महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा मतदार राज्यात आहे का

 महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा मतदार राज्यात आहे का?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 18/11/ 2024 : संपूर्ण देशात महाराष्ट्र हे पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसाही इतरांच्या तुलनेत फार मोठा आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात असल्याने राज्यात सुबत्ताही ब-यापैकी आहे. साक्षरतेचे प्रमाणही चांगले आहे. या सर्व लौकिकाला साजेसा प्रगल्भ मतदार महाराष्ट्रात आहे का? या प्रश्नाचे उत्तर मात्र काही प्रमाणात नाही असेच द्यावे लागेल.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर ते काहीसे धक्कादायक व आश्चर्यकारक असे वाटतील. एखाद्या निवडणुकीत एखाद्या पक्षाला मतदारांनी संपूर्णपणे नाकारणे समजू शकते. एखाद्या प्रस्थापित उमेदवाराच्या तुलनेत मतदारांनी नवख्या उमेदवाराला विजयी करणे समजू शकते. परंतु कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराचे चरित्र, चारित्र्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी, समाजकार्याप्रती त्याच्यात असलेली बांधिलकी आणि इतर उमेदवारांच्या तुलनेत सर्व गोष्टीतील त्याचे  श्रेष्ठत्व या गोष्टी पाहूनच मतदारांनी मतदान केले पाहिजेत. म्हणजेच उपलब्ध पर्यायातील सर्वोत्तम पर्याय निवडावा. परंतु महाराष्ट्रातील अनेक निवडणुकीचे निकाल पाहिले तर मतदार नेमके काय पाहतात असा प्रश्न पडतो. ज्या डाँ. बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिली, लोकांना व्यक्तीस्वातंत्र, मतस्वातंत्र, मतदानाचा हक्क दिला. त्यांना मतदारांनी पराभूत केले. हे फार जुने उदाहरण झाले. आजच्या पिढीला ते माहितही नसेल. अगदी अलिकडची उदाहरणे पाहू. विलासराव देशमुखांनी लातूरचा कायापालट केला. लातूरची आज जी ओळख आहे ती विलासराव देशमुखामुळेच आहे. त्या विलासरावांना मतदारांनी पाडले. बरं त्यांच्या विरोधात निवडून दिले तो विलासरावांच्या तुल्यबळ होता असेही नाही. नंतर त्या उमेदवाराचे फारसे कोठे नावही ऐकू आले नाही. विलासराव मात्र त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले. त्याच लातूरकरांनी अजून एक असाच धक्का दिला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवराज पाटील चाकुरकरांना पराभूत केले. त्यांच्या विरोधात असलेल्या रुपाताई पाटील निलंगेकरांना निवडून दिले. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत पराभूत होऊनही शिवराज पाटील चाकूरकर देशाचे गृहमंत्री झाले. जर त्या निवडणुकीत ते विजयी झाले असते तर  देशाचे पंतप्रधान झाले असते. देशाचा पहिला मराठी पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला असता. ते पंतप्रधान झाले असते तर महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा आणि लातूरचा किती फायदा झाला असता. परंतु लोकांनी रुपाताईंना निवडले. त्या पाच वर्ष फक्त खासदार राहिल्या. शिवराज पाटील निवडून आले असते तर जितके दिवस मनमोहनसिंघ पंतप्रधान राहिले तेवढे दिवस ते पंतप्रधान राहिले असते.

