दिनदिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी !

 

दिनदिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी !

/वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/11/ 2024 : आपआपली गुरं घेऊन रानात जात असताना त्या गुरांना वाघाचं भय असायचं आणि त्यांच्या पासून संरक्षण करण्यासाठी गुराखी हातात काठी बाळगत असे. गाय-बैल-म्हैस रुपी गुरं म्हणजे एकप्रकारे शेतकऱ्यांची दौलतच. गुरांना जपण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा म्हणजेच आजवर आपण जपलेलं हे गाणं म्हणजे दिवाळी गीत नाही तर ते गावाकडचं लोकगीत असून ते ऋषी संस्कृतीतून जन्माला आलेलं आहे. या गाण्याची आठवण दिवाळीच्या दिवशी ओठावर येते.

दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी ।।

गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या ।

लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा ।।

दे माय खोबऱ्याची वाटी ।

वाघाच्या पाठीत घालीन काठी ।।

           पहिला प्रश्न मनात येतो की, लक्ष्मण वाघाच्या पाठीत काठी घालीन असं का म्हणतो? आणि पाठीत काठी घालायला वाघ आला कुठून? पण यावर विचार केला तर हे परंपरेने चालत आलेलं गाव खेड्यातील गाणं आहे.

           महाराष्ट्रात वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते. शेतकरी गाय आणि वासराचे पूजन करुन वसुबारस साजरी करतात. गाय ही कृष्ण स्वरुपात ईश्वराचे प्रतिनिधित्व करते. वसु म्हणजे द्रव्य (धन) आणि बारस म्हणजे द्वादशी.

*ग्रामगीतेतील गोवंश सुधारः-

              संत गाडगे महाराजांनी ग्रामगीतेबद्दल अभिप्राय देताना म्हटले आहे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची "ग्रामगीता" ही आज गीता, ज्ञानेश्वरी प्रमाणे जनतेला खरे ज्ञान देऊन खेड्यापाड्यात, झोपडी-झोपडीत सुख, समाधान पैदा करील, असा भरवसा वाटतो. ग्रामगीतेतील ग्रामनिर्माण पंचक म्हणजे समग्र ग्राम विकासाची गुरुकिल्ली आहे. गोपालन आणि संवर्धन हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा प्राण असलेल्या कृषिचा मूलाधार आहे म्हणूनच  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी "गोवंश सुधार" या अध्यायात स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे.

भारत कृषिप्रधान देश ।

शेतीसाठी हवा गोवंश ।

गोरसा इतुका नसे सत्वांश ।

अन्यत्र शुद्ध ।।

             कृषिप्रधान असलेल्या भारत देशातील समग्र ग्राम विकासाचा म्हणजेच ग्रामोन्नतीचा मूलाधार म्हणून राष्ट्रसंत गायीकडे पाहतात. गायीला वैदिक काळापासून संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. प्रत्यक्ष वेद गायीला नमन करतात. ज्या स्थानावर गाय निवास करते, त्या स्थानावरील धूळ देखील पवित्र होते. गायीच्या शरीरात सर्व देवांचा वास आहे म्हणून गायीला "सर्वदेवमयी" असे म्हणतात. राष्ट्रसंतानी गायीच्या दुधाचे महत्त्व ग्रामगीतेत विशद केले आहे.

गोदुग्ध नित्य सेवन करता ।

कायाकल्पचि होय तत्त्वता ।

शक्ती, चपलता, बुद्धिमत्ता ।

आरोग्य हाता नित्य राही ।।

         गायीच्या दुधात कायाकल्प करण्याचे सामर्थ्य असून पंचगव्य म्हणजेच दुध, दही, तूप, गोमूत्र, शेण. कोणतेही अनुष्ठाण हे या पंचगव्या शिवाय होत नाही. नवजात बालकाला आईचे दुध चालत नसेल तर गायीचे दुध दिले जाते.

*ग्रामगीतेतील दिवाळी सणः-

              दिवाळीचा उत्सव आहे म्हणून कुणीही मनमाने पैसा खर्च करु नये. पैसा चांगल्या कामात खर्च व्हावा म्हणून मी सणांची बचत करण्याचे बोललो नाही तर दिवाळी साजरी करताना दिवाळे निघू नये. लोक तुमची टिंगल करतील दिवाळे निघाले म्हणूनी. राष्ट्रसंत पुढे म्हणतात.

दिवाळी सण आला ।

सर्वांनिच पाहिजे केला ।

परी पाहावा कोण राहिला ।

भुकेला घरी ।।

          गरीब माणसांना आमंत्रण देऊन घरी बोलवावे. त्यास गोडधोड खाऊ घालावे. सर्वांनी मिळून सर्वांचे मोठेपण टिकवावे. सर्व गावांचे एकच लक्ष्मीपूजन व्हावे. सर्व माणसांना एका भव्य मंडपात एका ठिकाणी बसवावे. सर्वांनी मिळून सर्वांना फराळ किंवा जेवण द्यावे. मुला-मुलींनी भाऊ-बहीणीचे नाते वाढवावे. आज समाजातून बंधुभाव व भगिनीभाव कमी झाला आहे दिवाळी बारा महिन्यांनी एकदा येते. तिच्या स्वागतासाठी घरे, दरवाजे स्वच्छ करतात. भिंती व ओसरी सारवून त्यास रंग देतात. दिवाळी झाली की, दुसरे दिवशी झाडझूड नाही, सडा-सारवण नाही. सर्व ठिकाणी काडी-कचरा दिसतो. मग लक्ष्मी ऐवजी अवदसाच नशिबी येईल. राष्ट्रसंत भजनात म्हणतात.

चल चल भाई, करे सफाई ।

कुडा कचरा साफ करे ।

बहून दिनोंका रुका हुआ है ।

मिलकर सुंदर आज करे ।।

           त्यापेक्षा दररोज सकाळी उठणे हाच खरा दिवाळी सण होय. असे राष्ट्रसंत म्हणतात. दिवाळीचे स्मरण ठेवून आपण स्वच्छता व पवित्रता शिकावी. सर्वांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी प्रदुषण मुक्त दिवाळीचा संकल्प करून उत्साहाने दिवाळीचे स्वागत करु या. 

दिवाळी येणार, अंगण सजणार ।

आनंद फुलणार, घरोघरी ।

आमच्या घरी अन् तुमच्या घरी ।

रुप्याच्या ताटात, दिवा अन् अक्षत ।

ओवाळणी थाटात, घरोघरी ।आमच्या घरी अन् तुमच्या घरी ।।

          दिवाळीत घरदारच नाहीतर मनही स्वच्छ होणार. अंतःकरणात शुद्ध सात्त्विक भाव प्रकटणार. रंगीबेरंगी रांगोळी, घरोघरी नक्षिदार आकाश कंदिल स्वागताला पणत्यांची रोषणाई आणि घरोघरी फराळाचा खमंग सुटणारा सुवास.

          भारतीय संस्कृतीत सणांचा उद्देश प्रत्येक जीवाचे भले व्हावे हाच आहे. त्रेता आणि द्वापार युगातील राक्षसी प्रवृत्तीच्या विजयाचे महत्त्व कलियुगातही किती आहे हे अधोरेखीत करणारा प्रेरणा देणारा हा दिवाळी सण घरोघरी तेवढ्याच उत्साहाने संपन्न होतो. दिवाळी सण प्रकाशाचे, आनंदाचे, मांगल्याचे, चैतन्याचे प्रतिक घेऊन येतो, त्यामुळे ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची व मांगल्याची जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर

श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- ९९२१७९१६७७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या