संपादकीय..............✍️
कौन बनेगा मुख्यमंत्री
वृत्त एक सत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/11/2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे धूमशान सुरू असताना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार कोण हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ (२०१४-२०१९) पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’चा घोषा लावला होता. त्याचा परिणाम युती सरकारवर झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपासून दूर राहत त्यांनी सत्तेचा रिमोट आपल्या हाती ठेवला. किंग बनण्यापेक्षा बाळासाहेबांनी नेहमी किंगमेकरची भूमिका बजावली. बाळासाहेबांच्या पश्चात मात्र त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले. सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपने १६४ मतदारसंघांत उमेदवार उभे करत १०५ जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेने १२८ जागांवर उमेदवार उभे करत केवळ ५६ जागा जिंकल्या. १०५ जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतापासून दूर होता. ही संधी साधत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा आग्रह धरला. त्यावेळीही शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोज माध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य करत होते. त्यामुळे युतीत तणाव निर्माण होऊन शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आगळीवेगळी महाविकास आघाडी उदयास आली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना आपली सिंहगर्जना काही गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेत पहाटेचा शपथविधी घडवून आणला. फडणवीस यांची ही सत्तेची आगळीक त्यांच्याच गळ्यात आली व त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. ज्या फडणवीस यांच्या नावावर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री म्हणून बहुमान कोरला गेला होता त्याच फडणवीसांच्या वाट्याला पुढील निवडणुकीत सर्वांत कमी कालावधीचे मुख्यमंत्री होण्याचा बहुमान लिहिला जावा, ही राजकीय शोकांतिकाच म्हणावी लागेल. या पहाटेच्या शपथविधीनंतर मात्र महाराष्ट्रातील राजकारणाची कूसच बदलली आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आली. भाजपला जे जमले नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून दाखवले. शरद पवार हेच या महायुतीचे शिल्पकार ठरले व त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. जे बाळासाहेब ठाकरे सत्तेपासून नेहमी दूर राहिले त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे यांनी युती तोडत विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली. मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान होताच आपोआप सत्तेचा रिमोट शरद पवार यांच्या हाती आला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले, तरी शरद पवार यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करत राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या होत्या. निधी देण्यावरून या महाविकास आघाडीत धुसफूस सुरू होती. याचा फायदा घेत भाजपने दोन वर्षांत मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना खाली उतरवत असली शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. हे करताना फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे आपले स्वप्न साखरझोपेच्या वेळी पूर्ण करण्यासाठी मदतीला धावलेले जुने मित्र अजित पवार यांना सोबत घेण्यास विसरले नाहीत. त्यामुळे राज्यात दोन वर्षांपासून युती नाही, तर महायुतीची सत्ता आहे. राज्यातील सत्ताकारण पाहिले तर अर्धी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत व विरोधातही आहे. राज्यात ही स्थिती असताना सर्वपक्षीय नेते मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा संभ्रमावस्थेत आहेत की काय, अशी स्थिती निर्माण करत आहेत. सन २०१९ चा कित्ता गिरवत संजय राऊत व उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, असा विचार निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून बोलून दाखवत आहेत. ऐन निवडणुकीत हा प्रश्न बाजूला पडला असताना शरद पवार यांनी पुन्हा या प्रश्नाला हवा देत ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होणार, असे सांगून नामानिराळे झाले आहेत. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज पवार यांनीही शरद पवारांच्या या तोडग्यावर सहमती दर्शवली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपण महाविकास आघाडीत आहोत, पण जिथे ‘मशाल’ चिन्हावर उमेदवार उभे केले आहेत तिथे ‘मशाल’ आलीच पाहिजे, असा प्रेमळ दम कार्यकर्त्यांना व नेत्यांना दिला आहे. एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचे निश्चित केलेले दिसते. शरद पवारांचा हाच तोडगा उद्धव ठाकरे यांनी युतीत असताना मान्य केला असता तर आज राज्यातील राजकारण वेगळे असते. महाविकास आघाडीत सर्वांत जास्त उमेदवार काँग्रेसने, नंतर शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने उभे केले आहेत. त्यातही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. शरद पवार यांच्या वाट्याला म्हणा किंवा उमेदवार नसल्याने म्हणा, सर्वांत कमी जागा असल्याने ते मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये नाहीत. पण काँग्रेसपेक्षा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर सत्तेचा रिमोट हा शरद पवार यांच्या हाती पुन्हा येणार आहे. कारण शिवसेनेचे दोन शिलेदार उद्वव ठाकरे व संजय राऊत या घडीला तरी शरद पवार यांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. दुसरीकडे, महायुतीतही मुख्यमंत्रिपदावरून सुप्त ज्वालामुखी घगधगतच आहे. आता तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील, असे अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकंदरीत सन २०१९ प्रमाणेच २०२४ च्या विधानसभेत मुख्यमंत्रिपदावरून राजकारणाची कूस पुन्हा बदलणार, असे दिसते. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्यांना सत्तेवर बसू द्यायचे नाही व ‘मी नाही त्यातली...’ असे म्हणत राज्याच्या राजकारणात ‘काडी’ करायची. त्यातून आगामी काळात देश गाढ झोपेत असताना पहाटेऐवजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री शपथविधी उरकला तर नवल वाटायला नको!
चंद्रशेखर शिंपी
निवासी संपादक, दै. लोकनामा
9689535738
0 टिप्पण्या