ती, आरसा, आणि मी.....

 ती, आरसा, आणि मी.....

  वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 29/10/2024 : नापास शाळेच्या ऍडमिशन सुरू झाल्या.. पालक विद्यार्थी हितचिंतक अशा नापास मुलांना घेऊन माझ्याकडे येत असत. कुणाकडे पैसे नाहीत कोणी खूप गरीब आहे दहावी मध्ये नववी मध्ये नापास होऊन शिक्षण थांबले आहे असे खूप विद्यार्थी येतात.      

सकाळी नऊ वाजता माझे काम सुरू  झाले आणि एक रिक्षावाले गृहस्थ आले. त्यांनी आपली ओळख करून दिली आणि म्हणाले "माझी मुलगी येथील एका कन्या शाळेत होती पण शाळेने तिला काढून टाकले आहे. इयत्ता नववी मध्ये शिकत होती. तेव्हापासून ती घरीच आहे.     

मी त्यांना मध्येच थांबून विचारलं, "अहो पण शाळेतनं काढायचं कारण काय?"     

त्यावर ते दोन मिनिट गप्प राहिले आणि मग त्यानी मला सांगायला सुरुवात केली. म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी माझी मुलगी तळत्या तेलात पडून गंभीर जखमी झाली. तिचा चेहऱ्याचा भाग, मानेचा भाग, हात, म्हणजे जवळपास अर्ध शरीर भाजून निघाले तिचे.. सात आठ महिने दवाखान्यातच गेले ..ती जगेल असे मुळीच वाटत नव्हते पण माहित नाही आमच्या सुदैवाने की तिच्या दुर्दैवाने ती जगली. त्यानंतर तिचा चेहरा, कातडी विद्रूप झाल्यामुळे तिच्या बाई म्हणतात की त्यांच्या शाळेतील मुली तिला घाबरतात, आणि अशी विद्रूप मुलगी आम्हाला वर्गात नको" .....हे सांगताना त्यांना अक्षरशः रडायला येत होते. त्यांनी हुंदका दिला.    

मी उठून त्यांना पाण्याचा ग्लास पुढे केला.. पाठीवरती थोपटलं ..आणि म्हणलं, "काळजी नका करू, आपण करू काहीतरी. ..तुम्ही मुलीला घेऊन या!"      

ते म्हणाले, "बाई ती खूप निराश झाली आहे. आता दीड दोन वर्ष झाले ती घरीच आहे. कोणाशी फार बोलत नाही, मिसळायचा तर प्रश्नच नाही. तिला कोणी मिसळूनच घेत नाही. घरातली खोली आणि ती ! बरं, लहानगा जीव, काय समजते हो 14/ 15 वर्षाच्या मुलीला. आमच्या डोळ्यासमोर तिचं सगळं भविष्य उभं रहातं."....     

मलाही थोडं आश्चर्यच वाटलं .. "भाजली आहे ना, एवढं काय काळजी करण्यासारखं, होईल बरं. हल्ली प्लास्टिक सर्जरी वगैरे करतात." 

ते म्हणाले, "हो, पण त्याला ठराविक कालावधी जावा लागेल.... मुलगी बऱ्यापैकी हुशार आहे. घरी बसून खूप कंटाळली आहे. तुम्ही तुमच्या शाळेत प्रवेश दिला तर फार उपकार होतील."     

मी म्हणाले, "उपकाराची भाषा करू नका. शिक्षण घेणं हा तिचा हक्क आहे. आपण तिला शिकवूयात."      

माझ्या शब्दाने त्यांना खूप धीर मिळाला. मी म्हणाले, "मुलीला घेऊन या. मी तिच्याशी बोलते आधी, आणि मग आपण ठरवू."     

ते थोडे सुखावले होते. त्यांना कुठेतरी खात्री वाटत होती की इथे माझ्या मुलीला प्रवेश मिळेल. ते तातडीने घरी गेले आणि एका तासाभराने आपल्या मुलीला आणि बायकोला घेऊन माझ्या ऑफिस मध्ये आले.     

तोपर्यंत काही ॲडमिशनचे इंटरव्यू चालले होते. मी मुलांशी, पालकांशी बोलत होते, त्यांचे समुपदेशन करत होते. त्यानंतर समोरचे पालक बाहेर पडले. मी खाली वाकून काही फॉर्म वरती टिपणं करत होते आणि हे  रिक्षावाले गृहस्थ पुन्हा ऑफिसमध्ये प्रवेश करते झाले. सोबत त्यांची पत्नी ही होती. त्यानी सांगितले, "बाई, मुलीला घेऊन आलो आहे. आपण तिच्याशी बोला."     

