🟢 मन इंद्रधनू 💢 मनाचे मोरपंख शोधा

🟢 मन इंद्रधनू 

💢 मनाचे मोरपंख शोधा            

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 26/03/2025 : कसलाही गुंता झाला की हळुहळु संयमाने सोडवावा लागतो, मग तो दोर्‍याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि तसेच आपणही. हे तुटणं अतिशय वाईट... किंबहुना खूपच क्लेश दायक. आपल्याला क्लेश नको असतात. आपल्याला आनंद हवा असतो आणि या निखळ आनंदाचा शोध घेण्यासाठी आपण धडपडायचं असतं.

तर मंडळी, आपण ज्यावेळी आपल्या घराची रचना करतो तेव्हा समोरासमोर दारे-खिडक्या येतील याची काळजी घेतो. घरात खेळती हवा व भरपूर उजेड यावा आणि घरातील वातावरण आरोग्यदायी रहावे हा त्यामागील हेतू असतो.

अगदी त्याच प्रमाणे आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मन मोकळे होणे गरजेचे असते. 

मनाचे दरवाजे व खिडक्या म्हणजे नेमकं काय? तर आपली जवळची, अगदी खात्रीलायक अशी विश्वासाची आपली माणसे. ..ज्यांच्याजवळ आपण आपल्या मनातील ताण-तणाव मोकळे करू शकतो.

तणावमुक्त, हलके-फुलके व प्रसन्न मन म्हणजेच शुद्ध मन. हे शुद्ध मन आपले आरोग्य जपते. मनाचा कोंडमारा होत असेल, कोणाजवळ मोकळे करता येत नसेल तर आतमध्ये जी घुसमट होते ती फक्त मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम घडवून आणते. 

आपल्या मनातील आनंदाचे, दुःखाचे, चिंतेचे जे काही विचार असतील ते व्यक्त करण्यासाठी आपण आपले जवळचे नातेसंबंध जपायला हवेत व एकमेकांना मानसिक आधार देत रहायला हवे.

अमर प्रेम मध्ये किशोर कुमार ज्याप्रमाणे म्हणतो 

कुछ तो लोग कहेंगे

लोगों का काम है कहना

छोडो बेकार की बातो में  

कहीं बीत न जाये रैना 

लक्षात घ्या की आपल्याकडे विरोधकांची संख्याच नेहमी जास्त असते. कधीकधी त्यांचे पारडे देखील जड होतेच.

लोक जेव्हा कधी तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा, घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करत असतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. आपण फक्त आपल्या चांगल्या उद्दिष्टांवर फोकस करण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित केले पाहिजे.

त्यासाठी जे झालं ते झालं. सतत त्याच त्याच गोष्टीं बद्दल बोलणं किंवा विचार करणं आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. आयुष्य छोटसं असतं, त्यात पण आपण बिनकामाच्या गोष्टींवर भरपूर वेळ वाया घालवतो. हसत रहा.. इतरांना हसवत राहा..!!  खूप स्कोप आहे. वेळ फुकट नाही घालवला याचा आनंद तरी होईल.

आयुष्यात तीन प्रकारचे लोक येतात, एक तुम्ही चुकलात तर तुमची चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे,  दुसरे तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट पहाणारे... व तिसरे तुमच्या कडून चूक झाल्यानंतर तुमची बदनामी करून तुमची वाट लावणारे.. !!! आपण आपल्या मनाला चुकीच्या दृष्टीने विचार करायला भाग पाडायचे नाही. किंबहुना ते आपल्याच हातात आहे, कारण आपल्या हातून चूक व्हावी यासाठीच लोक प्रयत्नशील असतात ना...!!!

आपण जेव्हा विचारातले सौंदर्य शोधतो त्यावेळी शब्दातील सौंदर्य कळते. शब्दांतले सौंदर्य शोधायला लागलो की संवादातले सौंदर्य कळते...आणि जेव्हा संवादातले सौंदर्य कळते तेव्हा नाती सुंदर होतात.

नाती सुंदर झाली की आयुष्य सुंदर होते. त्यामुळे एक अतिशय चांगली गोष्ट होते ती म्हणजे आपपर भाव गळून जातो.

परवा एकाने विचारले..," हे सर्व करण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?"  मी म्हणाले," तुम्हाला अपडेट व अपग्रेड व्हायला हवं.  मला सांगा की मोबाईल अपडेट व अपग्रेड झाल्यानंतर काय होतं?

तो अधिक कार्यक्षम बनतो. हो ना? मग तर माणसानेही अपग्रेड व्हायला हवं.

त्यासाठीच संवाद, सहवास अन् अनुभव या गोष्टी आवश्यक आहेत आणि जर तुम्हाला माध्यम सापडलंच नाही तर ते शोधावं लागणार."

मग मी पुढे त्यांना विचारले की," सहवास म्हणून तुम्हाला घाव घालणारी कुऱ्हाड आवडेल की मोरपंख ,मोरपीस आवडेल ?" तर ते म्हणाले की ,"मोरपंख..!!"  मी म्हणाले," मोरपिसाचा सहवास प्रत्येकालाच आवडतो कारण तो सुखकर असतो. आपल्या मनाला सुखकर बनवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी ज्यांचा सहवास उपयुक्त असेल अशाच व्यक्तींच्या सहवासात जर आपण राहिलो तरच आपण सुखी होऊ, आनंदी होऊ आणि जर आपण आनंदी व हसरे असलो तरच इतरांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकतो." 

राजश्री (पूजा)

एम ए मानसशास्त्र 

कोल्हापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या