदेखील हताश न होता पुढे मावळ प्रांताची जवाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या थोड्याच दिवसांमध्ये १७६७  मध्ये मुलगा  मालेरावांचाही  मृत्यू झाला.  अहिल्याबाईंवर आभाळ कोसळलं. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे असलेले सासरे यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला,  तो  कौतुकास्पदच नव्हे तर आदर्श घेण्यासारखेच आहे.

🟣 कर्मयोगिनी, कुशल राजनीतिज्ञ आणि प्रभावशाली शासक म्हणून लौकीक:-  आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळल्या नंतर देखील अहिल्याबाईंनी धीर खचू दिला नाही. वैयक्तिक दुःखाचा प्रभाव त्यांनी प्रजेवर पडू दिला नाही. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळणाऱ्या आपल्या मावळ प्रांताला पाहून त्यांनी स्वतः उत्तराधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पेशव्यांच्या पुढे मागणी केली. त्यानुसार ११ डिसेंबर १७६७ रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली. अहिल्याबाईंनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर राज्यातील बऱ्याचलोकांनी याचा विरोध देखील केला. परंतु लवकरच त्यांच्यातील अद्भुत शक्ती आणि पराक्रमाला पाहून जनता त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवू लागली. इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यावर मल्हाररावांचे दत्तक पुत्र आणि सर्वात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले. आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर रहात असत. युद्ध प्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई पराक्रमी योध्याप्रमाणे शत्रूवर बाण चालवीत असत. ज्या सुमारास अहिल्याबाईंनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळी प्रांतात अशांततेचं वातावरण पसरलं होतं.  राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लुट, हत्या, या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर नियंत्रित करण्यात अहिल्याबाईं यशस्वी झाल्या. आणि आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं. पुढे त्यांच्या राज्याचा कला, व्यवसाय, शिक्षण, या क्षेत्रात उत्तम विकास झाला.।  कालांतराने अहिल्याबाईंच्या शौर्य आणि साहसाची चर्चा अवघ्या सगळीकडे होऊ लागली. त्या एक दुरदृष्टी असणाऱ्या शासक होत्या, आपल्यातील नैपुण्याने त्या शत्रूचा हेतू ओळखून घेत असत. ज्या सुमारास पेशव्यांना एका प्रकरणात इंग्रजांचा दृष्टं हेतू लक्षात आला नाही त्यावेळी अहिल्याबाईंनी पुढे होत पेशव्यांना त्याविषयी अवगत केले होते. महान शासक अहिल्याबाईंनी आपल्या राज्याच्या विस्ताराकरता अनेक चांगली कामं केलीत. आपल्या राज्याचा विकास व्यवस्थित होण्याच्या उद्देशाने त्यांनी राज्याला वेगवेगळे  तालुके आणि जिल्ह्यांमध्ये विभागले. ग्रामपंचायतीचे काम सुरळीत करून न्यायालयांची स्थापना केली. अहिल्याबाईंची गणना आता आदर्श शासकाच्या रुपात सर्वदूर होऊ लागली होती.

*सामाजिक आणि रचनात्मक कार्य : १८ व्या शतकात इंदौर शहराजवळ अहिल्याबाई होळकर यांनी  महेश्वर येथे नर्मदा नदीच्या काठावर एका भव्य,दिव्य आणि आलिशान राजवाड्याची निर्मिती केली. तत्कालीन परिस्थितीत  साहित्य, संगीत, कला, आणि उद्योग क्षेत्रात महेश्वर ओळखले जात होते .

🟢 ७/१२ संकल्पना :- आपल्या देशामध्ये घराचा व्यवहार करताना सातबारा उतारा आणावा लागतो, सातबारा हे कुठल्याही कायद्याचे कलम नाही, तर हे अहिल्याबाई होळकर यांनी यांनी दिलेले योगदान आहे. त्यांनी सरकारी खर्चाने गरीब माणसाच्या दारात १२ फळझाडे लावली. त्यातील ७ झाडे सरकारची असे सांगितले. १२ झाडांची निगा राखून  ७/१२ फळे स्वतः खायची आणि राहिलेल्या ५/१२ सरकारी जमा करायची, ती इतर गरिबांना वाटण्यासाठी , त्यासाठी एक सरकारी  दप्तर निर्माण करुन या झाडाची नोंद करण्यात आली, तेंव्हापासून  याच नोंदीच्या उताऱ्याला सात बारा म्हणण्याचा प्रघात पडला, तो आजही चालू आहे.

