जागतिक पातळीवरील कामगारांच्या भावविश्वात घेवून जाणारी प्रतिकात्मक कलाकृती - “हंगामी”

 मुखपृष्ठ परीक्षण क्रमांक : 8.

जागतिक पातळीवरील कामगारांच्या भावविश्वात घेवून जाणारी प्रतिकात्मक कलाकृती - “हंगामी” 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे,                                  मुंबई दिनांक 7/9/2024 : नाशिकचे कवी तथा लेखक विलास पंचभाई यांची “हंगामी” ही साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. समाजातील तळागाळातील कष्टकरी समाजाचे वास्तव चित्रण असलेली कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी ही कलाकृती आहे. या कलाकृतीच्या मुखापृष्ठाकडे पाहिले की, कामगारांच्या हालअपेष्ठा डोळ्यासमोर उभ्या राहतात. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या कल्पकतेने सजलेल्या या मुखपृष्ठावरचे संदर्भ पाहून स्वतःचे वास्तव जीवन क्षणभर डोळ्यासमोर तरळून गेले. जागतिक पातळीवरील कामगारांच्या भावविश्वात घेवून जाणारी ही कलाकृती अतिशय भावली.

विलास पंचभाई यांच्या “हंगामी” या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर पाहिले तर एक कामगार नटबोल्ट खोलण्यासाठी वापरात असलेल्या पट्टीपान्हा या उपकरणाच्या आत जमिनीला पाठ लावून उपकरणावर डोके ठेवून, हनुवटीला हात लावून विचारमग्न होऊन, अनवाणी पावलांनी दोन्ही पायांचा एकमेकांना आधार देवून, एक हात पोटावर घेऊन झोपला आहे, शेजारी जेवणाचा दोनताळी डबा आहे, आणि आजूबाजूला काळाकुट्ट अंधार दाखवला आहे. असा संदर्भ असलेली कलाकृती पाहून क्षणभर मन अस्वस्थ झाले. यावर सूक्ष्म निरीक्षण केल्यावर काही संदर्भ मला जाणवले त्यावर हे आजचे मुखपृष्ठ परीक्षण.

जगभरात सर्वात प्रथम युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली नंतर जगभर त्याची लाट आली आणि संपूर्ण जगात औद्योगिक क्रांती झाली. पूर्वी हस्तकला व्यवसाय अमलात होता मात्र त्यासाठी वेळ आणि मजूर मिळणे अवघड होते म्हणून १७०० ते १८०० च्या शतकात औधोगिकीकरणाने डोके वर काढले. साधारणतः अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्रांचा उपयोग करण्यास सुरुवात झाली. औद्योगिक क्षेत्रात बदल घडवून येण्यासाठी भांडवल म्हत्वाचे होते. कामगारांना कमी वेतन देवून कमी दरात उत्पादित मालाच्या किमती ठेवून मोठ्या प्रमाणात फायदा करून घेणे हे औद्योगिक धोरणात राबवले गेले त्यामुळे कर्मचारी तेव्हापासून या औद्योगिकीकरणात  अडकला गेला. आजही काही काही कंपन्यांत कष्ट जास्त आणि मजुरी कमी असे मजुरांना राबवले जाते आणि म्हणूनच “हंगामी” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एक कामगार नटबोल्ट खोलण्यासाठी वापरात असलेल्या पट्टीपान्हा या उपकरणाच्या आत दाखवला आहे, लाक्षणिक अर्थाने कामगार या औद्योगिक यंत्रात अडकला गेला आहे असा अर्थ मला जाणवला.

