काट्याच्या अणीवर वसली तीन गावे !

 

काट्याच्या अणीवर वसली तीन गावे !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 21/11/ 2024 : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे भारुड आध्यात्मिकतेने ओतप्रोत भरलेले आहे. भारुड याचा अर्थ बहुरुढ असा आहे. या भारुडाचा अर्थ अतिशय सुक्ष्म आहे. तो थोडक्यात पाहू या.

काट्याच्या अणीवर वसली तीन गावे ।

दोन ओसाड, एक वसेचिना ।।१।।

         काट्याची अणी म्हणजे अणकुचीदार टोक. त्यावर तीन गावे वसणे अशक्य. हा कोणता काटा की, त्याने तीन गाव वसायला जागा दिली. हा काटा आहे संकल्पाचा. मी कुणीतरी आहे म्हणून संकल्प झाला आणि गावांना वसण्यासाठी जागा दिली. माझी राहण्याची जागा म्हणजे मी तीन गावात राहतो. ही तीन गावे म्हणजे तीन अवस्था. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. मी जागृतीत तसेच स्वप्नात सुद्धा असतो आणि गाढ झोपेत म्हणजे सुषुप्तीत सुद्धा मी असतो. स्वप्न आणि सुषुप्ती या दोन गावाचा काही उपयोग नाही. कारण सुषुप्तीत मी गाढ झोपलेला असतो. स्वप्नात तर मनाचेच खेळ चालू असतात. तेथे वास्तवाला स्थान नसल्यामुळे या दोन्ही गावांना ओसाड म्हणजे "मी" असून नसलेला म्हणजे निर्जन म्हटलं आहे. आता राहिले गाव जागृतीचे. तर ते वसेचिना. वसेचिना म्हणजे जागृती ही अवस्था स्थिर नाही. झोपेतून उठल्यावर जागृतीचा अनुभव नवा असतो. कालचा आज नाही. आजचा उद्या नाही. परिवर्तन हा हिचा धर्म आहे. जन्माला येण्यापासून मरेपर्यंत या जागृतीतला "मी" बालपणासून, म्हातारपणापर्यंत बदलतो. म्हणून माऊली ज्ञानेश्वर या गावाला वसेचिना असे म्हणतात.

वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे, एक घडेचिना ।।२।।

         या वसेचिना गावात तीन कुंभार आले. कुंभार म्हणजे मडकी घडविणारा. हे तीन कुंभार म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त होय. संकल्प विकल्पात्मक स्वरुपाचे असलेले मन काहीही करण्यास अपात्र ठरते आणि बुद्धी निश्चयात्मक स्वरुपाचे असल्याने काही करण्यास प्रेरणा देऊ शकेल पण स्वतः काही करण्यास असमर्थ असते म्हणून मन आणि बुद्धी दोन्ही थोटे ठरतात. आता राहिले चित्त. मनुष्य कोणतेही कार्य करताना त्यांच्या चित्तात तशा प्रकारच्या चित्तवृत्ती उत्पन्न होतात. तेव्हा चित्त काही एक कार्य करण्यास पात्र आहे, पण त्याच्याने काही घडेचिना. चित्त चंचल असल्याने कोणतेही कार्य करताना ते निश्चल होईचना. यथासांग कर्म ते ही घडेचिना.

घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची, एक भाजेचिना ।।३।।

           या घडेचिना कुंभाराने घडवली तीन मडकी. तीन मडकी म्हणजे संचित, प्रारब्ध, क्रियमाण. संचित कर्म भोगायला आली नाही म्हणून ती अपक्व म्हणजे कच्ची. प्रारब्ध कर्म म्हणजे ती भोगून संपवण्यासाठी हा जन्म घेतला तरी ती कर्म त्यातली काही भोगली, काही उरली म्हणजे ती अर्धवट भाजलेली म्हणून कच्ची. संपूर्ण जीवनकाळ जोवर व्यतीत होत नाही तोवर प्रारब्ध भोगून संपले असे आपण म्हणू शकत नाही. पूर्णत्वाला न पोहोचल्याने प्रारब्ध सुद्धा अपरिपक्व फळाप्रमाणे कच्चे आहे. त्यामुळे संचित, प्रारब्ध ही दोन कच्ची मडकी. क्रियमाण कर्म हे मडके भाजेचिना. म्हणजे त्याला अग्नीत तापवले की ते भाजते. कर्मरुपी मडकी भाजण्यासाठी कोणता अग्नी आवश्यक आहे? तर समबुद्धीचा अग्नी जे कर्म बुद्धीरुपी अग्नीत आपण भाजून घ्यायला पाहिजे. ते आपण भाजत नाही म्हणून क्रियमाण कर्म हे भाजेचिना.

