बाप

 बाप

(कथा एका लेकीची)

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 24/03/2025 :

          "आई,मला5-6 दिवस सुट्टी आहे तर सुट्टीत मी तुज्यासोबत कामाला येऊ"?

"नको गं,बाई तुला नाही जमायचं काम"

"येते ना आई,जमेल मला मी आता मोठी झाले"

"बरं, तात्यांना विचार ते हो म्हणले तर बघू"

           हा संवाद होता एका गावातील गरीब कुटुंबाच्या घरातील,9 वी ला शिकणारी रेश्मा तिच्या आईकडे कामाला जाण्याविषयी हट्ट करत होती.आई कशीच तयारी दर्शवत न्हवती.

     शेतातली काम म्हणजे अवघड काम असतात,दिवसभर राब राब राबावं लागत.उन्हा तान्हाची पर्वा न करता बायगायतदार कामगारांकडून जमेल तितक काम करून त्यांना गुराढोरसारखं राबवून घेतात.त्यात ही कोवळी पोरं तिला कसं जमेल.तीच खेळण्या बागडन्याच वय.त्यात शेतातल्या पुरुषांच्या नजरा म्हणजे नुसत्या वासनेने भरलेल्या पाहता पाहता अब्रूची लक्तरे काढतात.म्हणून आईच काळीज चिंतेत पडलं.

         रात्री तिचे वडील म्हणजे तात्या घरी आले,जेवण झाल्यावर रेश्माने विषय काढलाच.

"तात्या,मी जाऊ का आईबरोबर कामाला"

तात्या ला काही समजेना तात्या सावध झाला आणि लेकीकड पाहून म्हणू लागला.

"का ? खायला कमी पडतंय का तुला?"

     तात्याचा वाढता आवाज पाहता रेश्मा चांगलीच घाबरली.

"अभ्यासावर लक्ष दे गप,आली मोठी कामाला जाणारी" तात्या जोरात ओरडले तशी रेश्मा मान खाली घालून पायाच्या बोटांकडे शून्य नजरेने पाहू लागली.

      पोरीचा पडलेला चेहरा पाहून बापाच्या काळजात कसतरी झालं प्रेमान जवळ घेऊन तात्यांनी तिचा हात आपल्या हातात घेतला.बापाच्या कडक झालेल्या हाताच्या स्पर्शाने रेश्मा सुखावून गेली.थोडी बिनदास्त झाली पण रेश्मा भीत भीत तात्यांकडे पाहू लागली.बापाचं काळीजचं ते शेवटी मायेन पोरींच्या डोक्यावर हाथ फिरवत बोलू लागला.

"पोरी तळ हाताच्या फोडासारखं जपलं तुला आणि आता तू आईसोबत शेतात कामाला जायचं म्हणते,दुनिया काय म्हणेल मला".

        तात्यांचा आवाज घोगरा होत चालला होता.नुकत्याच शहाण्या झालेल्या पोरींन काम करणं तात्याला पटत न्हवत पण ती अस का म्हणाली असेल त्याच कारण माहीत करून ग्यायला तात्या उत्सुक होते.

    "पोरी काय झालंय,काही पाहिजे का तुला?,"

तात्या पोरींच्या डोक्यावर मायेने हाथ फिरवत प्रेमाने विचारू लागले.

   "त,..तात्या...काही नाही तसं.."अडखळत रेश्मा बोलू लागली.

"सहलीला जायचय म्हणती ती,2 हजार रुपये पाहिजेत,आपण देणार नाही असं वाटतंय म्हणून कामाला यायचं खूळ भरलय"

मोठ्या सफाईदार पणे तिची आई बोलू लागली.

     "रेश्मा,तुला सहलीला पैशे लागतात का? मला मागायचं की मग,हे कामाला जायचं हट्ट कशापायी" तात्या जरा आवाज वाढवून बोलु लागले तस रेश्मा च्या डोळ्यात पाणी उतरू लागलं.

          तिचं हे शाळेतलं शेवटचं वर्ष,दहावीत अभ्यास सोडून दुसरं काही नसेल.एवढ्या वर्षी तिला सहलीला जायचं होतं.त्यात सरांनी 2 हजार रुपये खर्च सांगितला.रेश्मा ला चांगलं माहीत होतं.आई वडील मोठ्या कष्टाने तिच्या शिक्षणाचा खर्च भागवतात त्यात अचानक एवढा खर्च म्हणजे कुठून आणणार पैशे.

        गावाकडं मुली लवकर मोठ्या होतात,आई वडिलांच कष्ट डोळ्यांनी पाहत असतात त्यामुळे आपली पण मदत व्हावी म्हणून प्रयत्न करत असतात.रेश्माच्या वर्गातील बऱ्याच मुली आईबरोबर कामाला जाऊन सहलीला पैशे कमावणार होत्या म्हणून तिला पण वाटायचं आपण पण आई वडिलांच्या बोजा कमी करावा.

      रेश्मा खूप हुशार होती तितकीच समंजस.आईच्या वेदना आणि बापाचं कष्ट पाहत लहानाची मोठी झाली,त्यामुळे तिला वाटायचं आपल्यामुळे वडिलांच्या डोळ्यात पाणी नको.आपला खर्च आपणच भागवायला हवा म्हणून गावातील किती तरी पोरी लहानपणापासूनच सुट्टीच्या दिवशी अंगमेहनतीची काम करतात आणि आपल्या शाळेच्या खर्चासोबतच घर खर्चातली मदत करतात.

रेश्माच्या या विचाराने तात्यांना भरून आलं होतं,आपण कुठंतरी पोरीचं लाड पुरवायला कमी पडतो की काय अस समजून तात्यांचं डोळे भरून आले होते पण सावरत तात्या सहलीला परवानगी दिली.कोपरीच्या खिशातून चुरगाळलेल्या दोनशे,शंभर च्या नोटा काढून मोजून तिच्या हातात देताना तात्यांचा हाथ थरथरत होता. तात्यांकडून अशे पैशे रेश्मा ला नको होते.

     डोळ्यातलं पाणी लपवत ती म्हणाली

"तात्या,नको ना मला नाही जायचं सहलीला,मी जाईल नंतर कधीतरी"

"गप गुमान पैशे घे आणि सहलीला जायचं पक्क कर"

तात्या आवाज वाढवत खोटा खोटा राग भरत बोलत होते.रेश्माला तर रडू येत होतं.

तात्यांनी प्रेमाने रेश्मा च्या डोक्यावर हाथ फिरवत मन घट्ट करत तिला बोलले "पोरी तुला काय पहायचं ते स्वप्न बघ,हा तुजा आहे तो पर्यंत काही कमी पडू देणार नाही".

"बाप लेकींच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर साचला होता. हसतच रेश्मा तात्यांच्या कुशीत सामावून गेली.अश्रूंचा महापूर डोळ्याच्या पापणीतून गालावर गुदगुल्या करत खाली वाहत होता. हातातल्या नोटा डोळ्यातल्या पाण्यात भिजत होत्या.बाप लेकींच्या नात्याचा संगम पाहून रेश्माच्या आईच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं.

असा बाप लाभला म्हणून रेश्मा खुश होती तर अशी गुणी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली म्हणून तात्यांची छाती अभिमानाने फुगली होती.

✒️ मंगेश गावडे

(उपाध्यक्ष,अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या