💢सप्टेंबर महिन्याचा लेखाजोखा !!!
🟩"धन्याचा तो माल, आपण फक्त भारवाही हमाल"
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 07/10/2024 : मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणेच आमच्या याचक लोकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी शे दीडशे किलोच्या बॅगा मोटरसायकलवर घेतल्या आणि घराबाहेर पडलो.
घराबाहेर पडताना सौ म्हणाली, 'कचरा टाकायच्या प्लास्टिकच्या बॅगा संपल्या आहेत, त्या येताना घेऊन ये.'
भिक्षेकर्यांची कामं संपल्यानंतर, मी बोहरी आळी मध्ये सौ ची आज्ञा पाळून कचरा टाकण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या आणण्यासाठी गेलो.
त्या दुकानात एक गोलमटोल शेठजी बहुतेक नुकतेच जेवण करून, दात टोकरत, खुर्चीवर रेलून आराम करत बसले होते.
मी गेलो आणि त्यांना म्हणालो, 'प्लास्टिकच्या पिशव्या द्या...'
ते जांभई देत कंटाळवाणे पणाने म्हणाले, 'कशासाठी हव्यांत रे ?'
'कचरा टाकण्यासाठी'
शेठजींनी न उठता थोडासा हात लांबवत, बाजूच्या रॅक वरून, पिशवीचा एक गठ्ठा काढला आणि उठण्याचे कष्ट न घेत, काउंटरवर माझ्या दिशेने, कुत्र्याला तुकडा फेकावा तसा एक गठ्ठा फेकला.
पिशव्या अगदीच तकलादू होत्या...
मी त्यांना म्हणालो 'अहो साहेब, या अगदीच साध्या पिशव्या आहेत... जरा चांगल्या क्वालिटीच्या द्या की... !'
आळसावून, ढेरीवरून हात फिरवत, या दातातली काडी त्या दाताकडे फिरवत, पुन्हा एक जांभई देत ते म्हणाले, कचराच टाकायचा आहे ना रे ? त्याला कशाला चांगल्या क्वालिटीच्या पिशव्या लागतात ? कचऱ्याच्या पिशव्यांना कशाला जास्त पैसे घालवतोस बाबा ?
मध्यमवर्गीय माणसाला, पैशाचं गणित मांडून काहीही सांगितलं तरी ते त्याला पटतं...!
अर्थातच मलाही ते पटलं.
'तू दिवसाला किती कमवत असशील ? त्यात भारी प्लास्टिकच्या पिशव्या घ्यायची वार्ता कशाला करतो रे... तुला परवडणार आहेत का त्या ???' माझ्या गाडीकडे आणि माझ्या एकूण अवतारा कडे वाकून बघत, ते परत जांभई देत बोलले.
यात माझ्याबद्दल काळजी होती की उपहास ? हे त्यांच्या जांभई देणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून कळलं नाही.
मी स्वतःच्या अवताराकडे आणि गाडीकडे हसून पाहिले... !
भिक्षेकर्यांशी नातं जुळवण्याच्या नादात, त्यांच्यासह गटाराबाजूला लोळून माझ्याही कपड्यांचा अवतार झालेला असतो...
चिखलात लोळून आलेली म्हैस माझ्यापेक्षा बरी दिसते... !
सूट बूट घातलेलाच डॉक्टर असतो...
हेच सर्वांच्या डोक्यात फिट बसलेलं आहे...
मग माझ्यासारख्या भिक्षेकऱ्यात बसून "मळखाऊ झालेल्या बैलाला" कोण डॉक्टर म्हणेल ?
म्हणायला अंगावर डॉक्टरचा पांढरा ॲप्रन असतो... घरून निघताना तो पांढराच असतो...
पण भिक्षेकऱ्यात दिवसभर बसून काम करताना, भिक्षेकऱ्यांचाच रंग मला लाभतो... अवघा रंग मग एकची होतो... !
मग, एक तर ते तरी माझ्यासारखे दिसतात किंवा मी तरी त्यांच्यासारखा दिसायला लागतो...
आम्हा दोघांमध्ये सांगण्यासारखा काही फरकच उरत नाही....
अद्वैतचा नेमका अर्थ हाच असावा का ?
भीक मागणाऱ्या लोकांसाठी अख्खा दवाखाना मोटरसायकलवर न्यायचा, म्हणून माझ्या मोटरसायकलला चार ते पाच ताडपत्रीच्या मजबूत बॅगा अडकवलेल्या असतात. या बॅगा आता खूप जुन्या झाल्या आहेत. रस्त्यावर सतत धुळीत फिरल्यामुळे त्या खूप कळकट झाल्या आहेत; माझ्याचसारख्या...
या बॅगेत आणि माझ्या अंगावर शे दीडशे किलोचे सामान असते.
माझ्या जुन्या मोटरसायकलवर लादलेले हे सामान पाहून; मला बरेच लोक खाद्यपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांचा डिलिव्हरी बॉय समजतात...
अनेक वेळा कुरियर बॉय समजतात... !