सुरुवातीला तीची आई माझ्याशी बोलली. त्या म्हणाल्या, "दिवाळीचं तळण तळत होते हो, आणि ही पोरगी धावत आली आणि त्या मोठ्या कढईत पडली." ते सगळं ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता. त्या वेदना, ते हॉस्पिटल, सगळं त्या वर्णन करून सांगत होत्या. मी म्हणलं, "एवढ्या लहान लेकराने हे कसं सोसलं असेल ना ?"       

इतक्यात ती मुलगी आत आली. सुरेखा तिचं नाव होतं आणि मीही इतर मुलांना जसा दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावाने हाक मारते ये ये ...तसं मी हिला हाक मारली "ये ये सुरेखा ..."       

सुरेखा आत आली. तिला पाहिलं आणि मी खुर्चीवरून नकळत उठले. समोर तिच रूप पाहून मला काय वाटलं मी सांगू शकत नाही.. भीती, किळस.. भयानक चेहरा होता.. डोळे बाहेर आलेले, गालाची हाडं वर आलेली, त्याच्यावर जळलेलं मास थोडसं लोंबणारे.. जागोजागी असंख्य जळकट सुरकुत्या, मानेभोवती अशाच सुरकुत्यांचे जळकट जाळे.. केस तुटके तुटके भुरे.. डोक्यावर थोड्याशा जखमा भाजलेल्या.. ओठ भाजल्याने किंचित पुढं आलेले, कानाच्या पाळ्यांची तीच अवस्था.

मी तिच्या हाताशी पाहिलं, हातावरचं मांस दिसावं तसा तांबूस रंग होता. दोन्ही हाताची बोटं आतून मुडपलेली होती आणि अगदी बारीक बारीक बोटं म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या पक्षाच्या पिलाचा जसा रंग असतो ना आणि शरीर असतं तसं ते सगळं होतं. ...      

मी एक क्षणभर म्हटलं हे रोज बघू शकतो का आपण...? मुळात तिच शरीर अतिशय कृष होतं. म्हणजे हाड आणि लोंबणारी कातडी.. बाहेर आलेले डोळे.. तुटके केस हे थोडक्यात वर्णन ....आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारला 'शीला पत्की, सामाजिक सेवा करायला निघाला आहात, हे सोसणार आहे का तुम्हाला ? दररोज नुसतं बघणं तरी काय भयानक होतं ते, छे छे, हे होणे नाही...!'      

पण माझ्या दुसऱ्या मनाने मला सांगितलं... 'मग तू समाजसेवेचा खोटा आव आणतेस का? इतकं साधं तुला सोसता येत नाही.. फक्त बघायचे तर तुला एवढी किळस आली... ती कशी ते सगळं रूप घेऊन समाजात मिरवेल ना? काय सांगणार आहेस तिला तू       

...आणि मग कुठून अवसान आलं माहित नाही, आतून एक आवाज आला.. 'नाही नाही, हीच माझी परीक्षा आहे' ....आणि मी मलाच आजमावण्यासाठी असेल बहुदा.. तिला म्हणलं "हाय सुरेखा...." आणि तिचा तो मांसल वेडा वाकडा हात मी हातात घेतला... तो स्पर्श अगदी थंड होता. कुणीतरी पहिल्यांदा तिचा हात प्रेमाने हातात घेत होतं.. कुणीतरी तिला स्पर्श केला होता.. आणि तिच्या त्या चेहऱ्यावर ओठामधून एक छानसं हसू फुटलं. म्हणजे डब्यात ठेवलेल्या जाईच्या कळ्या उमललेल्या असाव्यात आणि एखादी तळातली कळी न उमललेली ..वरची फुलं काढल्यावर अलगद आणि पटकन उमलते ना तशी तशी ती हसली..! मला वाटतं खूप दिवसांनी ती हसली असावी.       

मी माझी स्वतःची परीक्षा घेणं किंवा स्वतःला आजमावणं याच्यासाठी तो हात तिच्या हातात तसाच ठेवला आणि दोन मिनिटांनी त्या स्पर्शात काय संवेदना होती माहित नाही, मी तिच्या दुःखाशी तद्दूप झाले. क्षणभरात दिसणारे विद्रूप रूप माझ्यासमोरून नाहीस झालं आणि माझ्यासमोर दिसत होती एक छोटी मुलगी, तिला पुन्हा एकदा आपलं आयुष्य फुलवायचं आहे, माझ्या थोड्या मदतीची याचना ती करत होती. 

