संपादकीय पान...............
बंदूक राष्ट्रीय कपूताच्या खांद्यावर, पण चालवणारा कोण ?
वृत्त एकसत्ता न्यूज
अदानी यांच्यावर अमेरिकेच्या न्याय विभागाने गुन्हा दाखल केला आहे ही वार्ता काल सर्वत्र पसरली. अपेक्षेप्रमाणे या बातमीवर टीका करायला सर्वात प्रथम भारताचे राष्ट्रीय कपूत अवतरले आणि नेहमीप्रमाणे बेछूट आरोपांच्या फैरी झाडल्या. मग स्क्रिप्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे अदानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मग त्यांना अटक का केली नाही ? असा टाळ्या पिटू प्रश्न विचारून मोकळे झाले. अमेरिकन न्याय विभागाने गुन्हा दाखल केला आहे भारतात गुन्हा नोंदवलेला नाही आणि हा आर्थिक स्वरूपाचा गुन्हा आहे ज्यात गुन्हा सिद्ध झाला तरी पहिल्यांदा आर्थिक दंड लावला जातो आणि अगदी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन आढळले तर आणि तरच तुरुंगात टाकले जाते. परंतु इतका विवेक राष्ट्रीय कपुताकडे असणे अशक्य आहे. बोलण्याचा ओघात ते स्क्रिप्ट बाहेरील एक वाक्य बोलून गेली,” आम्ही नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता संपुष्टात आणली आहे.” एका भारतीय उद्योजकाच्या गैरवर्तनामुळे देशाच्या पंतप्रधानांची विश्वासार्हता कशी संपुष्टात येते ? हा कळीचा प्रश्न आहे.
पत्रकारांनी तीन प्रश्न विचारले.
अदानी यांच्यावर फक्त आरोप झाले आहेत. जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर तुम्ही त्यांना गुन्हेगार घोषित कसे करू शकता ?
या गुन्ह्याच्या संदर्भातील जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यातील भ्रष्ट राज्यांमध्ये एक कॉंग्रेस शासित राज्य होते आणि बाकीची तीन राज्ये ईंडी आघाडी पक्ष शासित होती. मग हा ईंडी आघाडीचा भ्रष्टाचार नाही का ?
असे सगळे मुद्दे दर वेळी लोकसभा अधिवेशनाच्या एक दोन दिवस आधीच का बाहेर येतात ?
यावर राष्ट्रीय कपूत उत्तरले,” तुम्ही भाजपच्या बाजूने आहात का ?”
हिंडेनबर्ग प्रकरण तुमच्यापैकी किती जणांच्या स्मरणात आहे ?
त्यावेळेस सुद्धा हिंडेनबर्ग या अमेरिकन संशोधन संस्थेच्या अहवालावर विश्वास ठेवून शेअर बाजारात अदानी यांच्या कंपनीचे शेअर पाडण्याचे कारस्थान रचले गेले. त्यावेळी संपूर्ण भारतीय उद्योगजगत अदानी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पण त्यावेळी सुद्धा राष्ट्रीय कपूत अत्यंत उन्मादी पद्धतीने भाष्य करत होता, त्याच्या बोलण्यातून आणि वर्तनातून तो या कारस्थानातील एक घटक असल्याचे उघड होते आणि त्याला याची काहीही पर्वा नव्हती हे पण दिसून येत होते.
राष्ट्रीय कपूत हा उल्लेख एका माणसाचा करण्याचे कारण एकच आहे की ती व्यक्ती देशाबाहेर जाऊन आपल्याच देशाची बदनामी करते. इतका मूर्ख विरोधी पक्ष नेता तुम्हाला पाकिस्तानात सुद्धा सापडणार नाही. ही व्यक्ती देशाची बदनामी करण्याची एक संधी सोडत नाही. ही व्यक्ती देशातील राज्ये एकमेकांची शत्रू व्हावीत यासाठी उचापती करणे कधीही थांबवत नाही. देशातील विघटनवादी शक्तींना सामर्थ्य देण्याचे हा प्राणी कधी थांबवत नाही. याचा पक्ष चीनच्या सरकारशी करार करून आम्ही चीनच्या हितांचे भारतात रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही देतो. सोरोस सारख्या अराजकतावादी मंडळींच्या हातातील खेळणे म्हणून वावरताना त्याला काहीही वाटत नाही कारण तो राष्ट्रीय कपूत आहे. एका मोठ्या घराण्यातील व्यक्ती असल्याने त्याला कोणी प्रश्न विचारत नाही. त्याचे चमचे कुणाला त्याच्यासमोर काही बोलू देत नाहीत आणि त्या बळावर तो आपल्या देशाची , देशातील संस्थांची , देशातील मोठ्या उद्योग समूहांची आणि देशाच्या संविधानाची मनसोक्त बदनामी करतो. इलेक्ट्रॉनिक मिडिया त्यांच्या खानदानाचा गुलाम असल्याने ते त्याला कधीही अडचणीत आणणारा प्रश्न विचारत नाहीत आणि हा एकतर्फी मूर्खपणाचा तमाशा सुरूच रहातो.
