‼️ सेनापती मिर्झा राजे जयसिंग ‼️ 🟢 "असंगाशी संग प्राणाशी गाठ"

 

‼️ सेनापती मिर्झा राजे जयसिंग ‼️


🟢 "असंगाशी संग प्राणाशी गाठ" 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 25/03/2025 : पुरंदरच्या तहामुळे वारंवार उल्लेख येतो तो मिर्झा राजे जयसिंग (१६११-१६६७) यांचा. मिर्झा राजे हे मोगल बादशहा औरंगजेबाचे सरदार होते. त्यांना शिवाजी महाराजांच्या मोहीमेवर पाठवले होते. हे जयपुरचे राजपुत (कछवाह) घराणे तीन चार पिढ्या मोगलांशी घरोबा करुन आणि इमान राखुन होते. अकबर बादशहाच्या दरबारातील प्रसिध्द राजा मानसिंग हे जयसिंगाचे आजोबा. शहाजहानच्या काळात शहजादा शहाशुजा बरोबर ते अफगाणिस्तानच्या मोहीमेत सहभागी होते. काबुल कंदहारच्या परिसरावर विजय मिळवुन तेथील सुभेदारी जयसिंग यांना मिळाली होती.

हा पराक्रमी योध्दा सात हजारी मनसबदार झाला. मोगल दरबारातील रितीरिवाज आणि शिष्ठाचारात मिर्झा राजे पारंगत होते. उर्दु, तुर्की, फारसी भाषांचे ते उत्तम जाणकार होते. औरंगजेबाने साजशृंगारीत घोडा, हत्ती, मोत्यांची माळ आणि 'मिर्झा राजा' ही पदवी बहाल केली. हा मान फक्त शहजादे यांनाच मिळत असे. एवढा मान मरतब मिळवणाऱ्या रणधुरंधर, युद्ध कुशल सेनानीला दख्खन जिंकण्यासाठी आणि मराठयांचे राज्य आणि राजा यांचा बिमोड करण्यासाठी पाठविण्यात आले.

"माझ्याजागी मी तुम्हाला दख्खनेत पाठवित आहे" असा संदेश औरंगजेबाने मिर्झाराजांना दिला. एवढे निष्ठावान मिर्झाराजे जयसिंग असूनही औरंगजेब बादशहाच्या मनात संशय होताच. एवढी मोठी युद्ध सामग्री, प्रचंड सेनासागर आणि मोठा खजीना एका युद्धकुशल हिंदू सेनापती बरोबर पाठवणे धोक्याचे ठरेल. जर हिंदू म्हणून दोघेही एकत्र आले, तर मोगलांच्या साम्राज्याला धक्का बसेल. औरंगजेबाने आपल्या बापावर, भावांवर, बहीणीवर आणि मुलांवर विश्वास ठेवला नव्हता, तो परक्यावर कसा ठेवील? म्हणून औरंगजेबाने मिर्झाराजेवर अंकुश ठेवण्यासाठी दिलेरखानाला सोबतीला पाठवले.

दक्षिणेतील कामगिरीत पुर्णपणे यश मिळवता आले नाही. पण शिवाजी महाराजांना काहीसा आवर घालण्यात त्यांना यश आले. पुढे महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी आगऱ्याला गेले. नजर कैदेत अडकले. आणि त्यातून निसटून राजगडावर परतले.

औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगाला परत बोलावून घेतले. बुरहानपुरला येताना हातनूर जवळ ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. मिर्झाराजे विषप्रयोगाने मृत्यु पावले असा संशय त्यांचा मुलगा कीरतसिंग याला आला. हा विषप्रयोग त्यांचा मुंशी उदयराज याने औरंगजेबाच्या सांगण्यावरुन केला, या संशयावरून त्याने उदयराजची सर्व मालमत्ता जप्त करुन त्याला ठार मारण्यासाठी निघाला. पण उदयराज मुन्शी सावध होवून निसटला आणि त्याने बुरहानपुरच्या सुभेदाराच्या घरात आश्रय घेतला.

आपल्या वडीलांच्या खुन्याला सोडणार नाही ही भुमिका कीरतसिंगाने घेतली. एक चमत्कार झाला आणि मिर्झाराजे जयसिंग यांचा मुन्शी उदयराज दोन दिवसांनी सुभेदाराच्या घरातून बाहेर पडला. उदयराजने मुस्लिम धर्म स्विकारल्यामुळे किरतसिंगाला काही करता आले नाही. 

मिर्झाराजांची छत्री बुरहानपुर येथे बांधण्याची औरंगजेबाची आज्ञा झाली. तापी आणि मोहना नदीच्या संगमावर बोहरडा गावाजवळ ही छत्री बांधण्यात आली. उंच चौथऱ्यावर ३६ स्तंभाची ही छत्री वरील घुमटांमुळे दूर वरुनही लक्ष वेधून घेते. तसेच जयपुर जवळील आमेर किल्ल्याच्या पायथ्यालाही राजपरिवारातील छत्र्यामधेही मिर्झाराजे यांची छत्री आहे. आयुष्यभर मोगलांची प्रामाणिक पणे सेवा करुन त्यांची झालेली मृत्युची कहाणी मनाला चटका लावून जाते. म्हणून म्हणतात 'असंगाशी संग प्राणाशी गाठ' जयपुर, जोधपुर आणि मेवाड एकत्र आले असते, तर देशाचा इतिहास आणि भुगोल आज वेगळा असता. अर्थात त्यासाठी युगपुरुष जन्माला यावा लागतो.

लेख : प्रमोद पांडे

संदर्भ : इंटरनेट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या