✳️ आधुनिक जगातील संघर्ष: जीवनशैलीचा पुनर्विचार
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/11/ 2024 : आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण अधिकाधिक संपत्ती मिळवण्यासाठी धडपडतो आहे. मात्र, यशस्वीतेच्या शर्यतीत किती जण खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेत आहेत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.
*भुकेच्या गरजेतून समाधानापर्यंत :
खरे भाग्यवान कोण? जेव्हा भूक लागते तेव्हा अन्न सहज मिळणारे, की हॉटेलमधील महागड्या पदार्थांची वाट पाहणारे? जठराग्नी पेटल्यावर भूक भागवण्यासाठी जो अन्नाचा कण मिळतो, त्याच्यापेक्षा मोठे समाधान काहीच नाही. पंचतारांकित हॉटेलमधील महागडे भोजन भुकेच्या वेळी न मिळाल्यास त्याचे मूल्य काय राहते?
गीतेत सांगितल्याप्रमाणे, परमात्मा जठराग्नी रूपात आपल्यातच वास करत असतो व अन्नाचे पचन करतो.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: |
प्राणापानसमाकार: पचाम्यन्नं चतुर्विधम् ||
जर आपण स्वतःच्या शरीरातील या परमात्म्याला ओळखले नाही, तर जगातील कोणत्याही संपत्तीचा उपयोग नाही.
*संपत्तीचा भ्रम आणि त्याचे परिणाम :
पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखांच्या मागे धावताना आपण खरी सुख-शांती गमावत नाही का? अनेकदा श्रीमंत कुटुंबातील मुलांना लहान वयातच भरपूर पैसा, महागड्या गाड्या आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु या भौतिक गोष्टींमुळे त्यांना शिस्त, जबाबदारी किंवा जीवनातील खरी मूल्यं शिकायला मिळत नाहीत. परिणामतः चुकीच्या वर्तनामुळे ते स्वतःचे आणि इतरांचेही जीवन उद्ध्वस्त करतात.
*नातेसंबंध आणि मूल्यांची घसरण :
नवरा-बायको दोघेही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करत असतील, परंतु त्यांच्याकडे कुटुंबासाठी वेळ नाही. वृद्ध आई-वडील वृद्धाश्रमात, मुलं बोर्डिंग स्कूलमध्ये—हे चित्र आता सामान्य होत चालले आहे. आणखी चिंतेची बाब म्हणजे "न संपूर्ण कुटुंब" या संकल्पनेची वाढती प्रवृत्ती. लग्न न करता फक्त सोबत राहणे किंवा लग्न करून मुलांना जन्म न देणे यासारख्या जीवनशैलीला समाजात मान्यता मिळत आहे.
*सामाजिक आणि नैतिक अधःपतन
आज आपल्याला आई-वडील सांभाळण्यासाठी सरकारला कायदा करावा लागतो, हे आपल्या समाजाच्या नैतिक अधोगतीचे लक्षण आहे. ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, वाढवले, शिकवले, त्यांची जबाबदारी घ्यायला कायद्याची गरज भासणे ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे.
*आध्यात्मिकतेचा विसर आणि तात्कालिक समाधानाचा शोध
सध्याच्या परिस्थितीत मंदिरांमध्ये वाढती गर्दी दिसून येते. परंतु ही भक्तीभावनेतून येते की जीवनातील शांतीच्या शोधात? हे आत्मपरीक्षण करण्याचे वेळीच चिन्ह आहे. आपण आपल्या जीवनशैलीचा पुनर्विचार केला नाही, तर ही अस्वस्थता कधीच संपणार नाही.
*संतांची शिकवण महत्त्वाची
आजच्या ताणतणावपूर्ण आणि स्वार्थी जीवनशैलीत संतांची शिकवण अधिक महत्त्वाची ठरते. त्यांचे विचार आपल्याला साधेपणा, सत्य, संयम, आणि परोपकार शिकवतात. त्यांनी सांगितलेली "सर्वात्मतेची भावना" लोकांमध्ये आपुलकी आणि सहिष्णुता निर्माण करते.
संतांचे संदेश आपण भौतिक सुखाच्या मागे न धावता, मानसिक शांती आणि नैतिकता जपावी, असे शिकवतात. त्यांच्या विचारांचा अवलंब केल्यास समाजात समतोल, शांती, आणि सद्भावना प्रस्थापित होऊ शकते, जे आजच्या वैयक्तिक आणि सामाजिक संघर्षांवर मात करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
*सध्याच्या जीवन पद्धतीचा पुनर्विचार करणे हीच काळाची गरज
आज खरी गरज आहे ती जीवनशैलीतील साधेपणा स्वीकारण्याची, नात्यांमधील माणुसकी जोपासण्याची आणि भौतिक सुखांपेक्षा मानसिक समाधानाला प्राधान्य देण्याची. फक्त संपत्ती आणि भौतिक वस्तू मिळवण्यासाठी नव्हे, तर मन:शांतीसाठी प्रयत्न करणे हेच खरे यश आहे.
लेखनसेवा: नंदन पंढरीनाथ दाते.
0 टिप्पण्या