संपादकीय............✍️
दाऊदच्या पावलावर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/10/ 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी बिष्णोई गॅंगने फेसबुकद्वारे स्वीकारली आहे. या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपींच्या प्राथमिक चौकशीत ते बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिष्णाई गॅंगची चर्चा रंगू लागली आहे. एकेकाळी मुंबईवर राज्य करणाऱ्या कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पावलावर पाऊल ठेवून देशभरासह परदेशातही या गॅंगने आपले साम्राज्य पसरले आहे. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात, एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचे टेरर सिंडिकेट दाऊद इब्राहिमसारखे आहे. बिष्णोई गँगमध्ये सातशेपेक्षा जास्त शूटर आहेत. त्यातील तीनशे जण पंजाबमधील आहेत. सोशल मीडिया आणि इतर मार्गाने त्याच्या गँगमधील भरती केली जाते. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये बसून टेरर सिंडिकेट हॅंडल करत आहे, तर कारागृहातून लॉरेन्स बिष्णोई आपले टेरर सिंडिकेट चालवत आहे. देशातील ११ राज्ये व सहा देशांत त्याचे साम्राज्य आहे. भारतातील प्रत्येक राज्याची जबाबदारी त्याने वाटली आहे. बिष्णोई गँग
सतिंदरजित सिंह ऊर्फ गोल्डी बरार ऑपरेट करत आहे. एकंदरीत प्रति दाऊद गॅंग बनण्याचा बिष्णोई गॅंगचा प्रयत्न दिसतो. विशेष म्हणजे, दाऊदप्रमाणे बिष्णोई हाही एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. बिष्णोईवर खून व खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. तथापि, त्याच्यावरील कोणताही गुन्हे सिद्ध झालेला नाही. त्याचे वडील हरियाणा पोलिसांत हवालदार होते. बिष्णोई २०११ मध्ये पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सहभागी झाला. जिथे तो गोल्डी बरार (खरे नाव सतिंदरजित सिंह) या गुंडाच्या संपर्कात आला व येथूनच त्याच्या गुन्हेगारी जगताची सुरुवात झाली. काहींच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्सच्या मैत्रिणीची हत्या करण्यात आल्याने तो गुन्हेगारी जगतात ओढला गेला. चंदीगडमध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या सात एफआयआरपैकी चार प्रकरणांतून तो निर्दोष सुटला आहे. २०१४ मध्ये त्याची राजस्थान पोलिसांशी सशस्त्र चकमक झाली आणि त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. तेथून त्याने खून व साक्षीदारांची हत्या करण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. बिष्णोई समाज काळ्या हरणाच्या प्रजातीला पवित्र मानतो. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान सहभागी असल्याने त्याची हत्या करण्याचा कट बिष्णोईने आखला होता. २९ मे २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याची जबाबदारी गोल्डी बरारने स्वीकारत बिष्णोईसोबत आपण हा कट रचल्याचे जाहीर केले होते. या हत्येच्या वेळीही बिष्णोई तिहार तुरुंगात होता. २१ सप्टेंबर २०२३ रोजी बिष्णोईने खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंगच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. सुखदूल सिंग याचे बिष्णोईच्या टोळीसोबत नेहमी खडके उडत असत. मात्र, या हत्येच्या वेळीही बिष्णोई साबरमती मध्यवर्ती कारागृहातच होता. बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता सलमान खान नाही, तर त्याच्या जवळच्या लोकांनाही बिष्णाई गॅंग आपले शत्रू मानते. पंजाबी गायक ए. पी. ढिल्लोन सलमान खानसोबत एका अल्बममध्ये दिसला होता. त्यानंतर या गँगने कॅनडात ढिल्लोनच्या घरावर गोळीबार केला होता. यानंतर बिष्णोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट टाकत सलमान खानपासून लांब राहण्याचा एकप्रकारे इशारा दिला होता. आताही बाबा सिद्दिकींचे सलमानशी घनिष्ट संबंध असल्याने त्यांची हत्या केल्याचा दावा बिष्णोई गँगने केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बिष्णोई गँगने म्हटले आहे की, सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याचे दाऊद आणि अनुज थापन याच्यासोबत बॉलिवूड, राजकारणी आणि मालमत्ता व्यवहाराशी असलेले संबंध. सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करणारा जो कोणी असेल त्याने तयार राहावे. जर कोणी आमच्या भावांना मारले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. बिष्णोई गॅंगने बाबा सिद्दिकी यांची हत्या केली असली, तरी नेहमीप्रमाणे लॉरेन्स बिष्णोई हा या हत्येवेळी साबरमती कारागृहात बंदिस्त आहे. म्हणजेच बिष्णाई कारागृहात बसून आपल्या सहकाऱ्यांमार्फत या सर्व हत्या तडीस नेत आहे व त्याची जबाबदारीदेखील तत्काळ स्वीकारत आहे. मात्र, काही पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बिष्णोई हा कारागृहात कडक सुरक्षेत असून, त्याने याबाबत कुणाला आदेश दिल्याची शक्यता नाही. त्याच्या नावे फेसबुकवर अनेक खोटी खाती आहेत. यांपैकी एका खात्यावर हा दावा करण्यात आला आहे आणि हे कपोलकल्पित असल्याचे सांगितले जाते. काहीही असले, तरी कारागृहात बसून तीन-तीन हत्यांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या बिष्णोई गॅंगचा सफाया करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत, हे नक्की! आज देशातील ११ राज्यांत, सहा देशांमध्ये बिष्णोई गॅंगचा विस्तार असल्याचे पोलीसच सांगत आहेत. मग प्रत्येक वेळी या गॅंगकडून एखादी हत्या होण्याची वाट पोलीस पाहणार आहेत का? पोलीस या गॅंगचा बंदोबस्त का करू शकत नाहीत? सिद्दिकी यांच्यानंतर सलमान खानच्या सहवासात येणारा प्रत्येक जण बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर आहे. अशा वेळी पोलीस सलमानसह या सर्वांना सुरक्षा पुरवत बसणार की, या गँगचाच सफाया करणार, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. दाऊदच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात बिष्णोई गॅंग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू शकते. देशात पुन्हा एकदा प्रति दाऊद निर्माण होण्याआधी या गॅंगचा सफाया करणे, हे पोलिसांसमोर आव्हान आहे.
चंद्रशेखर शिंपी
निवासी संपादक, दै. लोकनामा
9689535738

0 टिप्पण्या