एकनाथांचे नाथ इतके मतलबी कसे ?


एकनाथांचे नाथ इतके मतलबी कसे ?

वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 03/12/2024 :

काही पण म्हणा उद्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचे मीठच अळणी आहे कारण ते ज्यांना ज्यांना संकटकाळी मदत करता ते सारेच इतके दळभद्री कसे निपजतात हेच काही कळायला मार्ग नाही. आता बघा ना दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी  मुख्यमंत्री बनण्यासाठीचा केलेला सगळा आटापिटा निष्फळ ठरल्यानंतर अखेर पत्रकार परिषद घेऊन 'महाशक्तीपुढे' नांगी टाकली. पण यात सत्तेच्या खुर्चीवर पुन्हा बसण्याचा दर्प अधिक होता म्हणून त्यांनीं मोदी-शहांचे आभार मानले. पण ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाचा कार्यभार मुक्तपणे करून दिला व शासकीय तिजोरी अक्षरशः लुटून दिली त्या देवाभाऊ फडणवीस यांचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे या एकनाथांच्या दाढीतील तिणखा महाराष्ट्र वासियांना ठळकपणे जाणवला. आता याचा उट्टा देवाभाऊ अशा पध्दतीने काढतील की या नाथाला त्यांची नानी आठवेल हे मात्र नक्की .

या एकनाथांच्या नाथाने आपण कसे लोकप्रिय मुख्यमंत्री होतो हे परवाच्या पत्रकार परिषदेत पटवून देण्याचा आटापिटा केला. परंतु ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मनसोक्त भोगता आले त्यांचा साधा उल्लेखही केला नाही. हा निव्वळ कोडगेपणा आणि कृतघ्नपणा आहे. खरंतर निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीने लागले आणि भाजपला १३२ + ५ अपक्ष असे स्वबळावर १३७ जागा मिळाल्यावर कुठलाही नेता मुख्यमंत्री बनण्याचे शेखचिल्ली छाप स्वप्न पाहणार नाही हे वास्तवात जगणाऱ्या अजित पवारांच्या लक्षात आले. तेंव्हा त्यांच्या पक्षाने तर थेट अमित शहांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीसांना आपला पाठिंबा देऊन टाकला. 

परंतु भाजपच्या जीवावर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गनिमी काव्याने ५७ आमदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी जो बालिशपणा केला त्यामुळे महायुतीच्या महाविजयाला कुठेतरी गालबोट लागले. दाढीवाले बाबा हे सुद्धा विसरलेत की आपल्या ५७ आमदारांमध्ये १०-१२ आमदार भाजपचेच आहेत आणि आपले बहुतांश सहकारी हे देवेंद्र फडणवीसांचेच समर्थक आहेत. तरीही एकनाथ शिंदेंनी  मागील आठ दिवस जो काही मेलोड्रामा सुरू केला त्यामुळे त्यांचीच पदलोलुपता उघड झाली आणि ते सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पंक्तीत जाऊन बसले.

खरंतर निवडणुकीचे निकाल हाती येताच एकनाथ शिंदेंनी स्वतःहून देवेंद्र फडणवीसांना आपला पाठिंबा जाहीर करायला हवा होता. कारण २०१४-२०१९ या काळात जेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे खच्चीकरण करण्यासाठी पूर्ण ताकत लावली तेंव्हा याच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना MSRDC ची जबाबदारी देऊन समृद्धी महामार्गासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी देत एकनाथ शिंदेंना राजकारणात जिवंत ठेवले.   

शिंदेंनी बंड केल्यांनतर गुवाहाटीला गेल्यानंतर अचानक मुख्यमंत्री पदाची मागणी करत भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे काय लपून राहिलेले नाही. तरीही त्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी १०५ आमदार असूनही पक्षहितासाठी त्याग करत उपमुख्यमंत्री पद  

