शेतीला कनिष्ठ दर्जा आल्या बरोबर सगळी अर्थव्यवस्थाच डळमळीत झालीय.

 शेतीला कनिष्ठ दर्जा आल्या बरोबर सगळी अर्थव्यवस्थाच डळमळीत झालीय. 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 20/10/ 2024 : भारत हा कृषीप्रधान देश आहे.शेती आणि शेतीशी निगडित असलेले उद्योगधंदे हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जातात. फार पूर्वी ऊत्तम शेती,मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे गणित होते.आता सध्या हे चक्र उलट दिशेने मार्गक्रमण करीत आहे. काळाचा महिमा अगाध असतो.त्यामुळे शेती हा व्यवसाय आपोआपच खालावला आहे.त्यात शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया असल्याने शेतीला कनिष्ठ दर्जा आल्या बरोबर सगळी अर्थव्यवस्थाच डळमळीत झालीय. 

सध्या सुरू असणारा हवामानातील बदल हा शेतीसाठी खुप हानीकारक आहे. सहज मनात प्रश्न उभा राहिला जर हवामानातील अचानक होणारे बदल, शेतीविषयक अनास्था ह्यामुळे शेतकऱ्याने जर शेती करणे सोडले तर....... मनात एकदम भीती ऊभी राहीली, खाणार काय आणि प्रचंड महागाई ला तोंड तरी कसे देणार ?   

शेती जर गावी राहून स्वतः कसायची म्हंटलं तर खरतरं सगळ्या दृष्टीने माणूस फायद्यात राहील. आपल्याकडे शेतीचे नुकसान हे ज्या कारणांमुळे होते त्यातील प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांचा रहिवासासाठी असलेला शहराकडे ओढा किंवा कल.जर शेती करणाऱ्या प्रत्येकाचा ठाव हा त्या गावातच असेल तर शेती फायद्यात येण्याचे हे एक प्रमुख कारण ठरेल.त्यात त्याचे घर हे प्रत्यक्ष शेतीच्या शिवारातच असेल तर मग "सोनेपे सुहागाच".

 सध्याच्या काळातील असंतुलित निसर्गाच्या प्रकोपामुळे पण शेतकऱ्यांवर हलाखीची परिस्थिती आलीय.शेती व्यवसाय अडचणीत येण्याचे अजून एक प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे मुबलक असणाऱ्या मनुष्यबळाची शेतीविषयक अनास्था. शहरात राहून आर्थिक ओढाताण सहन करायची तरुणांची मानसिकता बनलीय पण खेड्यावर राहणे नको म्हणतात. मान्य आहे शहरात मिळणारी ऐहीक सुखे ही खेड्यावर मिळणाऱ्या तुलनेत कमी असतात पण त्या ऐहिक सुखापेक्षा कितीतरी पट फायद्याचे असणारे हवामान, मोकळी हवा,ऐसपैस जागा आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर ठरते हे नवीन पिढीला कदाचित फारसे पटत नसावे.           

 अजून एक अपयशाचे कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची कमतरता हे ठरु शकतं.आपल्याकडे पारंपरिक शेतीचा वारसा आल्याने जशी आपले वाडवडील शेती करायचे त्यांचेच अनुकरण आपण करतोयं. पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फायदेशीर वाण, बी बीयाणं,खतं,औषधं ह्यांच्या साथीने आपण शेती हा व्यवसाय आपण अजून जास्त भरभराटीला आणू शकत़ो.

अर्थातच आपल्या देशातील कुठलेही सरकार आपापल्या परीने ह्या व्यवसायात उर्जितावस्था आणण्यासाठी झटतं,नवनवीन शोध,तंत्रज्ञान ह्यांच्या मदतीने विज्ञानाची कास पकडीतं प्रगती,विकास साधण्याचा प्रयत्न करतं डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील  शेतकीचे विद्यापीठ आहे. कृृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरण हा ह्या विद्यापीठाच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे ख्यातनाम कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य परिसर अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्पस आहे.          

आजचा दिवस हा ह्या विद्यापीठाच्या स्थापनेचा दिवस.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे २० ऑक्टोबर १९६९ ला अकोला येथे स्थापन करण्यात आले. विद्यापिठास भूतपूर्व कृषीमंत्री  डॉ. पंजाबराव देशमुख ह्यांचे  नाव देण्यात आले आहे. विद्यापिठ कायदा १९८३ अंतर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये कृषी शिक्षण, शोध आणि बीज इ. कार्यक्रमांचे कार्य विद्यापिठावर सोपवण्यात आले आहे.कृषी विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट कृषीशिक्षण, कृषीसंशोधन आणि कृषीविस्तार कार्य आहे. कृषी साक्षरतेसाठी विद्यापीठा मार्फत कृषी पदविका, कृषी पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे शिक्षण दिले जाते.

शेतीशी निगडित संशोधन करण्यासाठी विद्यापीठाची संशोधन केंद्रे आहेत. विद्यापीठाने अन्नधान्य, फळे-फुले, चारा-पिके यांची अनेक वाणे विकसित केलेली असून मृद् व जलसंधारण, पीक लागवड पद्धती यांविषयी सखोल संशोधन केले.आहे.

विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे वाण संपूर्ण देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत.  जैविक-अजैविक ताण, पाणीटंचाई या दरवर्षी निर्माण होणाऱ्या समस्यांवर संशोधन करून विद्यापीठ त्यांचे निष्कर्ष वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करते. विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी विद्यापीठ आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी, कृषी अधिकारी आदींसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके यांचे आयोजन करते. याव्यतिरिक्त आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे, मासिके आदींमधून हंगामनिहाय, क्षेत्रनिहाय, शेतीविषयक तंत्रज्ञान व विविध कार्यक्रम प्रसारित करते.

असे हे कृषी विद्यापीठ आपल्यासाठी गौरवाचीच बाब आहे हे नक्की.

         सौ.कल्याणी बापट (केळकर)

                         9604947256

                       बडनेरा, अमरावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या