भाजेचिना त्यात रांधले तीन मुंग ।

दोन हिरवे, एक शिजेचिना ।।४।।

         या भाजेचिना मडक्यात तीन मुंग रांधले. मुंग रांधले म्हणजे अन्न शिजवणे. भाजेचिना मडक्यात ते मुंग शिजवले ते मुंग ही काळात परिवर्तीत होतात. काळ म्हणजे तीन मुंग. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ हे तीन मुंग. भविष्यकाळ आणि भूतकाळ हे दोन हिरवे मुंग हे दोन्ही खाण्यासाठी अयोग्य. भूतकाळ होऊन गेला आणि  भविष्यकाळ व्हायचा आहे, त्यामुळे प्रत्यक्षात त्यांचा उपभोग घेण्यात ते अयोग्यच म्हणावे लागतात. उरले ते फक्त वर्तमानकाळ रुपी मुंग. हा वर्तमानकाळ असा आहे की, तो शिजेचिना. वर्तमानात क्रिया झाली म्हणजे ती क्रिया पूर्ण होताना भूतकाळात जमा होते. वर्तमानकाळात हा मुंग शिजेचिना.

शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले, एक जेवेचिना ।।५।।

        हे शिजेचिना मुंग खायला आले तीन पाहुणे. हे तीन पाहुणे म्हणजे माझे तीन देह. तर आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. हे देह जगातला पाहुणाच असतो. तो आयुमर्यादा असेपर्यंत राहतो. नंतर गतप्राण होऊन निघून जातो. या तीन देहापैकी आध्यात्मिक देह आणि आधिदैविक देह यांच्याकडे आपण कधी लक्षच देत नाही. आध्यात्मिक देह जो आत्मिक प्रगतीचा कारक आहे. आधिदैविक देह म्हणजे जो इंद्रियांच्या अधिष्ठानाची देवताचे निवास स्थान आहे. हे दोन देहाच्या गरजांच्या बाबतीत आपण दुर्लक्ष करतो म्हणून हे दोन देह रुपाने आधिभौतिक देह तो आपले भौतिक स्तरावरील अस्तित्व प्रकाशमान करतो. यासाठी आपण मरमर झटत असतो. तो जेवेचिना म्हणजे त्याचे जेवणात मन लागेना. तो आशा, चिंता, कल्पनाला कवटाळून बसतो की, पुढे आलेले भोग गोड मानून जेवत नाही म्हणून हा आधिभौतिक देह जेवेचिना.

जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी ।

दोन वांझ्या, एक फळेचिना ।।६।।

           जो जेवेचिना असा आधिभौतिक देह त्याला तीन म्हशी दिल्या. म्हशीचे दोहन केले असता, त्या दुध देतात. ज्ञानदेवांनी महिष शब्दाची योजना करताना महा-इष म्हणजे मोठी इच्छा अशी उत्पत्ती केली असावी. म्हशी म्हणजे इच्छा. इच्छांचे दोहन केले असता, त्या फलद्रुप होतात. इच्छाचे फलीत म्हणजे दुध. इच्छा तीन प्रकारच्या आहेत. इच्छा प्रवृत्तीला जन्म देते. तर तीन कारण स्मृती, श्रुती, कृती. स्मृती म्हणजे कुणाचे तरी काही आठवते, तसे आपल्याला वाटते. श्रुती म्हणजे कुठेतरी ऐकलेले असते, तसे आपण करतो. कृती म्हणजे एखादी क्रिया करण्याची प्रवृत्ती होते. ह्या तीन म्हशी म्हणजे स्मृती, श्रुती, कृती होय. यापैकी कृतीची जोड नाही तोवर स्मृती आणि श्रुती कधीच फळत नाहीत, त्यामुळे त्या दोघी वांझ आहेत. कृती नावाची म्हैस फळेल याची आशा करु शकतो पण ती फळेचिना. फळेचिना म्हणजे काय? मी कृती तर करतो पण मला कधीही मनासारखे फळ मिळत नाही. 

फळेचिना तिला झाले तीन टोणगे ।

दोन मेले, एक जगेचिना ।।७।।

          जी कृती नावाची इच्छा रुपी म्हैस आहे ती तीन टोणग्यांना जन्म देते. टोणगे म्हणजे रेडे. हे तीन टोणगे कोणते? काम, क्रोध, मोह. आपण केलेल्या कृतीतून मोह उत्पन्न होते, मनासारखे नाही झाले की क्रोध उत्पन्न होतो. एकदा यश मिळाले की काम उत्पन्न होतो.  यापैकी क्रोध आणि मोह हे दोघे काही काळासाठी असतात. ते दोघे जन्माला आल्याबरोबर मेले असे होते. पण काम नावाचा टोणगा तो जगेचिना. हा काम जगेचिना म्हणजे काय? तर एखाद्या बाईला मुल होते आणि मरते. पुन्हा दुसरे मुल होते आणि मरते असे अनेकदा होते. तेव्हा आपण म्हणतो की, त्या बाईचे मुल जगेचिना. हा काम ही असाच आहे. एक काम उत्पन्न होतो. इच्छा साध्य झाल्यावर नष्ट होतो म्हणून इच्छा चक्र इथे थांबत नाही, परत दुसऱ्या कामाला जन्माला घालते. तो संपतो आणि तिसरा उत्पन्न होतो म्हणून हे कामाचे जगणे मरणे अविरत चालत राहते. माऊली म्हणतात, काम हा टोणगा जगेचिना.

