प्रभू हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29/03/2025 :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात की, हे ॐस्वरुपी जगाच्या चालका व हे परमेश्वरा तुला नमस्कार असो. तू एकटाच असून अनंतरुपी भासतोस. तूच जगधारण करणारा, जगात असा उरणारा व सृष्टीचे नाटक सजविण्यासाठी कणाकणात वावरणाराही तूच आहेस. मंदिर, त्याची मूर्ती, तिचा पूजक व पूजेची फुले देखील तूच ! देवाचे रुपाने भक्तांच्या अंतःकरणात प्राप्त होणाराही तूच आहेस. ज्याची दुःखे संपतात, त्याच भ्रम पूर्णपणे मावळल्याने स्वतःसह सारे जगच ब्रम्हमय दिसू लागते.
प्रभू हा खेळ दुनियेचा ।
कशाला सांग केलासी? ।।धृ।।
सृष्टी आणि जगाचे रचयिता परमेश्वर आहे. अनेक धर्म ग्रंथात परमेश्वरानेच पृथ्वी, आकाश, ग्रह, तारे आणि जीव सृष्टीची निर्मिती केली आहे असे सांगितले जाते. परमेश्वर जगाचे व्यवस्थापन आणि नियमन करतो. अर्जूनाला दिव्य दृष्टी देऊन परमेश्वराचे विराट रूप दृष्टीमध्ये साठवून ठेवता येत नव्हते. भगवत्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात की, मीच ह्या ब्रम्हांडाचा मालक आहे. ही पृथ्वी भक्तीची भूमी आहे. या पांडुरंगाच्या वाळवंटात भक्त नाचताना आनंदाने म्हणतात, "खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे ।" हा परमेश्वराने येथे खेळ मांडला आहे. खेळ खेळणारे वैष्णव, वारकरी असतात. उदाः- लहानपणी अनेक मुलेमुली खोटा खोटा संसाराचा खेळ खेळत असतात. त्या डावात मुलगी बायको आणि मुलगा नवरा होतो. मुलगा कामावर जायचा तर मुलगी खोट्या घरात खोटा खोटा स्वयंपाक बनविते. मुलगा आला की त्याला खोटखोट जेवायला द्यायची. "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी ।" हा भातुकलीचा खेळ संपला की सगळ्या वस्तू ठेवून दिल्या जातात. असाच परमेश्वर या जगाचा खेळ मांडीत असतो.
कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती ।
कुणी किती कष्ट जरी केले, तरी राहतात उपवासी ।।१।।
मानवी जीवनाची पटकथा परमेश्वर लिहतो. वाल्मिकींनी आधी रामायणात जे लिहले ते तसेच्या तसे श्रीरामाच्या आयुष्यात घडत गेले. मागच्या जन्मीचे साठलेले पुण्य व पाप या आयुष्यात आणि या आयुष्यात केलेले पापपुण्य पुढील जन्मात भोगावेच लागते, यालाच प्रारब्ध म्हणतात. भाग्य कोण ठरवितं? आपलीच कर्मे आणि परमात्मा. एखाद्या डाँक्टरने औषधोपचार करून रुग्ण बरा होणे किंवा न होणे ज्यावर अवलंबून असते, त्याला भाग्य म्हणतात. परमेश्वर कुणाला भाग्य देऊन मंचकावरती बसवितो तर कुणाला मंचकाचे खाली उतरवित असतो.
कष्ट करणे, काम करणे, मेहनत करणे, त्रास सहन करून कुणाला एक वेळच जेवायला मिळते. कष्ट करून कुणी उपवासी राहतात. "सारी दुनिया का तूही कर्णधार है । बिना तेरे ना किसीको लगापार है ।" राष्ट्रसंत म्हणतात की, येथे सर्व सत्ता त्या परमेश्वराची आहे. कष्ट जर केले तर तसे कुणीच उपवासी राहत नाही. आपल्या भाग्यात, प्रारब्धात जे आहे ते आपणास मिळत असतं.
कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे ।
तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ।।२।।
झोपडी हा घराचा एक प्रकार असून ती गवत, बांबू व पालापाचोळा यापासून तयार केलेली असते. झोपडीतील वातावरण थंड राहते. शबरी नावाची एक भिल्लीण राम येण्याची वाट पाहत होती. एक दिवस श्रीराम झोपडीत आले आणि भिल्लीणीचे भाग्य फळाला आले. "मेरी झोपडीके भाग आज खुल जायेंगे, राम आयेंगे ।" पुरातन काळात राहायला झोपडी मिळत नसे. धर्म शाळेत, मंदिरात राहावे लागत असे. आज ती स्थिती राहिली नाही. सर्वांना घरेदारे दिल्या गेली आहे. हे परमेश्वरा कुणाकुणाला पुष्कळ मुलेबाळं देतोस आणि त्यांची मजा तू दुरुनी बघतोस.
