राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत न्यू अंबिका कला केंद्र यवत, पिंजरा कला केंद्र वेल्हे व कालिका कला केंद्र धाराशिव या तीन पार्ट्यांना प्रथम क्रमांक विभागून

 

राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत न्यू अंबिका कला केंद्र यवत, पिंजरा कला केंद्र वेल्हे व कालिका कला केंद्र धाराशिव या तीन पार्ट्यांना प्रथम क्रमांक विभागून

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 03/02/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०७ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या  राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत न्यू अंबिका कला केंद्र यवत, पिंजरा कला केंद्र वेल्हे आणि कालिका कला केंद्र धाराशिव या तीन पार्ट्यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. त्यांना प्रत्येकी  तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते झाले. यावेळी जयंती समारंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, आ‌मदार माधवराव जवळगावकर, परीक्षक माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, समीक्षक लेखक डॉ. शशिकांत चौधरी, कवी चित्रपट लेखक डॉ. चंद्रकांत जोशी, सहकार महर्षी पुरस्कार विजेत्या वैशाली जाधव,रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर उपस्थित होते. 





यावेळी जयसिंह मोहिते पाटील म्हणाले,  डॉल्बी व डीजेच्या वापरामुळे पेटी, ढोलकी, तबलावादक यांच्यावर कुऱ्हाड येताना दिसत आहे त्याचबरोबर लावणी ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर असून ही कला जपणे गरजेचे आहे. पारंपारिक लावणीचा बाज टिकावा यासाठी पुढील वर्षीपासून स्पर्धेत ग्रामीण भागातील पार्ट्यांचे वेगळे नामांकन होणार आहे. पुढील वर्षी लावणी स्पर्धा १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी होणार असल्याची जाहीर केले.

यावेळी आमदार दिलीप सोपल यांनी लावणी स्पर्धा सुरू झाल्यापासून गेली सुमारे २८ वर्षे सातत्याने स्पर्धेत उपस्थित राहात आहे. लावली स्पर्धेच्या आठवणींना उजळा देत प्रेक्षागृहात हस्याचे फवारे उडविले‌. ही स्पर्धा वेळेची शिस्त व काटेकोर नियोजनामुळे चालू असल्याचे सांगत सध्या नियोजन करीत असलेल्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनीही त्यात कुठेही उणिव ठेवली नसल्याबाबत कौतुक केले. लावणीतून सामाजिक तसेच राजकीय त्रुटींवर हा बोट ठेवत विविध विषयावर प्रबोधन केले जाते. तसेच महाराष्ट्राची टाळ आणि चाळ ही महत्त्वाची आभूषणे असून ती आपण सर्वजण मिळून जपू असे आवाहन केले. 

लावणी स्पर्धेतील द्वितीय क्रमांक: शीतल पूजा बुमकर जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी आणि अनिता परभणीकर, नटरंग सांस्कृतिक कला केंद्र मोडनिंब यांना विभागून देण्यात आला. त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.

तृतीय क्रमांक: प्रीती परळीकर, न्यू अंबिका लोकनाट्य कला यवत, चौफुला यांना रुपये एक लाख व सन्मान चिन्ह देण्यात आले.

चतुर्थ क्रमांक: सुनीता, शामल, स्नेहा लखनगावकर नटरंग कला केंद्र, मोडनिंब यांना रुपये 75 हजार व सन्मान चिन्ह देण्यात आले.

उत्कृष्ट अदा वैयक्तिक रोख ५ हजार व चषक आणि उत्कृष्ट मुजरा रु ३ हजार हि दोन्ही बक्षिसे प्रीती परळीकर, न्यू अंबिका यवत चौफुला यांनी मिळविली.

उत्कृष्ट गायिका- कल्याणी गायकवाड, पिंजरा कला केंद्र, वेल्हे सातारा 

उत्कृष्ट ढोलकी वादक - अर्जुन शिंदे 

नटरंग कला केंद्र, मोडनिंब

उत्कृष्ट हार्मोनियम वादक- विकी जावळे, 

नटरंग कला केंद्र, मोडनिंब

उत्कृष्ट तबला वादक - निलेश डावाले, नटरंग कला केंद्र, मोडनिंब.

यांचाही सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. 

महर्षि शंकरराव मोहिते पाटील प्रशाला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या  सांगा मी कशी दिसते, या नऊवारी साडीत या लावणीला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी 86 हजार 650 रुपयांचे रोख बक्षीस दिले. कलाकारासह मुख्याध्यापक संजय गळीतकर, मार्गदर्शक शिक्षक बाळासाहेब झांबरे, किरण सूर्यवंशी नाझिया मुल्ला, नृत्य दिग्दर्शक उमेश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला तर पालकांनीही यासाठी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या