उद्यापासून लोकसभेचे अधिवेशन सुरु होते आहे. अधिवेशनात वक्फ बोर्डाच्या संदर्भात स्थापन झालेल्या संसदीय समितीचा अहवाल सादर होणार असून त्यानुसार वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन होणार आहे. सकारात्मक बदल होणार आहेत. इथे केवळ वक्फ बोर्ड कायद्याला वाचवणे हा हेतू नाही तर वक्फ बोर्ड स्थापना , त्यासाठी केलेले कायदे, त्यांचे मूळ स्वरूप त्यात कॉंग्रेस सरकारांनी वेळोवेळी केलेले संविधानाच्या मूळ तत्वांच्या विरोधी असणारे बदल, या कायद्यांच्या मुळे भारतातील हिंदूंना मिळालेले दुय्यम नागरिकत्व हे सगळेच मुद्दे चर्चेत येतील आणि अश्या विस्तृत चर्चेतून कॉंग्रेस पक्ष हा हिंदू द्वेष्टा आणि हिंदूंचा शत्रू आहे हे सिद्ध होईल. असे झाले तर भविष्यात कॉंग्रेस पक्षाला केवळ मुसलमानांचीच मते मिळतील अशी परिस्थिती निर्माण होईल. यांना खीळ घालायची असेल तर संसदेत गदारोळ होणे आवश्यक आहे जेणेकरून संसदीय समितीचा अहवाल पटलावर सादर केला जाणार नाही. हा गदारोळ निर्माण करण्याचे शस्त्र म्हणजे अदानी यांच्यावर आरोप करणे.
भारतीय उद्योग जगताची बदनामी करणे. जनसामान्य मंडळींचा त्यांच्यावरील विश्वास संपवणे हे षडयंत्र कॉंग्रेस गेली काही वर्षे निर्लज्जपणे करत आली आहे. त्याच कॉंग्रेसचा स्वतःचा इतिहास अत्यंत काळाकुट्ट आहे आणि आता तो सांगण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यमिळण्यापूर्वी ब्रिटीश आपल्या देशाला लुबाडत होते आणि त्याला कॉंग्रेसची मूक संमती होती. अगदी १९४५-४६ मध्ये ब्रिटिशांनी भारतातून अन्नधान्य प्रचंड प्रमाणात नेल्यामुळे बंगालमध्ये हजारो लोक भूकबळी गेले पण त्याबद्दल कॉंग्रेसचा एक नेता आणि गरिबांचे कैवारी म्हणून मिरवणारे महात्मा गांधी तोंड उघडून कधी बोलले नाही.
स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा पाश्चात्य आणि अमेरिकी कंपन्यांना मुक्तद्वार देत भारतीय उद्योगाला मात्र लायसन्स राज मध्ये चिरडणे हेच कॉंग्रेसचे धोरण राहिले आहे. एकीकडे समाजवाद आणि साम्यवाद या गप्पा मारायच्या दुसरीकडे परदेशी कंपन्यांना देशाला लुटू द्यायचे आणि तिसरीकडे भारतीय उद्योगांना टिकाव धरणे अशक्य करायचे अश्या पद्धतीचे उफराटे कायदे करून कॉंग्रेसने देशातील उद्योजकता मारून टाकण्याचा प्रयास केला. श्रीमंत म्हणजे चोर अश्या पद्धतीची विकृत मानसिकता कॉंग्रेसने जन्माला घातली आहे. ज्यावेळी युनियन कार्बाईड कंपनीच्या गलथानपणामुळे १०००० पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री स्वतःच्या विमानात त्या कंपनीचे अध्यक्ष अँडरसन यांना घेऊन दिल्लीला गेले. तिथे त्यांची भेट पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी घालून दिली आणि नंतर अँडरसन भारतातून निघून गेले. ते परत कधीही आले नाही. १०००० लोकांच्या हत्येला जबाबदार असणारा माणूस कॉंग्रेसने पळून जाऊ दिला आणि आज अदानी यांच्यावर फक्त आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत तर त्यांना अटक करण्याची भाषा कॉंग्रेस पक्ष करतो आहे यातून कॉंग्रेस पक्षाची प्रेताच्या टाळूचे लोणी खाणारी हिडीस प्रवृत्ती दिसून येते आहे. बोफोर्स प्रकरणातील क्वात्रोची याला सुद्धा कॉंग्रेसपक्षानेच पळून जाऊ दिले आहे.
