🟣मूल्यशिक्षणाचं बाळकडू
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/03/2025 : न्युयार्कचे माजी मेयर डीविड डिंकिन्स हे पहिले कृष्णवर्णीय मेयर. त्यांच्या बालपणीचा एक प्रसंग वाचण्यात आला... १०-१२ वर्षांचा डेविड घरालगतच्या गल्लीत खेळत होता. खेळता खेळता गल्लीबाहेर हमरस्त्याशी आला. तिथून जाणर्या कारनं त्याला उडवलं. अपघात झाला, पण तो फारसा गंभीर नव्हता. तिथल्या नियमानुसार अपघात भरपाईचा चेक विमाकंपनीकडून आला. त्या रात्री भोजनप्रसंगी वडिलांनी डेविडकडे या अपघाताविषयी खोलात शिरून विचारणा केली. म्हणाले, 'मी तुला पूर्वीपासून बजावत आलोय, गल्लीबाहेर खेळायचं नाही. गल्लीच्या तोंडाशी आल्यावर हमरस्त्यावरून वेगानं येणाऱ्या वाहनापासून अपघात संभवतो, तो टाळण्यासाठी कशी दक्षता घ्यायची हे तुला वारंवार सांगत आलोय. तरीही हाअपघात झालाच कसा?' 'तुम्हाला माझ्या अपघातापोटी मोठी रक्कम विमा कंपनीकडून मिळेल, म्हणून...'डेविडनं प्रामाणिकपणं कबूल केलं.डेविड हा त्या घरातला दत्तक मुलगा. त्याचा सांभाळ करणारे आईवडील कृष्णवर्णीय. आई पोस्टात साधी कर्मचारी. वडील स्थानिक बँड पथकात वादक. या दाम्पत्याला स्वत:चे तीन मुलगे. जेमेतम मिळकतीत कसाबसा प्रपंच चालू होता. भागत होतं, इतकंच.डेविडची आई ज्या पोस्टात काम करे, तिथे तिच्या कृष्णवर्णीय सहकाऱ्यानं डेविडला दत्तक घेतलेलं. दुर्दैवानं त्याची पत्नी अकस्मात वारली. नोकरी सांभाळून वर्षभराचं छोटं मूल वाढवताना त्याची दमछाक होत होती. या मुलाचं काय करावं कसं सांभाळावं या चिंतेत तो होता. ते मूलही दिवसेंदिवस मलूल, उदास होत चाललेलं. सहकाऱ्याची ही कहाणी ऐकून डेविडची ही आई सहकाऱ्याच्या घरी गेली. डेविडला तिनं पाहिलं. जवळ घेतलं. तिच्या जवळ घेण्यानं, थोपटण्यानं मलूल डेविडच्या चेहऱ्यावर अस्फूट हसू उमललं. तिला ते लगेच जाणवलं. तिने आपल्या पतीशी चर्चा करून डेविडला आपल्या घरी आणलं. तिच्या तीन मुलांत चौथा डेविड वाढू लागला. हसू लागला, खेळू लागला. शाळेत जाऊ लागला.गरिबीत संसार रेटताना डेविडचे हे माता-पिता आपल्या चारही मुलांच्या शिक्षणाबाबत जागरुक, दक्ष होते. या धडपडीत त्यांची कमालीची आर्थिक ओढाताण होत होती. डेविडच्या नजरेतून ती सुटली नाही.या आश्रयदात्या प्रेमळ मातापित्याला मदत करण्याच्या हेतुनंच त्यानं धाडसी युक्ती केली होती. स्वत:ला अपघात 'घडवून' आणण्याचा प्रयत्न केला होता. हे रहस्य समजताच पित्यानं दुसऱ्याच दिवशी तो चेक विमा कंपनीला परत केला . मुलानं करवून घेतलेल्या अपघाताचे पैसे त्यानं स्वीकारले नाहीत. या घरातली चारही मुलं अमेरिकेच्या विख्यात विद्यापीठातून उच्चविद्याविभूषित झाली. हे दत्तकपुत्र डेविड डिंकिन्स 1989 साली न्युयार्कचे पहिले कृष्णवर्णीय मेयर झाले. नैतिकतेचं, मूल्यशिक्षणाचं हे असं बाळकडू घराघरातून मिळायला हवं. जे तुझं नाही, तू कमावलेलं नाहीस,ज्याच्यावर तुझा कोणत्याही प्रकारचा हक्क नाही ,ते मिळवण्यासाठी तू वाकड्या मार्गानं जाऊ नकोस, हा संस्कार बालमनावर ठसवणं, रुजवणं हे प्रत्येक कुटुंबाच 'वळण' असायला हवं. आपल्या माजी राष्ट्रपतीनी या नैतिकतेचा उत्तम आदर्श घालून दिलाय. "डॉ. कलाम" राष्ट्रपती भवनात जाताना ज्या दोन सूटकेसेस घेऊन गेले होते, तेवढ्याच घेऊन त्यांनी राष्ट्रपती भवन सोडलं. त्यांच्या या वर्तनाची, वृत्तीची मुळं त्यांच्या मूल्याधारित जीवनपद्धतीत आहेत. जे माझे नाही ते हिरावून घेण्याच्या प्रयत्नात, डावपेचात भ्रष्टाचाराचा जन्म होतो. मग तो जमिनीचा तुकडा असो, सामाजिक वा राजकीय कार्यातील यशाचं श्रेय असो वा ' जनाधार' असो. ज्यावर माझा नैतिक अधिकार नाही, त्या गोष्टी कोणत्याही मार्गानं प्राप्त करू पाहणं म्हणजे दुसर्याच्या हक्कावर आक्रमण करणं. त्याला त्याच्या आनंदापासून वंचित करणं. हीसुद्धा एकप्रकारे रक्तहीन हिंसाच. ही हिंसा विवेक वापरून टाळता येणार नाही का? हा विवेक कमी पडतो म्हणूनच भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढतेय आणि अशा आरोपातून सहीसलामत सुटणं हे हुशारीचं, बहादुरीचं मानून त्याची प्रौढीही मिरवली जातेय. विशेष खेदाचीगोष्ट म्हणजे अशांना सामाजिक प्रतिष्ठाही लाभते. गरिबीमुळे जीव जगवण्यासाठी माणूस चोरी, लांडीलबाडीकडे वळला, तर ते एक वेळा समजू शकतं; पण सुशिक्षित, संपन्न कुटुंबातल्या तरुण व्यक्ती चैनीसाठी किंवा केवळ 'स्टंट' म्हणून अप्रवृत्तीकडे झेपावताना दिसतात, तेव्हा विवेकाचं बीज त्यांच्यात पेरायचं राहुनच गेलं, मूल्यशिक्षणाचं बाळकडू त्यांना मिळालेलं नाही,याची दु:खद जाणीव अस्वस्थ करते आणि सुजाण पालकत्वाची निकडही तीव्रतेनं जाणवते.
चला तर मग....ही मुल्यशिक्षणाची बीजं समाजात , जनमाणसात पेरुया!!नक्कीच ती उगवेल।।

0 टिप्पण्या