मरना हकका बाना है..!

 

मरना हकका बाना है..!

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 04/02/2025 : हा अनमोल मनुष्य जन्म मिळविण्यासाठी सर्व आत्म्यांना ८४ लाख योनीतून जावे लागते आणि मनुष्य जन्मात केलेल्या कर्मानुसार आत्मा एखाद्या प्राण्यामध्ये किंवा कोणत्याही योनीत जन्म घेऊ शकतो. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुविचार स्मरणी मध्ये म्हणतात की, "मृत्यू हा मनुष्याला त्याच्या चांगल्या वा वाईट इच्छेच्या कार्याकरिता ताजातवाना करुन देणारी विश्रांती आहे. म्हणूनच ज्ञानी लोक मृत्यूला आपली शुभ वेळ समजतात."

मरना हकका बाना है ।

जीना उधार आना है ।।धृ।।

हक म्हणजे सत्य. हक म्हणजे आपण मान्य केलेला. मरण हे एक सत्य आहे. बाना म्हणजे अंगीकार केलेला धर्म, रीती, चाल, स्वभाव. मृत्यू हा तडफडत्या श्वासांची सुटका करतो. जर मृत्यू नसता तर रडणाऱ्या, विव्हळणाऱ्या, डोळ्यात प्राण आणून वेदना सहन करणाऱ्या देहाचे ढिगारे लागले असते. त्यातून एकच आक्रोश आला असता की, मला मरण द्या. मला मरण द्या. जीवनाला मृत्यू आहे म्हणून ठिक नाहीतर कशी सुटका केली असती या शरीराच्या पिंजऱ्यातून? शरीर सडून गेले असते आणि मेलो नसतो तर या सुंदर चेहऱ्याचं विद्रुप रूप आपण पाहू शकलो असतो का? जीवनाचा भयानक अंत म्हणजे मृत्यू.

जीना उधार म्हणजे जसे आपण एखाद्या गावाला किंवा तिर्थक्षेत्री गेलो असता परत आपल्या मुळ गावी येतो. तसेच आपण मृत्यू लोकांत पाहुणे म्हणून जन्माला आलो. ईश्वराने हे शरीर उधार म्हणजे भाड्याने दिले आहे. या भाड्याच्या घरात राहायचे म्हटले तर त्याचा चांगला वापर करावा लागेल. ईश्वर चिंतनात हा देह घालवावा लागेल. हे उधारीचे जीवन जगून वेळ आली की आपल्याला आपल्या गावी परत जावेच लागते. आपण गाडीमध्ये बसलो. ज्याचे गाव आले तो चटकन गाडीचे खाली उतरुन जातो. तसेच हा उधारीचा देह एक दिवस सोडून जावे लागेल. "जिंदगी एक किराये का घर है । मौत जब तुझको आवाज देगी । एक न एक दिन निकलना पडेगा ।।" या भाड्याने दिलेल्या उधारीच्या देहात चांगले कर्म करणे म्हणजेच त्याचे भाडे फिटेल.

मेरा-मेरा करते करते, सारी उम्र गमाया ।

मेरा तो चुहेने लूटा, काल-बलाने खाया ॥

आपण जन्माला आलो तेव्हापासून मृत्यू (काळ) आपल्या सोबतच लहानाचा मोठा होतो. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे. मृत्यू तर नियती आहे. मृत्यूला टाळता येत नाही. आपण गाढ झोपेत असताना हा देह मृत असलेल्या देहासारखाच भासतो पण आपला श्वास चालू असतो म्हणून आपण मरत नाही. आपण आपलं सर्व जीवन माझं माझं म्हणून व्यर्थ गमावलं. आपलं येथे काहीही नाही आणि कुणीही आपलं नाही. घरदार, पैसा, मुलेबाळ, बायको, शेतीवाडी आपली असून ते आपल्या बरोबर नेता येत नाही. येथेच सर्व काही सोडून रिकाम्या हाताने जावे लागते. "माझं माझं म्हणतं पण सार नाशिवंत । करुनी करुनी करुनी पहा विचार ।।"

उदाः- उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातून एक व्यक्ती जात असताना एका विहिरीत पडतो. विहिरीला लागूनच एक पिंपळाचे झाड होते. विहिरीचे आत पिंपळाच्या मुळीला त्याने घट्ट पकडले. म्हणून त्याला वाटले की आपण जीवंत आहोत नाहीतर मेलो असतो. विहीर कोरडी होती. विहिरीत एक विषारी साप होता. वर पाहिले तर विहिरीचे काठावर एक वाघ उभा होता. खाली गेलो तरी मरावं लागत. वर गेलो तरी मरावं लागतं. एक काळरुपी उंदीर पिंपळाची मुळी कुरतडत होता. वर पिंपळाचे झाडाला मोहोळ होते. त्या मोहोळातून गोड सहद त्याचे नेमके जीभेवर पडत होते. तेव्हा सुखाचा अनुभव येत होता पण काल नावाचा उंदीर पिंपळाची मुळी कुरतडत असल्यामुळे आपण कधीही मृत्यूच्या तावडीत सापडू शकतो असे वाटत होते. हा काल रुपी उंदीर आपल्या आयुष्याची दोरी कुरतडत असतो. सर्व मानवाच्या मागे हा कालरुपी उंदीर लागलेला असतो.