थोडक्यात परदेशी कंपन्यांनी येऊन भारतात धंदा करावा. त्यांनी वाट्टेल त्या दराने वाट्टेल ती उत्पादने विकावी, त्यांना देशांतर्गत स्पर्धा निर्माण होऊ नये अशी धोरणे सुद्धा कॉंग्रेस आखणार. जोडीला या कंपन्या भारतातील कायदे पायदळी तुडवताना दिसल्या तरी कॉंग्रेस त्यांच्यावर कृपाछत्र कायम ठेवणार. परंतु एखादा भारतीय उद्योजक मोठा होत असेल तर त्याच्या पायात पाय घालण्याची , त्याला सार्वजनिक पातळीवर अपमानित करण्याची आणि त्याला चोर दरोडेखोर ठरवण्याची एकही संधी कॉंग्रेस घालवणार नाही हा कॉंग्रेसचा खरा चेहरा आहे.
कॉंग्रेस पक्षाची स्थापनाच ब्रिटीश आणि सामान्य भारतीय नागरिक यांच्यातील दुवा म्हणून झाली होती. आजही कॉंग्रेस परदेशी कंपन्यांची आणि षडयंत्रकारी मंडळींची दलाल म्हणूनच काम करते आहे आणि हे कटू सत्य आहे.*
*अदानी यांच्यावर कॉंग्रेसचा राग का ?
अदानी हे केवळ उद्योजक नाहीत. मोदी सरकारने भविष्याचा वेध घेणाऱ्या ज्या योजना आखल्या आहेत त्या योजनांना मूर्त स्वरूप देणारे प्रकल्प अदानी उभे करत आहेत आणि कॉंग्रेस पक्षाची ही सर्वात मोठी पोटदुखी आहे.
जागतिक व्यापारात बंदरांचे महत्व अनन्यसाधारण आहे. बंदरांच्या माध्यमातूनच सर्व मालाची वहातुक होते मग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी मोक्याची बंदरे आहेत ती ताब्यात घेऊन तिथले व्यवस्थापन अदानी उद्योग समूह करतो आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला आपला ठसा वेगळ्याच पद्धतीने उमटवणे शक्य होते आहे आणि हे कॉंग्रेस पक्षाला पचत नाही.
अदानी यांनी त्यांच्या बंदर हाताळणी व्यवसायाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय परराष्ट्रखात्याच्या अनेक योजनांना मूर्त स्वरूप देण्यात सहाय्य केले आहे. अदानी ग्रुप सध्या भारतातील त्रिवेंद्रम, मुंद्रा , कृष्णपट्टम , कराईकल, हाजिरा, धामरा, दहेज, गंगावरम , विशाखापट्टणम, मर्मागोवा, कट्टूपल्ली, कामराजर, तुना, आगरदंडा , दिघी , गोपालपूर अशी जवळ जवळ प्रत्येक सागर किनारा असलेल्या राज्यातील बंदरांचे व्यवस्थापन बघत आहेत. जोडीला ते कांदळवन विकास मोहीम राबवत आहेत. या सगळ्या बंदरांच्या कामकाजात १०० टक्के अपारंपरिक उर्जा वापरण्याची मोहीम राबवत आहेत. अर्थात स्वतःच्या कार्यक्षेत्रात सुद्धा ते अधिकाधिक प्रमाणात सौर उर्जेचा वापर करत आहेत, जोडीला देशभर आणि जागतिक पातळीवर सुद्धा मोठे मोठे सौर उर्जा पार्क उभारत आहेत. राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार आहे पण तिथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अदानी उद्योग समूहच निर्माण करतो आहे.
देशाबाहेरील आणि भारतासाठी व्यूहात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी काही बंदरे अदानी उद्योग समूहाने हाताळण्यास प्रारंभ केला आहे. हायफा पोर्ट इस्त्रायल , कोलंबो पोर्ट श्रीलंका , दार एस सलाम टांझानिया , दा नांग व्हियेतनाम. यातील काही कामे त्यांनी चीनी कंपन्यांना पराभूत करत मिळवली आहेत आणि काही कामे त्यांनी अमेरिकन स्पर्धकांना मागे टाकून मिळवली आहेत.