वृद्धांना लागणाऱ्या आणि अपंग व्यक्तींसाठी असणाऱ्या कुबड्या, काठ्या याही माझ्या गाडीला अडकवलेल्या असतात...
रस्त्यावर या वस्तूंची विक्री करणारा विक्रेता समजून, 'हे केवढ्याला दिले रे' म्हणूनही अनेक जण विचारतात.
गाडीवर कुबडी बघून अनेक लोक मला अपंग समजतात... दया भावनेने बघतात...
शहरात काही वाईट घटना घडली, तर मोटरसायकलवर भलं मोठं सामान घेऊन फिरणाऱ्या माझ्याकडे, पोलीस संशयाने बघतात. वाटेत अडवून झडती घेतात, आडवे तिडवे प्रश्न विचारतात. संशयाची खात्री होईपर्यंत त्यांच्या नजरेत मी अतिरेकी असतो.
बऱ्याच वेळानंतर, मी अतिरेकी नाही हे त्यांना पटतं... पण डॉक्टर आहे; यावर ते विश्वास ठेवत नाहीत.
गाढवावर भरभक्कम सामान लादावं आणि त्यानं ते वहावं...
माझ्यासारख्या अशा गाढवाला कोण डॉक्टर समजेल ?
फिल्डवर मी जेव्हा कमरेचे किंवा हातापायाचे पट्टे, वॉकिंग स्टिक, कुबड्या, भिक्षेकर्यांना देत असतो, तेव्हा "चांगल्या घरातले" (??) लोक, कार मधून उतरून मला म्हणतात, 'या वस्तू आम्हाला केवढ्याला देतो बोल... ?'
'अहो, मी डॉक्टर आहे, या वस्तू विकायला नाही आणल्या.'
'गप रे... पांढरा कोट घातला म्हणजे कोण डॉक्टर होतं का रे... ? तू डॉक्टरचा "आशीस्टंट" पण वाटत नाय, काय नाटक करतो, तू डॉक्टर असण्याचं राव ?'
मला हसावं का रडावं तेच कळत नाही...!
माझं बालपण खेड्यातलं, दुष्काळी भागातलं.
माझी आजी आणि आई पाच पाच किलोमीटर पायपीट करत डोक्यावर हंडे ठेवून नदीवरून / विहिरीवरून पाणी भरायची...
आजी बऱ्यापैकी सधन होती, पण पैसे असले म्हणून नदीला आपल्या दारात आणता येत नाही किंवा विहिरीला दावणीला बांधून गोठ्यात सुद्धा ठेवता येत नाही...!
तहान लागली की नदीकडे किंवा विहिरीकडे आपल्यालाच जावं लागतं...!
लहान असताना मी मग आई आणि आजी सोबत पाण्याला जाऊन, माझ्या ताकदीप्रमाणे पाच सात लिटर पाणी बसेल अशी कळशी; पाण्याने भरून खांद्यावरून घेऊन यायचो... तेवढीच आई आणि आजीला मदत !!!
पुढे आयुष्यातल्या जगण्या आणि जगवण्याच्या लढाईने ... मला कमरेच्या मणक्यामध्ये चार गॅप आणि मानेच्या मणक्यामध्ये तीन गॅप बक्षीस म्हणून दिले. खूप वेळा हि दुखणी जागी होतात... आणि लहान बाळाला थोपटून झोपवावे, त्याप्रमाणे या दुखण्यांना मी झोपवून ठेवतो.
डॉक्टर सांगतात, जास्त वजन उचलायचं नाही. पण या सर्व पिशव्या गाडीवर ठेवायला आणि गाडीवरून उतरून पुन्हा भिक्षेकरी बसले आहेत तिथपर्यंत न्यायला, वजन उचलावेच लागते.
इतक्या वजनाच्या बॅगा हातात घेऊन चालले की कमरेतून आणि मानेतून कळ उठते...
मग मी हे सर्व सामान माझ्या खांद्यावर घेऊन चालायला लागतो... पूर्वी पाण्याने भरलेली कळशी खांद्यावर ठेवून आणायचो तसाच... !
पूर्वी मी हे असं पाणी भरायचो, ते माझ्या आजीला आणि आईला केवळ मदत व्हावी म्हणून...
आज हे असं खांद्यावरून सामान वहावं लागतंय, तेही माझ्या रस्त्यावरच्या आजीला आणि आईला मदत व्हावी म्हणूनच...
आज आई आणि आजीचे चेहरे फक्त बदललेले आहेत....
तर, मला हे असं खांद्यावरून सामान नेताना अनेक लोकांना मी हमाल सुद्धा वाटतो... !!!
या सर्व गोष्टींचा मला पुर्वी खूप राग यायचा... चिडचिड व्हायची.... त्रास व्हायचा... !
एकदा माईकडे (आदरणीय सौ सिंधुताई सपकाळ) हि चिडचिड व्यक्त केली.
माई म्हणाल्या, "धन्याचा तो माल, आपण फक्त भारवाही हमाल" या एका वाक्यात समजून जा राजा... !