कुणी करताती नवसाला, करोडो द्रव्य देवोनी ।
न देशी पुत्र एखादा, असा भेद तुजपाशी ।।३।।
देव नक्कीच एक चांगला देव आहे. त्याने आपल्याला मुलमुली दिली. संत तुकाराम म्हणतात, "नवसे कन्यापुत्र होती, तो का करणे लागे पती ।" नवसाने मुले झाली असती तर लग्न करण्याची गरज काय? असा प्रश्न विचारुन अंधश्रद्धा आणि रुढीवादी विचारसरणीवर प्रखरपणे भाष्य केले आहे. हे आमचे संत आम्हाला शिकवून गेले. हे परमेश्वरा कुणाला एकही पुत्र तू देत नाहीस. संत चोखामेळा म्हणतात, "पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा । कन्या ऐसी देई, जैसी मिरा मुक्ताबाई ।।" येथे गुंडा म्हणजे तुमच्या मुलाची कीर्ती आणि नाव सर्वत्र पसरायला पाहिजे. मुलगा असा निघावा की, त्याच्या कर्तव्याचे झेंडे लोकांनी सर्वत्र फडकावित. हे परमेश्वरा सर्वांना पुत्र द्यावा तो सर्व गुण संपन्न द्यावा. जेणेकरुन ईश्वराचे तो गुण गाईल व जगाचा भेद लयाला जाईल. "जगाचा भेद लयाला जावो, शांती अखंडीत राहो ।"
कुठे हे दे कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला ।
सुखास्तव झूरती सारे, कळेना मार्ग कोणासी ।।४।।
हे परमेश्वरा, कुणाला काही देशी, कुणाला काहीच नाही असा भेदभाव करु नकोस. सर्वांना सारखं द्यावे. कुणी सुख मिळावं म्हणून झुरती. योग्य तो मार्ग कोणाला कळत नाही. हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे धावतो, त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही. देवाकडे काही मागायचे असेल तर देवाचे सानिध्य मागावे, त्याची सेवा मागावी. आपोआपच आपले मनोरथ पूर्ण होते. आपण सगळेच देवाकडे गेल्यावर काही ना काही मागत असतो. जेवढे काही मिळालेले आहे, त्याबद्दल समाधान न मानता काय मिळाले नाही याबद्दल देवाकडे तक्रार करतो. "हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ।" एकतर आम्ही जेव्हा म्हणतो, देवा हेच दान दे की तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको. तेव्हाच आम्ही देवाचे स्मरण करीत असतो. सुखासाठी झुरतांना मार्गाने चालताना दगड, काट्याचे भय होते. आता चालताना, प्रवास करताना जीवाची शाश्वती नाही. हे सगळं आपोआपच घडत नसून त्याला माणूसच जबाबदार आहे. दुःखाच्या वाटा मिळणार हे निश्चित असताना सुखाची अपेक्षा दिवसेंदिवस वाढत असून त्यातील बहुंताश दुःख हे सुखाबरोबर आलेले असते. जमिनीवर पडलेले शेण माती घेऊन येते अशी म्हण आहे. सुख एकटे कधीच येत नाही. पाऊस पाहिजे तर विजांचा गडगडाट सहन करावा लागतो. मऊ गादीवर झोपल्यावर झोपेचे सुख मिळेल पण पाठीचे दुखणे मागे लागेल. सुख उपभोगतांना माणूस जास्त काळ आनंदी राहील तर तो माणूस कसला? कबिरजी म्हणतात, "दुःखमें सुमिरण सब करे, सुखमें करे न कोई । जब सुखमें सुमिरण करे तो दुःख काही का होय ।।" जेव्हा सुख मिळते तेव्हा आपण परमेश्वराची आठवण करीत नाही.
म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद मौनावे ।
दीन अम्ही काय सांगावे, तुझी माया असे कैसी?।।५।।
परमेश्वराची लीला अगाध आहे. म्हणजे देवाचे कार्य किंवा त्याचे खेळ मोठे आणि अवघड आहेत. जे मानवी बुद्धीने पूर्णपणे समजू शकत नाही. जग आणि निसर्गात घडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्यासाठी गूढ वाटतात पण त्यामागे देवाचे मोठे कार्य आहे. ही अतर्व्य लीला पाहून वेद सुद्धा मौन धारण करते. दीन म्हणजे गरीब, निर्धन, हीन. माया म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानात भ्रम किंवा जादू असा अर्थ होतो. माया सतत बदलत असते. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. म्हणून जी अस्तित्वात नसून जी भासते ती माया होय. जग हे एक मायाच आहे. सर्व जग मायेत गुंतले आहे.
बोधः- देशाची कल्पना गावाच्या आदेशातून प्रगट होते. व्यापक विचाराने गाव हेच माणसाचे घर, गावाचा विकास करीत असताना सहज जग सुधारल्या जाईल. गावात सर्वत्र सुख, समाधान असेल तर संत, देश व विश्वही प्रसन्न होईल. ही जाणीव व्हावी. ज्ञान हवे तसेच ज्ञान आचरणात आले तरच विश्वरुप देव दर्शनाचे सुख अनुभवास येईल. हे साधन करण्यासाठी गाव हेच देवालय समजून गावातील लोकं हाच ईश्वर. त्यांची सेवासम पूजा करणे हा खरा भक्ती प्रकार तो सर्वांना कळावा. ईश्वर कणाकणांत भरलेला आहे.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677
0 टिप्पण्या