💢मरणोत्तर कौतुक काय कामाचे?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 12/10/ 2024 : भारत हा रत्नांची खाण आहे, पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिकदृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की, एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या जर्जर अवस्थेत असताना होतो. हे योग्य नाही. याविषयी काही निश्चित धोरण आपण आखाल, याची मला खात्री आहे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे. राजकारण विषय बाजूला ठेवला तर राज यांनी केलेली ही मागणी अगदी योग्यच म्हणावी लागेल. कोणत्याही व्यक्तीचे महत्त्व ती हयात असताना आपल्याला कधीच कळत नाही. ती व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावर आपण तिचे कौतुक करतो, गोडवे गातो. भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी ते हयात असतानाच केली जात होती. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची विनंती केंद्राला करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. भारतीय अर्थव्यवस्थेत टाटा यांनी दिलेले योगदान आणि त्याहून महत्त्वाचे माणूस म्हणून जे त्यांचे मोठेपण आहे, ते अफाट होते. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवे होते. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवा, अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा व अपेक्षा आहे. तमाम भारतीयांचीदेखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल, असे मला वाटत नाही, असे राज यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्यास कोणी त्यावर आक्षेप घेईल, अशी तसूभरसुद्धा शक्यता नाही. कोणताही पुरस्कार हा त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतो. त्याच्या कार्यास प्रेरणा देणारा ठरतो. एखाद्या पुरस्कार सोहळ्यामुळे लोकांना त्यांच्या कामाचे मोल वाटू लागते. एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व ओळखण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार दिला जातो. जो कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करतो त्यालाही पुरस्कार दिला जातो. पुरस्कार मिळालेले लोक त्यांच्या जीवनात अधिक सकारात्मकता निर्माण करू शकतात आणि त्यांचा दृष्टिकोन सुधारू शकतात. त्यामुळे कोणताही पुरस्कार हा ती व्यक्ती जिवंत असतानाच दिला जाणे गरजेचे आहे. मरणोत्तर पुरस्काराचे मोल त्या व्यक्तीसाठी तरी शून्य ठरते. कारण ज्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे ती व्यक्तीच हयात नाही, तर त्या पुरस्काराचे मोल कोणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार? देशसेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या लष्करी जवानांना मरणोत्तर पुरस्कार देणे समजण्यासारखे आहे. कारण लष्करी जवान हा संधीच्या शोधात असतो आणि संधी मिळताच तो देशसेवेसाठी प्राणार्पण करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशावेळी त्याचा कुटुंबाला व देशालाही त्याचा सार्थ अभिमान असतो. पण रतन टाटांसारख्या उद्योगपतीला देशासाठी केलेले कार्य लक्षात घेता, त्यांच्या हयातीतच आणि वयाच्या योग्य टप्प्यावर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावयास हवे होते. टाटा यांनी एका हाताने संपत्ती कमावली व दुसऱ्या हाताने दान केली. कोरोना महामारीने संपूर्ण जग वेठीस धरले असताना, रतन टाटा यांच्या टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी प्रथम पाचशे कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर काही वेळातच टाटा सन्सने अतिरिक्त हजार कोटी रुपये देण्याची घोषणा करून एकूण १,५०० कोटी रुपये कोरोनाशी लढण्यासाठी दिले होते. टाटांप्रमाणेच अशा अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्ती कोणत्याही प्रसिद्धीची अथवा फळाची अपेक्षा न ठेवता आपले सामाजिक कार्य नेटाने पुढे चालू ठेवतात. त्यांच्या या कार्याची दखल सरकारने नक्कीच घेतली पाहिजे. कारण सरकारकडून या पुरस्काराची संकल्पना त्यासाठीच मांडलेली असते. या पुरस्कारामुळे संबंधित पुरस्कारार्थींना शासनाकडून काही सोयी-सवलती दिल्या जातात. त्यामुळे त्यांना त्यांचे समाजकार्य अधिक प्रभावीपणे करता येणे शक्य होते. काही अब्जाधीश आपली आर्थिक गणिते पार पाडत दानशूरतेचा आव आणतात, हेदेखील खरे आहे. पण रतन टाटांसारख्या अब्जाधीशाला त्यांच्या रांगेत बसवणे, हे चुकीचे आहे. टाटा यांची समाजसेवा निरपेक्ष होती, हे कोणी सांगण्याची गरज नाही. सरकार आपल्या यंत्रणांद्वारे अशा व्यक्तींना हेरून त्यांना सन्मानित करू शकते. आज टाटांना त्यांच्या हयातीतच भारतरत्न दिला गेला असता तर ते त्या पुरस्काराची शान वाढविणारे ठरले असते. केंद्र सरकार अदानींच्या प्रेमात पडल्याने त्यांना टाटांचा विसर पडला असेल. मात्र, राज्य सरकारलादेखील टाटांना त्यांच्या मृत्यूनंतर भारतरत्न पुरस्कार द्यावा, याची जाणीव व्हावी, हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. 'काखेत कळसा अन् गावाला वळसा' असा हा प्रकार म्हणावा लागेल. स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या फुले दाम्पत्यास मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. ती योग्यही आहे. कारण त्याकाळी हे पुरस्कारच अस्तित्वात नव्हते. योग्य वेळी योग्य घटना घडल्या की, त्याचे महत्त्व टिकून राहते. पुरस्काराचेदेखील असेच आहे. तो योग्य व्यक्तींना योग्य वेळी दिला गेल्यास त्या पुरस्कारार्थीचा आणि त्या पुरस्काराचा योग्य तो सन्मान राहतो. यासाठी सरकारने आपल्या धोरणात योग्य तो बदल वेळीच केला पाहिजे. म्हणजे कोणत्याही पुरस्कारापुढे 'मरणोत्तर' लावण्याची परंपरा खंडित होईल.
चंद्रशेखर शिंपी
निवासी संपादक, दै. लोकनामा
9689535738

0 टिप्पण्या