💢आम्ही मांडलेली "देवींची" पूजा...!

 💢आम्ही मांडलेली "देवींची" पूजा...!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 07/10/ 2024 : सध्या नवरात्र सुरू आहेत, देवीचे आगमन झाले आहे. मंडपात, घरात आणि इतरही अनेक ठिकाणी देवी विराजमान झाल्या आहेत. प्रत्येक जण भक्तीभावाने देवीची पूजा करतच आहे... !

हे झालं देवीचं मूर्ती स्वरूप... !!! 

पण या व्यतिरिक्त सुद्धा, चालती बोलती देवी वेगवेगळ्या रूपात, आपल्या आजूबाजूला कायम वावरत असते. आपल्या आयुष्यावर यांचाच प्रभाव असतो. ! 

पहिली *आई*, दुसरी *आज्जी*, तिसरी *मावशी*, चौथी *आत्या*, पाचवी *बहीण*, सहावी *पत्नी*, सातवी *मुलगी*, आठवी *सून*, नववी *नात*...* हीच आहेत आपल्या आयुष्यातील *देवीची नऊ रूपे...!!!*

मूर्ती स्वरूपातील देवी सोबतच, आपल्या घरातील या देवींची सुद्धा पूजा मांडूया का ? 

यांच्या पूजेला हार, नारळ, अगरबत्ती, फुलं यांची गरजच नसते. 

वेगवेगळ्या रूपात, आपल्याच घरात आपल्या आसपास वावरणाऱ्या या देवी माता... ! 

'आपल्या घरातल्या, याच देवी माता आपल्या खऱ्या देवी असतात, आपल्यासाठी त्या झिजतात...आणि मुकुट घालायची वेळ येते, तेव्हा मात्र तो काढून आपल्या डोक्यावर ठेवतात...!'

'या देवीला मिळालेला प्रसाद, ती आपल्या ताटात ठेवते आणि स्वतःच्या पदरात शीळी भाकर घेऊन तृप्त होते...'

'फाटका पदर घेऊन राब राब राबते, आणि आपल्याला भरजरी बनवते...' 

'आता मी संपलो, म्हणत असतानाच, कुठल्यातरी रूपात *"ती"* येते आणि आपल्याला पुन्हा जन्माला घालते... पुन्हा पुन्हा जन्माला घालते...! 

आपल्याच घरातल्या या देवींची पूजा कशी मांडावी...  ??? 

तीला काही द्यावं, इतके आपण अजून "श्रीमंत" झालेलो नाही...! 

'तू आहेस गं माऊली, म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, तू मायेनं भरलेला *"घट"* आहेस आणि आयुष्यभर मी माझ्या मनात तो "*स्थापन"* करूनच जगणार आहे... हाच माझा भाव... "भक्ती" म्हणून स्वीकार कर गं माऊली !!! 

आयुष्यभर मी तुला मान देईन, सन्मान देईन, मनापासून आदर करेन; हिच मी केलेली "उपासना" आहे ...!!!

"तुझ्या शिवाय मी पूर्णपणे रीता आहे, याची जाणीव तुझ्या सुद्धा मनी असू देत हां देवी ... कारण माझी तीच "श्रद्धा" आहे...!!!" 

तुला अर्पण करू शकेन, असं माझं माझ्याकडे काही शिल्लकच नाही... 

..... तरीही माझ्या हृदयाची धडधड, मी तुलाच अर्पण करतो... 

डोळे उघडल्यावर दिसणारा प्रकाश, *पांढरा* रंग म्हणून मी तुला अर्पण करतो...

डोळे मिटल्यावर न दिसणारा अंधार, *काळा* रंग म्हणून मी तुला अर्पण करतो...

ज्यामुळे मी जिवंत आहे; त्या रक्ताचा *लाल* रंग मी तुला अर्पण करतो... 

ज्या आभाळात झेप घेण्यासाठी दरवेळी मला तू प्रोत्साहन देतेस, त्या आभाळाचा *निळा* रंग मी तुला अर्पण करतो...

ज्या पृथ्वीवर मी तुझ्यामुळे जिवंत आहे, त्या पृथ्वीचा *हिरवा* रंग मी तुला अर्पण करतो... 

माझ्या डोळ्यात तेवत असणाऱ्या ज्योतीचा तो *पिवळा* रंग मी तुला अर्पण करतो... 

आमच्यासाठी आयुष्यभर जळतेस, जळालेल्या त्या राखेचा *करडा* रंग मी तुला अर्पण करतो...

तुला पाहून, नेहमीच माझ्या "जीवात जीव येतो"... 

चल, आज हा *बीन रंगाचा* जीव सुद्धा तुलाच अर्पण करतो... !!! 

माझ्या या अर्पण करण्यालाच मी पूजा म्हणतोय... ! 

स्वीकार करा.... आई, आजी, मावशी, आत्या, ताई, मुली, सुनबाई, गोडुल्या नाती आणि सौ...! 

काही चुकलं असेल तर पदरात घ्या... 

नेहमी घेता तसंच.... !!! 

असो.... 

माझं एक कुटुंब घरात आहे आणि दुसरं याचक कुटुंब, माझ्या आयुष्यातील इतर नऊ देवी, रस्त्यावर दुसऱ्यांच्या दयेवर जगत आहेत, हा माझा सल आहे...! 

पायात काटा घुसावा आणि तो निघूच नये...

तेव्हा जी वेदना होते, तीच ही वेदना आहे...! 

आपल्याला कोणतीही वेदना झाली, की मग बाम लाव, शेक देवून बघ, गोळी खा किंवा आणखी काहीतरी करून बघ असे अनेक उपाय करत असतो... 

माझ्या या वेदनेवरचा, असाच एक उपाय म्हणून, या नवरात्रात आम्ही रस्त्यावरच्या सर्व आई, आजी, मावशी, आत्या, ताई, मुली, सुनबाई, गोडुल्या नाती यांचे पूजन करायचे ठरवले आहे... ! 

"माऊली" म्हणून त्यांची पूजा करून, त्यांना सन्मान द्यायचे ठरवले आहे.... नवीन साडीचोळी द्यायचे ठरवले आहे... ! 

दरवर्षी आपल्या साथीने आम्ही हे करतच असतो.... याही वर्षी करत आहोत... ! 

दिलेला हा सन्मान नवरात्रींपुरता मर्यादित न राहता, आयुष्यभर त्यांना मिळावा इतकीच माझी *"मनीषा"* आहे.... 

आम्ही दोघे मिळून हिच प्रार्थना करतोय ... 

बाकी आमच्या हातात दुसरं आहेच काय ??? 

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे 

9822267357

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या