सावली वृक्षाची खरड छाटणी करणारा पर्यावरण प्रेमी कोण?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/9/2024 : गुलमोहर शॉपिंग सेंटर माळीनगर (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) समोर एका गाळा धारकाने केलेल्या 3 वृक्षारोपणा पैकी पूर्ण जोमाने वाढीस लागलेल्या एका सावली वृक्षाची पूर्णता खरड छाटणी करणारा विकृत मनोवृत्तीचा पर्यावरण प्रेमी कोण ? आणि त्याने कोणत्या अधिकारात रात्रीच्या अंधारात हे कृत्य केले ? याबाबत कारवाई होणार की नाही? याबाबतची चर्चा शॉपिंग सेंटरमध्ये सध्या सुरू आहे. माळीनगर मधून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा नव्याने झालेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स पैकी एकाही गाळ्यासमोर वृक्षारोपण राबविण्यात आलेले नसताना वैयक्तिकरित्या एका गाळाधारकाने स्वखर्चाने केलेल्या तीन करंजे वृक्षारोपणा पैकी एकाची खरड छाटणी करून "आयत्यावर पायते आणि हाती घेतले कोयते" असा "कानामागून आला तिखट झाला" अशा गाळेधारकाला पाठीशी घालण्यात येणार का असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एका बाजूला शासन स्तरावरून वृक्षारोपण, वृक्ष संगोपन व संवर्धन मोहीम, वृक्ष दत्तक योजना इत्यादी विविध योजना राबविण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हरतरेने प्रयत्न केले जात आहेत. वृक्षतोडी बाबत कठोर कारवाई केली जाते आणि असे असताना अकलूज- टेंभुर्णी मुख्य मुख्य मार्गावरील माळीनगर येथील गुलमोहर शॉपिंग सेंटरच्या गाळ्यासमोर जेमतेम पाच फूट उंच वाढलेल्या सावली देणाऱ्या करंजीच्या नव वृक्षाची, फळबागेतील फळझाडांची फळधारणेपूर्वी करण्यात येते त्या पद्धतीने खरड छाटणी करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने या ठिकाणी वृक्षारोपण करून उन्हाळ्यामध्ये अन्य ठिकाणाहून बादलीने पाणी आणून सदर रोपांची जपणूक केली होती, रोपवाढीसाठी पोषक ठरणारी महागडी ऑरगॅनिक लिक्विड खतमात्रा पदर पैशाने आणून सदर रोपांचे संगोपन केले, त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी सचिन कुदळे यांना वृक्ष छाटणीची माहिती सांगितली तथापी आठ दिवस उलटून गेले तरीही अद्याप याबाबतीत कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही अशी माहिती अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यास गेले असता मिळाली.

0 टिप्पण्या