२७ फेब्रुवारी,"मराठी भाषा गौरव दिन"

 २७ फेब्रुवारी,"मराठी भाषा गौरव दिन"

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 27/02/2025 : आज मराठी भाषा दिवस.  त्यामुळे ह्याच्याशी संबधीत काही आठवणी पण जागृत झाल्यात.  कुठल्याही निर्णयाची संपूर्णतः जबाबदारी 

आपल्यावर असते नं तेव्हा तो काळ खरच आपल्यासाठी कसोटीचा असतो.  कारण आपण घेतलेल्या त्या निर्णयावर पुढील सारे भविष्य जणू अवलंबून असतं.  असाच एक निर्णायक क्षण आला जेव्हा व्यंकटेश ला कुठल्या माध्यमातून शिक्षण द्यावं असा प्रश्न समोर उभा ठाकला तेव्हा.

       जेवढ्या जास्त भाषा माणूस आत्मसात करतो तेवढा तो जास्त जास्त समृद्ध होत जातो, ह्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे परंतु ह्या भाषा तुम्हाला नीट अभ्यासपूर्ण यायल्या हव्यात. 

अनेक भाषा अर्धवट शिकून वा धेडगुज-या येऊन फायदा न होता उलट "एक ना धड भाराभर चिंध्या" ह्यासारखी अवस्था त्या पामर विद्यार्थ्यांची होते हा अनुभव गाठीशी होता.  त्यामुळे बहुतेकांचा विरोध असतानांही मी व्यंकटेश ला मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचं ठरविलं. घरात अर्धवट काही इंग्रजी शब्द पेरत बोललेलं मराठी, शाळेतील टिचरचं हिंदीमिश्रीत इंग्रजी आणि मित्रांबरोबर बोललेलं हिंदी अशा संँडविच वातावरणात मुलाला शिकवून त्याचा गिनीपीग करायचा नाही हे माझं आधीचं ठरलेलं. हा त्यावेळी जरा मला माझा  अडाणीपणा, कंजुषपणा ह्या इतरांच्या नजरांचा सामना करावा लागला हे पण खरं.

       व्यंकटेशचे प्रायमरी शिक्षण संपूर्ण  मराठी माध्यमात , माध्यमिक व हायस्कूल शिक्षण सेमी

 इंग्लिश आणि पुढील इंजीनिअरींग व एम.बी.ए चे शिक्षण इंग्रजी भाषेत झाले.  जरी त्याचे प्रायमरीचे शिक्षण मराठी तून झाले तरी पुढे तो कुठल्याही क्षेत्रात इंग्रजीमध्ये मागे पडला नाही हे उल्लेखनीय. अर्थात ह्याचे श्रेय त्याच्या मेहनतीला जातं, त्यामुळे माझा निर्णय अजिबात चुकला नाही, ह्याचे समाधान व आनंद त्याने मला दिला. कुठल्याही भाषेच्या माध्यमातून घेतल्या गेलेले शिक्षण वाईट वा चुकीचं नसतचं मुळी पण त्यासाठी आधी आपल्या मुलाला मातृभाषा ही उत्तम, शुद्ध यायलाच हवी हा आपल्या पालकांचा कटाक्ष मात्र हवा. 

     हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे आज २७ फेब्रुवारी,"मराठी भाषा गौरव दिन". तसेच आज मराठी भाषेला उत्तुंग श्रेणीवर आपल्या लेखनाने पोहोचविणारे श्री.वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज ह्यांची जयंती. आज मातृभाषेचा गौरव म्हणून आणि त्यांना अभिवादन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे ह्या निमीत्ताने का होईना पण मराठी उत्कृष्ट साहित्य आज वाचून काढायचे , मराठी भाषेची लवचिकता, समृद्धी परत एकदा वाचना मधून अनुभवायची असं ठरविलं.

 . प्रत्येकाला आपली मातृभाषा ही प्रिय असतेच आणि ती असावीच. सुरवातीला एकदा आपल्या मातृभाषेशी हातमिळवणी केल्यावर नंतर मग बाकीच्या भाषा आवडीनुसार व कुवतीनुसार आत्मसात कराव्यात. जसं  सगळचं पहिलं वहिलं हे जरा जास्तच कौतुकाचं खास,अप्रुप वाटणारं असतं. त्याचप्रमाणे आपल्या पहिल्या कल्पना,स्वप्नं, ही आपण सगळ्यांनी मराठीतच बघितलीतं त्यामुळेच ही मायमराठी आपल्याला खूप जास्त जवळची.

   भाषा म्हणजे जणू आईच. आई ही प्रत्येकाचीच चांगलीच असते पण काहीही म्हणा आपली आई ही जरा जास्तच खास असते. होयं नं ,म्हणूनच ही मातृभाषा, मायमराठी आपल्याला जास्त जवळची. अर्थात बाकीच्या भाषा म्हणजे जणू मावश्याच, आईच्याच खालोखाल.       

   मध्ये एके ठिकाणी वाचनात आले मराठी भाषा ही शक्तीची,भक्तीची आणि सक्तीची असावी.ह्यातील शक्तीची आणि भक्तीची हे पटले मात्र सक्तीची हा शब्द कुठेतरी बोचला.  प्रेम,भक्ती, मनापासून अभ्यास हा आपसूकच केल्या गेला तर त्यात अवीट गोडी, गंमत आणि आनंद मिळतो पण हेच उद्वेगाने केले तर त्यातील मजाच नाहीशी होईल. ज्याला कुणाला आपणहून मराठी भाषा शिकावीसी वाटेल तो त्यातील मजा आनंद हा चाखणारचं. आणि जर शिकायची सक्ती ही केली तर त्या भाषेची चिरफाड अटळ समजा.  मराठी भाषा ही एकच असली तरी तिच़ं सौंदर्य हे कोसाकोसांवर बदलतं,प्रांतानुरूप खुलतं. मराठी भाषा आपली भाषा सर्वोत्तमच पण बाकीच्या भाषांमधील सौंदर्य पुढल्या एखाद्या लेखात बघूच.

    तरीही आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमीत्ताने माझं हे लिखाण माझ्या ह्या मायमाऊली मराठीला अर्पण. आज ह्या निमित्ताने ह्या लेखातील शक्यतोवर शब्द नं शब्द मी मराठी मध्येच लिहायचा प्रयत्न केलायं.

सौ.कल्याणी बापट (केळकर)

९६०४९४७२५६

बडनेरा, अमरावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या