“हंगामी” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर दाखवलेला कामगार जमिनीला पाठ लावून उपकरणावर डोके ठेवून हनुवटीला हात लावून विचारमग्न दाखवला आहे, याचा अर्थ असा आहे की, औद्योगिकीकरणामुळे कामगारांना कमी वेतन मिळत असले तरी स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी उपकरणावर डोके ठेवून म्हणजेच कामगार आपल्या कामावर विश्वास ठेवून आहे, आज ना उद्या आपला आर्थिक विकास होईल आणि आपल्याला सुखाची झोप लागेल या भरवशावर जमिनीला पाठ लावून भविष्याची चिंता करत हनुवटीला हात लावून विचारमग्न दाखवला आहे. काही कंपन्यात कामगारांना केवळ एका हंगामापुरते कामावर घेतले जाते. ठराविक काळासाठी काही कंपन्या कामगारांना कामावर ठेवून अल्प मोबदला देवून जास्त फायदा करीत असतात. यामुळे कामगार आहे त्याच पदावर राहतो त्यामुळे त्याच्याकडे पाहतांना इतर कंपन्यादेखील त्याला तशीच वागणून देत असतात या सर्व अडचणी कामगाराला विचार करायला लावतात असा “हंगामी” या शीर्षकातून अर्थ मला दिसला आहे..  

  “हंगामी” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कामगार अनवाणी दाखवला आहे, याचा अर्थ असा की- हा कामगार एका आर्थिक मागास असलेल्या सर्व कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहे. समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी साधी चप्पल देखील नसते. मोलमजुरी करणारे कामगार, काच पत्रा भंगार वेचणारे कामगार हे नेहमी अनावणी पावलांनी फिरत असतात. औद्योगिक कामासाठी लागणारा कच्चा माल गोळा करण्यासाठी लागणारे कामगार यांच्याकडे आर्थिक दुर्बलता असल्याने पायात चप्पल देखील मिळत नाही. दिवसभर उभे राहून, चालून चालून पायांना थोडा आराम मिळावा म्हणून मुखपृष्ठावरील कामगार अनवाणी पावलांनी दोन्ही पायांचा एकमेकांना आधार देवून झोपलेला दाखवला आहे असा अर्थ यातून मला जाणवला आहे. 

“हंगामी” या कलाकृतीचे मुखपृष्ठ मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय संवेदनशिलतेने सजवले आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कामगार एक हात पोटावर घेऊन झोपला आहे, शेजारी जेवणाचा दोनताळी डबा आहे, आणि आजूबाजूला काळाकुट्ट अंधार दाखवला आहे याचा अर्थ असा अभिप्रेत होतो की, कामगाराच्या  आयुष्यात अनेक संकटे आहेत, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आर्थिक विवंचना, कामाची अस्थिरता, पारिवारिक सुखाची वाणवा अशा अनेक अडचणी कामगारापुढे उभ्या राहतात या अडचणी म्हणजे मुखपृष्ठावरील काळाकुट्ट अंधार आहे. या काळ्याकुट्ट अंधारात स्वतःला सावरून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या अडचणी सोडवण्यासाठी कामगार पोटाला चिमटा घेऊन काम करत असतो , टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र राबत असतो. पोटाची भूक मोठी विदारक असते हे सूचित करण्यसाठी मुखपृष्ठावर कामगार एक हात पोटावर घेऊन झोपला आहे असा अर्थ मला यातून जाणवला आहे      

“हंगामी” ही कलाकृती लेखकाच्या जीवनाशी निगडीत आहे, लेखकाला आलेले अनुभव, त्यांनी भोगलेले वास्तव जीवन यातून दिसून येते. कामगारांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी या कलाकृतीतील कथांमधून लेखकाने मांडल्या आहेत. या कथासंग्रहात एकूण दहा कथा असून सर्व कथा लेखकाच्या वास्तव जीवनाशी संबंधित आहेत. लेखक विलास पंचभाई यांच्या हंगामी कलाकृतीचे ज्ञानसिंधू प्रकाशन या संस्थेने प्रकाशन केलेले असून प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या कलाविष्काराने सजवले आहे. वाचकांनी कलाकृती जरूर वाचावी अशी आहे . लेखक विलास पंचभाई यांना पुढील कलाकृती निर्मितीस हार्दिक शुभेच्छा.

 पुस्तक परीक्षण : प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)

संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)

परीक्षण 

कलाकृती – “हंगामी”

साहित्य प्रकार – कथासंग्रह   

लेखक   – विलास पंचभाई , नाशिक     

लेखक कवीचा संपर्क – ७७७४९ ५५८९२     

मुखपृष्ठचित्रकार – अरविंद शेलार, कोपरगाव      

प्रकाशक- ज्ञानसिंधू प्रकाशन, नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या