*"कॉंग्रेस पक्षाचे देशाबाहेरील शक्तींशी असणारे स्नेहपूर्ण संबंध हे सुद्धा कॉंग्रेस पक्षाने अदानी यांचा द्वेष करण्याचे कारण आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मनमोहन सिंग यांचे सरकार असताना चीन देशाचे सरकार आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यात एक द्विपक्षीय करार झाला. त्या करारावर सही करणारी मंडळी म्हणजे चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष , कॉंग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी , राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग हे होते. एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या देशाच्या सरकारशी असा करार करण्याचे हे जगातील पहिले उदाहरण असेल. या करारानुसार कॉंग्रेस पक्ष भारतात चीन या देशाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. चीन हे आपले शत्रू राष्ट्र आहे त्यांच्या हिताशी कॉंग्रेस पक्षाचा काय संबंध ??? परंतु असे प्रश्न मिडिया कधी राष्ट्रीय कपूत ला विचारात नाही आणि तो सुद्धा अश्या मुद्द्यांवर सोयीस्कर मौन धारण करतो. अदानी प्रकरणात सुद्धा गदारोळ करणारी कॉंग्रेस ही परदेशी शक्तींच्या हातातील बाहुले बनून विरोध करते आहे हे उघड सत्य आहे. अदानी यांच्यावरील आरोपांच्या मागील कारणे समजून घ्या.*
भारताचे वाढते आंतरराष्ट्रीय महत्व सहन न झाल्याने अमेरिका भारताच्या मार्गात काटे पेरण्याचा प्रयास करते आहे आणि त्यापैकी अदानी प्रकरण हा एक अंश आहे. रशिया युक्रेन युद्धात भारताची भूमिका स्वतंत्र आहे आणि हे अमेरिकेला आवडले नाही म्हणूनच त्यांनी खलिस्तानवादाचे झोपलेले भूत जागे करून त्यांना डोक्यावर घेण्याचे उद्योग सुरु केले आहेत. अमेरिकेला चीनशी भविष्यात लढता यावे म्हणून भारत , बांगलादेश आणि म्यानमार चा एक एक तुकडा पाडून त्यातून एक ख्रिस्ती राष्ट्र निर्माण करायचे आहे आणि त्या राष्ट्रात आपला सैन्यतळ उभा करायचा आहे. या मोहिमेसाठीच मणिपूर पेटवले गेले होते. या मोहिमेला विरोध केला म्हणूनच शेख हसीना यांना पळवून लावून मोहम्मद युनुस यांचे कठपुतली सरकार आणले गेले आहे. परंतु हे सरकार अपयशी होते आहे आणि त्या सरकारने वीज बिल न भरल्याने अदानी यांनी त्यांचा वीजपुरवठा थांबवला आहे त्यामुळे बांगलादेशात सरकारबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आपल्या प्याद्याचे अस्तित्व धोक्यात आणल्याने अमेरिका संतप्त आहे.
अर्थात अमेरिकेचा हा सर्व संताप आणि उचापती या जो बायडन सरकारच्या धोरणांचा एक भाग आहे. अमेरिकेत आता सत्तांतर होऊन डोनाल्ड ट्रम्प सत्ताधीश होणार आहेत. अदानी समूह आणि नरेंद्र मोदी यांचे ट्रम्प यांच्याशी अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत. त्यामुळे जाता जाता अदानी आणि त्या माध्यमातून भारताला जितका त्रास देता येईल तितका द्यावा या पद्धतीचे जो बायडन यांचे धोरण आहे. राष्ट्रीय कपूत या खेळातील एक छोटे प्यादे आहे आणि ते त्याला दिलेली शिवीगाळ करण्याची भूमिका चपखल बजावत आहे हे सत्य आहे.
अराजकतावादी सोरोस , अमेरिकेचा मावळणारा अध्यक्ष जो बायडन आणि चीन या तिघांच्या तालावर नाचणारी कॉंग्रेस देशहिताचा तिळमात्र विचार करत नाही हेच या घटनाक्रमातून सिद्ध होते आहे. बर या सगळ्या गोष्टी कितीही सांगितल्या बोलल्या गेल्या किंवा उघड दिसल्या तरी याचे कधीही ठोस असे पुरावे मिळणे शक्य नसते त्यामुळे अश्या पद्धतीच्या वर्तनाला कायदेशीर शिक्षा करणे अशक्य आहे.
परंतु अश्या वर्तनातून जो संभ्रम निर्माण केला जातो आहे त्याचे वेळीच निराकरण करणे अत्यंत आवश्यक असते. या विषयाची सर्वांगीण माहिती जनसामान्यांना देणे अत्यंत आवश्यक असते. या लेखाच्या माध्यमातून हाच प्रयास केला आहे.
0 टिप्पण्या