बस्, मी ठरवलं आणि तिला प्रवेश दिला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. बहुदा मी स्वतःला तिला सहन करू शकते का हे आजमावत होते.      

तिला प्रवेश दिल्या मुळे तिचे आई-वडील दोघेही रडायला लागले‌. "बाई फार उपकार झाले. आज तुम्ही माझ्या मुलीला जवळ घेतलेत."       

मी त्यांच्याही पाठीवरून हात फिरवला. त्यांना धीर दिला... शाळेचे नियम समजावून सांगितले आणि सुरेखाचा प्रवेश झाला ..!     

पण इथे मुद्दा संपला नव्हताच. आमच्या मुख्याध्यापकांना मी तिचा विषय समजून सांगितला. त्या दोघी खूप चांगल्या होत्या. मी त्यांना सांगितले, "आपल्याला त्या मुलीला समजून घ्यायचे आहे."      

तिथे मुख्याध्यापक म्हणून काम करणारी माझी मैत्रीणच होती आणि त्या माझ्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका होत्या, वयाने मोठ्या होत्या.. आई होत्या. त्यानी त्या गोष्टी समजून घेतल्या!      

शाळा सुरू झाली. मुलींचा वर्ग, मुलांचा वर्ग सुरुवातीला एकत्रच असे. मग ऍडमिशन सगळ्या झाल्या की मुला मुलींचे वर्ग वेगळे करत असू...      

मी तेव्हा सेवासदन मध्ये नोकरी करत होते. मी एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी शाळेमध्ये उपस्थित राहत असे. बाकी सगळे व्यवस्थापन माझा स्टाफ पाहत होता. शाळा माझी अगदी माझ्या संस्थेला लागूनच होती त्यामुळे मुख्याध्यापकांच्या परवानगीने मधल्या सुट्टीतही मी एक चक्कर टाकून जात असे. त्याप्रमाणे मी मधल्या सुट्टीत गेले. मुख्याध्यापिका म्हणाल्या, "बाई बरं झालं तुम्ही आलात. एक प्रॉब्लेम आहे..."      

मी म्हणाले, "काय झालं ..?" त्या म्हणाल्या, "ह्या मुलीबरोबर कोणी डबा खायला तयार नाही, हिला कोणी एक एकत्र बसून घेत नाहीत. आम्ही खूप समजून सांगितलं दोन-तीन दिवस, पण मुली ऐकायलाच तयार नाहीत. तुम्ही काही करता का पहा..."

मी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळेला मुलींना सांगितले की, "..मुलींनो समाजातले एक दुर्दैवी मुल आपण स्वीकारू शकत नसू तर तुम्ही पुढे जाऊन काय करणार. एखाद्याला मानसिक आधार देणे, मदत करणे हे आपण करायला नको का...? बरं, तिला कुठला रोग नाहीये. तो अपघात झाला होता आणि त्यामध्ये तिच्या शरीरावर हे वैगुण्य आले आहे. हे तुमच्या बाबतीत घडले असते आणि न करो पण पुढे  तुमच्या एखाद्या मुलाच्या बाबतीत घडले, नातेवाईकाच्या बाबतीत घडले तर तुम्ही अशा वागणार आहात का? तुमच्या सहकार्यामुळे तिला मानसिक उभारी मिळणार आहे मुलींनो.. आणि मी तुमच्या विश्वासावरच तिला शाळेत प्रवेश दिला आहे. मला खात्री आहे की तुम्ही माझ्या सगळ्या मुली.. एका मुलीला समाजामध्ये शिक्षण घेण्याच्या कामी नक्कीच मदतीला उभे रहाल. पण तुम्ही तर मला निराशच केलं. मला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. अगं दहावी काय, तुम्ही पास व्हाल, पण आयुष्यामध्ये ज्या अनेक परीक्षा द्यायच्यात ना, त्याच्यामध्ये सामोरे जाताना द्याव्या लागणाऱ्या अनेक परीक्षांची तयारी आहे, त्यात तुम्ही नापास होणार आहात का? मुळीच नाही. तुम्ही पतकी बाईंच्या विद्यार्थिनी आहात हे लक्षात ठेवा. संकट आणि दुःखाशी सामना करणाऱ्या प्रत्येक माणसा बरोबर उभे रहाण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे...." आणि मी बरंच बोलत राहिले.      