२०१९ च्या निवडणुकीत देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उभे होते. त्यांना मतदारांनी पराभूत केले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बाळू धानोरकर यांना विजयी केले. विशेष म्हणजे ज्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे ३०० पेक्षा अधिक खासदार निवडून आले. त्या निवडणुकीत हंसराज अहीर पराभूत झाले. म्हणजे देश कोठे चालला, आपण कोठे चाललो याचाही विचार नाही. ते जर निवडून आले असते तर मोदीच्या मंत्रिमंडळात कँबिनेट मंत्री झाले असते. त्याचा फायदा महाराष्ट्राला, चंद्रपुरला, विदर्भाला झाला असता. बाळू धानोरकर काँग्रेसचे एकमेव उमेदवार असल्याने त्यांना विरोधी बाकावर बसून राहावे लागले. (दुर्देवाने त्यांचा पुढे अकाली मृत्यू झाला) आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातच भाजपाच्या वतीने राज्याचे कँबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार उभे होते. त्यांच्या विरोधात बाळू धानोरकर यांच्याच पत्नी प्रतिभा धानोरकर उभ्या होत्या. मतदारांनी सुधीर मुनगंटीवारांना पराभूत केले. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. आताही केंद्रातील सत्तेत पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले. सुधीर मुनगंटीवार निवडून आले असते तर ते आज केंद्रात मंत्री राहिले असते. त्याचा फायदा विदर्भ, चंद्रपूर आणि महाराष्ट्रालाच झाला असता. मुनगंटीवाराचे काय नुकसान झाले? ते राज्यात मंत्री आहेतच. प्रतिभा धानोकरकर विरोधी बाकावर पाच वर्षे बसून राहणार. थोडा विचार करा, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करुन नुकसान कोणाचे झाले? बरं यांच्या विरोधात जे उमेदवार निवडून आले त्यांना विरोधातच बसावे लागले. रुपाताई निलंगेकर, बाळू धानोरकर, सत्ताधारी पक्षात नव्हते, प्रतिभा धानोरकर याही सत्ताधारी पक्षात नाहीत. हे सर्व सांगण्याचे कारण आहे. एका प्रचार सभेत बोलताना मनसेचे राज ठाकरे म्हणाले, एकदा बारामतीत जाऊन पहा, पवारांनी किती उद्योग धंदे बारामतीत नेले. पुणे जिल्ह्यात नेले. याचे कारण काय? पवार साहेब आजवर बारामती मधून जेवढ्या निवडणुका लढले तेवढ्या त्यांनी जिंकल्या. नुसत्या जिंकल्या नाही तर त्यांना बारामतीत कधी प्रचारालाही जावे लागले नाही. लोकांनीच त्यांचा प्रचार केला. ते निवडणूक रिंगणातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाही मतदारांनी वारंवार निवडून दिले. बारामतीतून सात्तत्याने निवडून आल्याने पवारांचे राजकारणातील ज्येष्ठत्व व श्रेष्ठत्व वाढत गेले. त्यांचे राजकीय, प्रशासनिक वजन वाढत गेले. त्याच्या बळावर पवारांनी सर्व उद्योग धंदे, शासकीय योजना बारामतीत खेचून नेल्या. नेमकी हीच प्रगल्भता, हा सुज्ञपणा मराठवाडा, विदर्भातील मतदारांना आला नाही. आपल्या भागातील नेता राजकारणात पुढे जात असेल तर त्याला बळ देण्या ऐवजी त्याचे पाय ओढण्याचे काम आपल्याकडील लोक करतात. त्यामुळे विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार , अशोक चव्हाण यांच्या सारख्या मातब्बर नेत्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. कोणत्याही लाटेवर स्वार होताना या भागातील मतदारांनी आपल्या भागाचा, प्रदेशाचा एवढेच काय स्वतःचाही विचार केला नाही. कधी हिंदुत्व, कधी धर्मनिरपेक्षता, कधी मंदिर, कधी मसजिद, कधी जात, पात, धर्म  कोणती संघटना, कधी जरांगे कधी कोणी अशा लाटावर स्वार होत मतदार मतदानाला जातात. आपण सुज्ञ नागरिक आहोत की, मेंढरे हाही विचार कोणाच्या डोक्यात येत नाही. सद्सद्विवेक बुद्धी, विचारसरणी बाजुला ठेऊन मतदान करतात. मग पुन्हा निवडणुका झाल्या की, मागासलेपणावरुन रडत बसतात. हा दोष राजकीय पक्षाचा नाही, सरकारचाही नाही. हा दोष मतदारांचा आहे. पाच वर्षानंतर येणा-या निवडणुकीत जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले तर पाच वर्षे रडायची वेळ येणार नाही हा विचार करण्याचीही कोणाची तयारी नाही. पाचशे-हजार रुपये नगदी, एक चपटी बाटली आणि एक प्लेट मटन या प्रलोभनावर मतदान करणा-या मतदारांचा प्रतिनिधीही त्याच दर्जाचा राहणार हे लक्षात घ्या. आपल्या कडे असलेले उद्योग विरहित जिल्हे, शेतमालाला रास्त भाव नसणे, पिढीजात दारिद्र्य, शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण, सिंचनाच्या सुविधांचा अभाव, वाढती बेरोजगारी, खड्डेमय रस्ते या सारख्या असंख्य समस्या आपण स्वतःवर ओढवून घेतल्या आहेत. झिंगत केलेले मतदान, पैशाच्या, जातीपातीच्या नावावर केलेले मतदान, मतदानाच्या बाबतीत असलेले औदासिन्य यामुळेच आपण रसातळाला जात आहोत. आता तरी जागे व्हा. सुज्ञ व्हा, जागरुक व्हा. तुमचे भाग्य तुमच्याच हातात आहे. फक्त त्याची जाणीव ठेवा.

विनायक एकबोटे

ज्येष्ठ पत्रकार नांदेड

मो.नं. ७०२०३८५८११

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या