सर्वांग तापानं फणफणावं .... मग कुणीतरी येऊन काढा द्यावा आणि हळूहळू ताप ओसरून जीवाला शांतता मिळावी...तसं काहीसं या वाक्यानं माझं झालं.
मी विचार करायला लागलो...
समाजाला तळागाळातल्या लोकांना मदत करायची आहे... समाज माझ्यावर विश्वास ठेवून, हि मदत तळागाळात पोचवण्यासाठी माझ्याकडे विश्वासाने सुपूर्त करत आहे...
मी ते तळागाळापर्यंत पोहोचवत आहे... मग कोणी *"डिलिव्हरी बॉय"* म्हणाले तर वाईट कशाला वाटायला हवं...?
उलट करोडो लोकातून *डिलिव्हरी बॉय* म्हणून समाजाने विश्वासाने फक्त माझी निवड केली आहे... मी किती भाग्यवान... !
समाजाने दिलेलं प्रेम आणि माया मी मदतीच्या स्वरूपात, खालपर्यंत पोचवत आहे... मी *कुरिअर बॉय* असण्याचा मला अभिमान आहे...!
खुशाल कुणालाही म्हणुदे मला *हमाल*, पण मी तर भिक्षेकरी समाजाची पालखी वाहणारा मानाचा भोई आहे... !
हा मान केव्हढा मोठा ?
हा नशीबवान "मानकरी" मीच आहे...!!!
*"आशीस्टंट"* म्हणतात... म्हणूदे... रस्त्यावरच्या आई बापाचा हात धरून त्यांना चालायला मदत करणाऱ्या मदतनीसालाच कुणी "आशीस्टंट" म्हणत असतील, तर असा *आशीस्टंट* होण्यासाठी मी मरूनही पुन्हा जन्मेन !
माझ्या अवतारावरून नसेल समजत मला कुणी डॉक्टर... नको समजू दे... पण एखाद्याची "वेदना" समजणारा मी *"वैद्य"* तर झालो आहे... !
एकाच जन्मात इतक्या भूमिका करायला मिळाल्या ऋणी आहे मी निसर्गाचा... आणि समाजाचा !
या महिन्यात गणेशोत्सव होता.
रस्त्यावरच्या वृद्ध याचकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा दिली, स्तेथोस्कोप ने आरती करून, गोळ्या औषधांचा नैवेद्य वाहिला...
निराधार अवस्थेत पडलेल्या लोकांना मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करून उपचार करवून घेतले... ज्यांना दिसत नाही अशांचे डोळ्यांचे ऑपरेशन करवून घेतले... चष्मे दिले... !
प्रसाद म्हणून त्यांचे आशीर्वाद घेतले...!
भीक मागणाऱ्या निराधार महिलांना व्यवसाय टाकून द्यायला मदत केली.
जोगवा मागणाऱ्या एका आईची मुलगी... आई सोबत यायची. तिला काहीतरी काम करण्यासाठी विनवण्या केल्या, ती तयार सुद्धा झाली, पण आता काम काय द्यायचं ?
पोलीस, युनिफॉर्म, सिक्युरिटी अशा गोष्टीत तिला रुची होती. पण जॉब मिळत नव्हता.
दिपाताई परब, सख्ख्या बहिणी प्रमाणेच प्रेम करणारी माझी एक ताई. "रणरागिणी" या नावाने लेडी बाउन्सर्सचा ग्रुप तयार करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
दिपाताई कडे मी एक शब्द टाकला आणि दिपाताईने पुढचा मागचा काहीही विचार न करता तिला एका दिवसात कामावर रुजू करून घेतले. मी ऋणी आहे दिपाताई चा !!!
परवा परवा पर्यंत याचना करणारी हि मुलगी, युनिफॉर्म मध्ये जेव्हा माझ्यासमोर उभी राहिली तेव्हा, माझ्या डोळ्यातून खरोखर त्यावेळी अश्रू ओघळले... !
या महिन्यात अशा कितीतरी भिक्षेकर्यांचे; भिक्षेकरी म्हणून विसर्जन केले आणि कष्टकरी... गावकरी म्हणून नामकरण केले !
भीक मागणाऱ्या पालकांच्या कित्येक मुलांचे युनिफॉर्म फाटले होते, त्यांना या महिन्यात नवीन युनिफॉर्म घेऊन दिले... शाळेत जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. बुद्धीच्या देवतेची आम्ही अशी पूजा मांडली...!!!
गेल्या तीन वर्षांपासून रोजचे अन्नदान सुरू आहे. याही महिन्यात भरभरून केले.... पितृपंधरवडा असतानाही आणि नसतानाही...!
असो...
केलेल्या कामासह, तुमच्यासमोर आज मनातल्या भावना मांडल्या...
आतापर्यंत हमाल झालो... कुरियर बॉय झालो... डिलिव्हरी बॉय झालो... आशीस्टंट झालो...
जन्मतानाही मी माकड म्हणूनच जन्माला आलो...
हळूहळू माणूस म्हणूनही याच जन्मात, जन्म व्हावा हिच प्रार्थना... !!!
1 ऑक्टोबर 2024
डॉ अभिजीत सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे
9822267357

0 टिप्पण्या