मुली खाली मान घालून बसल्या होत्या. "तुम्हाला डबा खायचा नसेल तर उद्या मधल्या सुट्टीत मी इथे येईन  तिच्याबरोबर डबा खायला.. कारण तिला मी शाळेत घेतले आहे, ती माझी जबाबदारी आहे, तुमची नाही. आणि मी तुम्हाला याबाबत सक्ती करू शकत नाही.      

दुसऱ्या दिवशी मी माझा डबा घेऊन संस्थेत गेले. मी, मुख्याध्यापक आणि ती मुलगी असा मी डबा माझ्या खोलीत खाल्ला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी परत मधल्या सुट्टीत गेले त्यावेळी मात्र मला दृश्य वेगळे दिसले. माझ्या सगळ्या मुलींनी त्या मुलीला आपल्याबरोबर डब्यामध्ये बसवले होते आणि त्या आनंदाने गप्पा मारत डबा खात होत्या. ते दृश्य पाहून माझे डोळे वाहिले.     

त्यांच्या डब्याच्या मध्ये जाऊन मी म्हणलं.. "तुम्ही माझ्या मुली आहात हे सिद्ध केलेत गं ..खूप छान वाटलं.... दहावी होण्यापेक्षा ह्या अशा गोष्टी शिकणं खूप गरजेचे आहे. खूप मोठ्या व्हाल. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला ...!"      

मुलीनाही खूप आनंद झाला. आपण चुकलो याची जाणीव झाली आणि वर्गात पुन्हा प्रश्न निर्माण झाला नाही... शाळा सुरळीत चालू झाली काहीच प्रॉब्लेम नव्हता

सुरेखाच्या डोळ्यात मला हळूहळू आत्मविश्वास दिसायला लागला. अभ्यासाला ती बरीच होती पण फार कृश होती. मी तिच्या पालकांना 'डॉक्टरांना दाखवून एखादं टॉनिक घ्या' असा सल्ला दिला. त्यानंतर नागपंचमी चा सण आला. म्हणजे साधारण ऑगस्ट महिना. शाळा सुरू होऊन दीड एक महिना झालेला. माझी मुलींची शाळा असल्यामुळे सेवासदनला सुट्टी होती ...शाळेला सुट्टी असली की पूर्ण वेळ मी नापास मुलांच्या शाळेत थांबत असे. आमच्या नापास शाळेला सुट्ट्या अगदी कमी, म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि रविवार याखेरीस सुट्ट्या नाहीत, कारण मला नऊ महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करायचा असे. त्यामुळे या दिवशी शाळा चालू होती.       

अर्धी शाळा झाल्यानंतर मुलांना सोडून देण्यात आले आणि त्यानंतर चार वाजता मुलींसाठी फेर धरण्याचा कार्यक्रम होता. मुलींना असे कार्यक्रम फार आवडायचे‌. त्यानंतर आम्ही त्यांना खाऊही देत असू.      

माझ्या त्या शाळेची रचना अशी होती की एक मोठा हॉल होता, त्याच्या बाजूला एक छोटी खोली, नंतर अगदी एंट्रन्स लाईक छोटा व्हरांडा आणि त्याच्या बाजूला माझं ऑफिस. त्यावेळी संस्था लहान जागेत कार्य करत होती. ती जागा भाड्याची होती. त्याच्या व्हरांड्यामध्ये माझ्या बंधूनी भिंतीला एक मोठा आरसा बसवून दिलेला होता, कारण सकाळी तिथे लहान मुलांची शाळा म्हणजे नर्सरी होती.. ती मुले आले की आरशात बघून मग प्रवेश करीत असत.        

त्या दिवशी मधल्या सुट्टीनंतर डबा खायला एक वेळ दिलेला होता. तेव्हा या सगळ्या मुली एकमेकींच्या हातावर मेंदी काढत होत्या. आज त्यांना काहीही करायला मुभा होती. गटागटांनी मेहंदी काढण्याचे काम चालू होते. मी सहज आत डोकावले तर ..सुरेखा च्या हातावर दोन मुली मेंदी काढत होत्या. मला खूप आनंद झाला. तिची ती दुमडलेली बोटं, तो भाजलेला हात, पण त्याच्यावर मुली आनंदाने मेंदी काढत होत्या. मला कुठेतरी मनात समाधान वाटले‌. मुलींचे आत मध्ये ड्रेसिंग चालले होते, लिपस्टिक लावत होत्या.. वेण्यांमध्ये  गजरे घालत होत्या ..कुणी फेराच्या गाण्याची प्रॅक्टिस करत होत्या.. त्यांच्या शाळेत त्यांना संधी मिळाली नव्हती. आज इथे त्यांना ते मुक्तपणे अनुभवता येणार होते ...!     