*विधवा महिला आणि सामाजिक  कार्य: अहिल्याबाईनी स्त्रियांची परिस्थिती बदलण्याकरीता  अनेक प्रयत्न केले , म्हणजेच त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचा पुररस्कार केला.त्यामध्ये  विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता  प्रचलित कायद्यात बदल करून विधवांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा अधिकारही मिळवून  दिला. आपल्या आयुष्यात आलेली अनेक संकटं पार करत अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने दुर्दम्य आशावादाने स्त्रीशक्तीचा वापर केला,  तो खूप प्रशंसनीय आहे. महिलांकरीता त्या कायम एक प्रेरणास्त्रोत म्हणूनच राहतील एकदा अहिल्याबाई घोड्यावर बसून शेताकडे जात असताना वाटेत दोन वाटसरू त्यांना दिसले. वाटसरूंनी त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मिळेल का? अशी विचारणा केली. त्यांवर अहिल्याबाई म्हणाल्या, ‘तहानलेल्यांना फक्त पाणीच न देता दोन घास आधी जेवू घालणे हा आमचा धर्म आहे.’ तेव्हा न डगमगता अहिल्याबाईंनी त्यांना आपल्या शेतावर नेले. तेथे पाणीच न देता भाकरी, कांदा आणि चटणी देऊन त्यांना जेवू घातले. त्यांच्या हृदयात  दया, प्रेम,परोपकार, निष्ठा आदी भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच अहिल्याबाईना संवेदनशील समाजसेविका असेही म्हटले जाते. अहिल्याबाईंनी विविध ठिकाणी धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांचे ,निर्मिती  केले. याबरोबरच मोठ्या कौशल्याने आणि कुशाग्रतेने  किल्ले, विश्रामगृह, विहिरी , रस्त्यांची निर्मिती केली. एवढेंच नाही, तर शिक्षणाचा प्रचार-प्रसार करून  कला-कौशल्य क्षेत्रात सुद्धा आपले अभूतपूर्व योगदान दिले. *इंदौर शहराला सुंदर आणि समृद्ध : आपल्या एकूण ३० वर्षांच्या अद्भुत कारकिर्दीत अहिल्याबाईंनी इंदौर या छोट्याश्या शहराला समृद्ध आणि विकासात्मक बनविण्यात आपले अमुल्य योगदान दिले आहे. येथील रस्त्यांची स्थिती, भुकेलेल्या जीवांसाठी अन्नछत्र, शिक्षण या संबंधी अद्वितीय कार्य केले आहे. त्यांच्यामुळेच इंदौर शहराची ओळख समृद्ध आणि विकसित शहरांत केली जाते.

🔵 शिवाप्रती असलेली दृढ श्रद्धा आणि समर्पण:  महाराणी अहिल्याबाईंनी फक्त आपल्या प्रांतातच नव्हे तर संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी धार्मिक मंदिरांची, धर्मशाळांची, निर्मिती केली. त्यामध्ये द्वारका, रामेश्वरम, बद्रीनारायण, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथ पुरी, काशी, गया, मथुरा, हरिद्वार,उज्जैन, नाशिक आणि परळी वैजनाथ यांसारख्या अनेक मंदिरांचा  जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी  धर्मशाळा उभारल्या. तसेच अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या, त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक पाणपोई आणि अन्नछत्र उघडली.  त्यांच्या  शिवाप्रती असलेल्या निस्सीम भक्तीसंदर्भात आख्यायिका आहे की,” अहिल्याबाई राजाज्ञा देतांना स्वाक्षरी करतांना शिवाचे नाव लिहित . तेंव्हापासून स्वराज्य मिळेपर्यंत इंदौर येथे जेवढयाही राजांनी सत्ता सांभाळली…राजाज्ञा भगवान शंकराच्या नावानेच निघत राहिली, शिवावर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास होता. असं म्हणतात कि त्यांच्या स्वप्नात एकदा शिवाने दर्शन दिले होते. त्यानंतर १७७७ मध्ये त्यांनी जगप्रसिद्ध असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.

*महाराणी अहिल्याबाईंना मिळालेला सन्मान आणि गौरव : पाश्चात्त्य विचारवंत जॉन माल्कम या संदर्भात एक अभिप्राय नोंदवतात तो अतिशय समर्पक आहे भारताला अहिल्याबाई अशी एक राणी मिळाली की जिच्या ठिकाणी गंगेचे पावित्र्य सागराचे गांभीर्य सूर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता यांचा मनोहर मिलाफ झालेला होत.  *इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली. या अनेक विचारवंतांनी त्यांची तुलना केली ते अतिशय समर्पक आहे.        *भारत सरकार डाक खात्याच्यावतीने अहिल्याबाई होळकर यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याच्या पुररस्कारार्थ  दि. २५  ऑगस्ट १९९६ रोजी   तिकीट प्रकाशित  केले. तसेच  अहिल्याबाई च्या स्मृतीप्रित्यर्थ अभिवादन म्हणून इंदूरमध्ये त्यांच्या नावाने जनतेची सेवा करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीस प्रतिवर्षी पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार नानाजी देशमुख यांना मिळाला होता. इंदूरच्या विद्यापीठाला त्यांचे नाव आहे तसेच. महाराष्ट्र सरकारने सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाईचे नाव दिले आहे.

*महाराणी अहिल्याबाईंचा मृत्यू : आपल्या प्रजा, जनहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांना १३ ऑगस्ट १७९५ रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या ७० व्या वर्षी देवाज्ञा झाली. परंतु त्यांच्यातील उदारता,  त्यांनी समाजाकरता केलेल्या असंख्य कार्यामुळे,  त्या आजही सर्वांच्या स्मरणात आहेत , आपल्या आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणी, संघर्षाला  तोंड  देत , झुंज देत लढत राहिल्या, कधीही परिस्थितीला शरण गेल्या नाहीत.  अत्यंत  प्रतिकूल परिस्थितीत देखील एका आईप्रमाणेच आपल्या प्रजेचा सांभाळ केला. म्हणूनच त्यांना राजमाता आणि लोकमाता म्हणूनही ओळखले गेले. थोडक्यात अहिल्याबाई  कर्मयोगिनी, नारीशक्ती,, साहस, आणि न्यायप्रिय राजतंत्राचे एक  उदाहरण म्हणून वर्षानुवर्षे कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहतील. अशा या कर्मयोगिनी पुनश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।।

✍️ प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, कळंब  

मो.९४२०९५८६९९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या