अमीर-उमरा मरते देखे, इनका नही ठिकाना ।

बडे-बडे थे वली-अवलिया, दिखता नही निशाना ।।२।।

अमीर-उमरा म्हणजे अमीराचा अमीर, श्रीमंत राजकुमार. गरीब असो की श्रीमंत असो यांना सुद्धा मरावचं लागतं. मग आपला काय ठिकाणा? वली-अवलिया म्हणजे ईश्वराचा मित्र, दोस्त. साधु-संत हे परमेश्वराच्या चिंतनात मग्न असणारे विदेही. अवलिया म्हणजे साधु, संत, महात्मा, सिद्ध पुरुष, यांचा सुद्धा ठिकाणा नाही. मृत्यूसमोर कुणाचही चालत नाही. साधे राहुन जगाच्या कल्याणासाठी सतत वेगळे काहीतरी करुन दाखवतो, त्या मानवाला अवलिया म्हणतात. जसे गजानन महाराज यांना अवलिया म्हणतात. "जगाच्या कल्याणा संताच्या विभूती । देह कष्टविती परोपकारी ।।" 

राजा के महाराजा मर गये, रैयत कौन बनाया ।

तुमको हमको सब दुनियाको, एकही मारग जाना ।।३।।

रयत म्हणजे शेतकरी, जनता, प्रजा, लोक. या राष्ट्राशी एकनिष्ठ असलेली व्यक्ती होय. राष्ट्र चालविणारा राजा, महाराज्याला सुद्धा मरावं लागते. या रयतेला एक दिवस मरावेच लागते. "जीवन का भरोसा नही । कब मौत आ जायगी ।।" सर्वांना एक दिवस या एकाच मार्गाने जावे लागते.

कहता तुकड्या वही जीते है । जो जीते मर जावे ।

उनको नही है आना-जाना, तो मरना बतलावे ।।४।।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनाचे शेवटी म्हणतात की, जीवन जगता जगता कुणीही मरते पण जीवंत असताना मरा, ह्यातच खरं मरण आहे. म्हणजे "मरावे परी कीर्ती रुपी उरावे" आपले कर्म हीच आपली ओळख आहे. आज मोठेपणा मिळावा म्हणून त्यासाठी झिजण्यास कुणाचीच तयारी नाही. जीवनाचा मृत्यू आनंदी व्हावा म्हणून ईश्वराचे ध्यान हा एक मार्ग आहे. राष्ट्रसंत पुढे म्हणतात की, ज्यांना जन्म-मरण नको त्यांनी मोक्षाचा मार्ग निवडावा. "जन्म मरण नको आता, नको येरझार । नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडिवार । चराचर पार न्या हो ।" जन्म मरणाची येरझार नको असेल तर तुमची चांगली कृत्ये तुमच्या वाईट कृत्यापेक्षा जास्त असेल तर हरिनाम घ्यावे लागेल तरच आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. त्यालाच मुक्ती किंवा मोक्ष म्हणतात. राष्ट्रसंत म्हणतात. "कीर्ती तोची स्वर्ग खरा । अपकीर्ती नरकाचा पसारा । याच जगी याचा व्याप सारा ।।" मनुष्य जीवनात चांगले कर्म करतो त्याची परतफेड करतो आणि मोक्ष प्राप्त करु शकतो. मनुष्य कर्म करतो. ज्यांचे ऋण फेडण्यासाठी त्याला अनेक अवतार घ्यावे लागतात. मानवाने एकदाच मरावे पण असे मरावे.

मरना है तो एक बार मरो ।

फिर चौरांसी मे पडना क्या ।

हर बार का मरना मरना क्या ।।

बोधः- भगवत्गिता सांगते की, जसे माणूस आपले जुने कपडे काढून नविन कपडे घालतो. तसेच आत्मा देखील करतो. हे जुने शरीर काढून टाकतो आणि नविन शरीरात प्रवेश करतो. आपला जन्म आपल्या मनानुसार होत नाही आणि मरण सुद्धा आपल्या मनानुसार होत नाही. जन्म-मरण या मधील व्यवस्था सुध्दा आपल्या मनानुसार कशी होऊ शकेल. म्हणूनच कर्म करीत रहा. बाकी सर्व ईश्वरावर सोडून द्या. तो नक्कीच बरोबर करतो. राष्ट्रसंत म्हणतात.

क्यो मरने घबराता बंदे ।

मरना एक खुशाली है ।।

सुख की निंद लगेगी मिठी ।

दुनिया मरनेवाली है ।।

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर

श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- ९९२१७९१६७७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या