माझ्या ऑफिसमध्ये बसून मी समोर व्हरांड्याकडे पाहत असताना मला आरशासमोर सुरेखा दिसली. ती ही नटून आली होती. छान गुलाबी पंजाबी ड्रेस घातला होता. हाताला नुकतीच मुलींनी मेंदी लावलेली होती, आणि तिने गळ्यामध्ये एक हार घातला होता ज्याच्यावर आर्टिफिशियल खड्यांचे डिझाईन होते. तो हार ती व्यवस्थित करून आपल्या स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि आनंदीत होत होती. ती हार पुन्हा पुन्हा व्यवस्थित करत होती.      

मी आश्चर्यचकित झाले ... मुळात सुरेखाने आरशात आपल्याला पहावं हे धाडस होते आणि ती पुन्हा पुन्हा आपला तो गळ्यातला हार सारखा करून आपल्या छबीकडे पाहत होती. अर्थात आरशात बघायचे तिचे वयच होते, परंतु पूर्वी दुर्दैव हे की आरशातले रूप तिला आनंद देत नव्हते पण आता मात्र तसे नव्हते. त्या सुरकुतलेल्या भाजक्या जळक्या मानेवर रुळणाऱ्या त्या हाराला ती व्यवस्थित करत होती आणि पुन्हा पुन्हा तो नीट बसलाय ना हे निरखत होती. ..कदाचित तिला आपल्या चेहऱ्यात एक नवीन सौंदर्य दिसत असावे.    

मी ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होते... मी मनात म्हणत होते हिला त्यात जळक्या कातडीवर दिसणाऱ्या त्या हारातले कोणते सौंदर्य जाणवत होते ठाऊक नाही, पण तिला जगण्यातली सुंदरता मात्र जाणवली होती. तिचं ते आरशात पाहणं मला मोहून टाकणारे होते. सुरेखला समवयस्क मुलींनी स्वीकारणे... तिच्या कुरूपतेचा मनापासून सर्वांनी स्वीकार करणे.. तिला थोडे प्रेम देणे आणि पुन्हा वर्गात बसून शिकायची संधी मिळणे... या सर्व कृतींमुळे सुरेखाच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आला होता त्या आत्मविश्वासाचे विलोभनीय सौंदर्य मी पाहत होते.      

आज सुरेखाच काय, मला सगळे जग सुंदर दिसत होते.. त्या आरशासमोरची मुलगी मला सर्वात सुंदर दिसत होती... कारण तिला जगणे सापडले होते.... खूप आनंदाचा क्षण होता. कदाचित त्या आरशानंही तिला सांगितलं असेल.. "सुरेखा, आज तू खूप सुंदर दिसतेस"..      

नंतर सुरेखा अगदी सहज रुळली, उत्तम गुणांनी पास झाली. त्यानंतर तिच्या त्वचारोपणाच्या ऑपरेशन साठी एक सामाजिक संस्था पुढे आली. त्यांनी मदत केली. पुढे सुट्टीमध्ये तिची तीन-चार ऑपरेशन झाली आणि सुरेखाचे हात छान काम करायला लागले. बोटं सरळ झाली. चेहऱ्यावरचे आणि मानेवरच्या.. गळ्यावरच्या.. सुरकुत्या कमी झाल्या ! 'सुंदर मी होणार' चे सेशन दोन-चार महिन्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले ..एका स्थानिक आमदाराने या कामी खूप मदत केली ..!     

सुरेखा पास झाली आणि त्यानंतर तिने जवळच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती बीए झाली. बालवाडीचा कोर्स केला. एका अंगणवाडी मध्ये ती आता शिक्षक म्हणून कार्यरत आहे...!!!     

आता माझे आरशात पाहण्याचे वय नाही, तरीही मी जेव्हा जेव्हा आरशात पाहते तेव्हा तेव्हा माझ्या आधी मला तिची प्रतिमा दिसते, कारण मला नेहमी जाणवत राहतं की आरशावर सुरेखाचा पहिला हक्क आहे, त्यानेच तिला सांगितलं, 'तू खूप सुंदर दिसतेस', आणि तिथूनच तिचा आत्मविश्वास वाढला. मुळतः आरशात बघण्याचे धाडस तिच्यात निर्माण झाले आणि आमची सुरेखा सुंदर झाली, अगदी अंतर्बाह्य...!

©®शीला पतकी, सोलापूर, ८८०५८५०२७९,

डॉ. सुनील इनामदार, संग्राहक, ९८२३०३४४३४.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या