जगेचिना त्याचे आले तीन रुपये ।

दोन खोटे, एक चालेचिना ।।८।।

         हा जो जगेचिना तो काम आहे. मनुष्य व्यवहारात चालवतो आहेत. तो काम विकून रुपये कमावतो. हे रुपये तीन म्हणजे सुख, दुःख, ईर्षा होय. काम विकून सुख दुःखाची प्राप्ती होते, हे सर्व मान्य आहे पण ईर्षा कधी उत्पन्न होते? तर आपल्याला एखादी गोष्ट मिळाली की दुसऱ्याच्या तशाच गोष्टीशी आपण तुलना करु लागतो. मी मोठा, श्रीमंत याची जास्त स्पर्धा सुरु होते की, मी सर्वात मोठा, श्रेष्ठ आहे. ईर्षा सुरू होते. सुख दुःख हे तर क्षणिक असतात म्हणून ते खोटे. पण ईर्षा क्षणिक नसते पण ईर्षेचे नाणे जगाच्या बाजारात चालायला गेलो तर चालत नाही. अमक्याला तसे मिळाले म्हणून मला तसे या असे कोणाला सांगायला गेलो तर काही मिळत नाही. म्हणून हे ईर्षेचे नाणे चालेचिना.

चालेचिना तिथे आले तीन पारखी ।

दोन आंधळे, एका दिसेचिना ।।९।।

        माझे ईर्षेचे नाणे का चालेना, म्हणून माणसाला प्रश्न पडतो. तेव्हा त्या नाण्याची परिक्षा करण्यासाठी परीक्षक नेमतो. हे तीन परीक्षक म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. यापैकी मन आणि बुद्धी हे स्वतःच्याच भावनांचे समर्थन करतात. मन आणि बुद्धी हे स्वार्थाने आंधळे झालेले असतात. म्हणून अहंकाराला विचारावे तर त्या काही दिसेचिना.

दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या ।

दोन हुकल्या, एक लागेचिना ।।१०।।           

हा जो मला काही दिसेचिना म्हणणारा अहंकार. तो खोटे बोलतो म्हणून देव त्याला तीन बुक्क्य मारतो. ह्या तीध बुक्क्या म्हणजे तीनळ ळंअंअंह ताप. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक हे तीन ताप मनुष्याला सहन करावे लागतात. त्यापैकी आध्यात्मिक ताप सहन करण्याच्या वेळी हा अहंकार आत्मा म्हणून काही अस्तित्वात नाही. जे काही आहे ते हे जग आणि हा देहच आहे. पापपुण्य म्हणून काही नसते, अशा चार्वाक्यासारख्या वल्गना करतो आणि आध्यात्मिक ताप सहन करताना जो बोध करुन घ्यायला हवा, तो करुन घेत नाही. ही बुक्की हुकली. आधिदैविक बुक्क्री म्हणजे इंर्दियाधिष्ठित देवतांचा कोप, जरा, व्याधी इत्यादी. पण ते भोगताना अहंकार स्वतःला काही लावून घेत नाही. वात, पित्त, कफ बिघडले असे म्हणून शरीराच्या माथी दोष देतो आणि शरीर बिचारे मुकाट्याने भोगते. त्यामुळे ही सुद्धा बुक्की हुकली. आता राहिली शेवटची आधिभौतिक बुक्की जिच्यामुळे अपमानदी व्यावहारीक हानी सहन करावा लागतात. पण अहंकार इतका निर्ढावलेला असतो की, निर्लज्जपणे तो तरीही तसाच राहतो म्हणून माऊली म्हणतात. याला लागेचिना. अहंकार म्हणजे मी पणा.

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरु वाचुनी, कळेचिना ।।११।।

         हे समजण्यासाठी आम्हाला हे समजावून देण्यासाठी एकमेव सद्गुरुच समर्थ. आम्ही सद्गुरुरायांना शरण आहोत. त्यांनी आमच्या बोधाकरिता, उद्धाराकरिता योग्य वाटेल तो उपाय करावा. 

सद्गुरु वाचोनी सापडेना सोय ।

धरावे ते पाय आधी आधी ।।

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर

श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ 

फोन- ९९२१७९१६७७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या