नुसते स्वीकारलेच नाही तर उद्धव ठाकरेंना थेट अंगावर घेत फडणवीस शिंदेंच्या पाठीशी पर्वतासारखे खंबीरपणे उभे राहिले. आणि राज्यात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्याचबरोबर उबाठा आणि शिंदे संघर्षातही शिंदेंना कायदेशीर मदत केली. प्रत्येक ठिकाणी त्यांचा मोठ्या भावाप्रमाणे सन्मान केला. मग आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सन्मान सोहळ्यात घडलेला प्रकार असो नाहीतर सिंधुदुर्ग येथील महाराजांच्या पुतळ्याबद्दल घडलेला प्रकार असो किंवा सरकारी तिजोरीतून एकनाथ शिंदेंच्या राजकीय कार्यक्रमांची रेलचेल असो इतकेच काय शिंदेंचे मंत्री , नेते आणि आमदारांचे बेताल वर्तन व विकासाच्या नावाखाली तिजोरी लुटण्याचा प्रयत्न या सगळ्यांवर पांघरूण घातले. याउलट कृतघ्न शिंदेंनी मनोज जरांगे यांनी शरदचंद्र पवारसाहेबांकडून  सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीसांवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होते तेव्हा स्वतःला अलिप्त ठेवत असुरी आनंद लुटला जात होता. त्यात रोहित पवारांची ट्रोल गँग जेव्हा देवेंद्र फडणवीसांबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत सोशल मीडियावर अपप्रचार करत होती तेंव्हा तर हेच मुखिया शिंदे शरदचंद्र पवारसाहेब आणि रोहित पवारांची कोरी निवेदने स्वीकारत फोटो काढत होते.

उद्धव ठाकरेंनी तर उघड उघड फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. परंतु शिंदेंच्या दाढीत इतके विषारी साप निघतील असे वाटले नव्हते. होय आम्हाला हिंदुत्ववादी म्हणून अजितदादा पवारांपेक्षा एकनाथ शिंदेच अधिक जवळचे वाटायचे परंतु मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंनी जो नालायकपणा केला ते पाहून संताप येण्याऐवजी त्यांची किळस आणि कीव करावी वाटते आहे. कारण लोकसभेला मिळालेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने निवडणुकीचे नियोजन केले आणि ९९% हरलेला सामना परत आपल्या बाजूने निव्वळ फिरवलाच नाही तर विरोधकांना पार जमीनदोस्त करत मित्रपक्षांनाही घवघवीत यश मिळवून दिले.  ते पाहता शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना अगदी खांद्यावर उचलून दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींना आपले समर्थन कळवायला हवे होते.

 परंतु दाढी ठेवणारी प्रत्येक व्यक्ती ही शिवाजी महाराज नसते. ती औरंगजेबही असू शकते हे आम्ही भाबडे हिंदुत्ववादी विसरूनच गेलो होतो.

असो, एकनाथ शिंदेंनी आता स्वतःच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यामुळे आता त्यांना एकतर केंद्रात जावे लागेल किंवा भाजप आमदारांचा रोष पत्करत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काम करावे लागेल. तसे नाही केले तर सत्तेसाठी शिंदेंभोवती जमलेले त्यांचे डोमकावळे आमदार त्यांना सोडून भाजपसोबत येतील त्यामुळे त्यांचे आता परतीचे दोरही कापले गेलेले आहेत. कारण भाजपकडे अफाट बहुमत असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम पाठिंबा असल्याने ते मविआत जाऊनही मुख्यमंत्री बनू शकत नाहीत. अमित शहांशी सलगी करून आपला कार्यभाग साधू पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजप आणि संघ अजूनही कळला नाही. कारण त्यांचा बामणी कावा कळायला शरदचंद्र पवारसाहेब यांना सुध्दा शंभर जन्म घ्यावे लागतील. त्यामुळे शिंदे आता चहूबाजूंनी चेकमेट झाले आहेत. 

 देवेंद्र फडणवीसांना यापूर्वीही एका एकनाथाने निष्कारण डिवचले होते, त्यांची आज काय अवस्था आहे निदान याचा तरी शिंदेंनी विचार करायला हवा होता. नशीब देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंसारखे खुनशी आणि पाताळयंत्री नाहीत, नाहीतर एकनाथ शिंदेंची काही खैर नाही. तरीही देवेंद्र फडणवीस अत्यंत संयमाने झाल्या प्रकारावर पडदा टाकतील आणि दमदारपणे पुढील पाच वर्ष सरकार चालवतील. परंतु गंमतीदार गोष्ट ही आहे की सगळेच पदलोभी 'एकनाथ' देवेंद्र फडणवीसांच्याच नशिबी का येतात कारण त्यांना राजकीय भट्टीतून ताऊन सुलाखून महाराष्ट्रासह पुढील काळात देश घडवायचा आहे.


राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .

दिनांक - ०१/१२/२०२४.

पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या