किमान खासदार-आमदारांनी तरी भान राखले पाहिजेत

 किमान खासदार-आमदारांनी तरी भान राखले पाहिजेत

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 9 सप्टेंबर 2024 : 

भारतीय कुणबी समाजाच्या महाअधिवेशनात बोलताना, पक्ष कोणताही असो, समाजाच्याच माणसांना निवडून दिले पाहिजेत असे म्हटले आहे. ज्याची जेवढी टक्केवारी तेवढीच त्याची हिस्सेदारी असेही त्या म्हणाल्यात. त्यांचे हे विधान लोकशाहीसाठी मारक तर आहेच पण समाजात दुही निर्माण करणारे आहे. धर्मनिरपेक्षतेची परंपरा जपणा-या काँग्रेस पक्षाच्या खासदाराने असे जातीमुलक विधान करावे हे अत्यंत दुर्देवी आहे.

प्रतिभा धानोरकर यांनी हे विधान ब्रम्हपुरी येथे केले. ब्रम्हपुरी हा काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदार संघ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये प्रतिभा धानोरकर व विजय वडेट्टीवार यांचे दोन गट आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची काँग्रेसची गटबाजीची परंपरा फार जुनी आहे. पूर्वी वामनराव गड्डमवार व नरेश पुगलिया यांचे गट होते. या दोन गटामध्ये एवढी चुरस होती की दोन्ही गट निवडणुकीत एकमेकांना पाडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत. ती परंपरा आता पुढची पिढी म्हणून धानोरकर-वडेट्टीवार चालवत आहेत. पक्षांतर्गत गटबाजी म्हटले की, शह-काटशहाचे राजकारण अटळ असते. अनेकवेळा पक्षश्रेष्ठीही ते चालवून घेतात. थोड्याफार फरकाने हे सर्वच पक्षात चालते. कोणाचे उघड दिसते तर कोणाचे झाकून राहते हाच काय तो फरक आहे. या मेळाव्यात बोलताना खा. धानोरकर यांनी वडेट्टीवारांचा नामोल्लेख न करता अल्पसंख्य समाजाचे आपले प्रतिनिधीत्व करीत आहेत असे विधान केले. वडेट्टीवारावर टीका करण्याचा धानोरकरांना अधिकार आहे. भलेही पक्षशिस्त म्हणून त्यांना ती उघड करता येत नसेल हा भाग निराळा. परंतु ही टीका करताना त्यांनी काही भान ठेवणेही गरजेचे आहे. अल्पसंख्य समाजाचे आपले प्रतिनिधीत्व करीत आहे ही टीका कदापिही योग्य नाही. लोकशाहीत लोकांना जो योग्य वाटेल त्यांना लोक  निवडून देतात. तो कोणत्याही समाजाचा असो. कोणाला निवडून द्यायचे हा लोकांचा अधिकार आहे. मग लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीवर टीका करताना त्याच्या समाजाला हिन दाखविण्याचा हा प्रकार आहे. तो दुस-या एका लोक प्रतिनिधीने करणे कदापिही योग्य नाही. याचे कारण लोकसभा निवडणुकीत अनेक अल्पसंख्य समाजाच्या मतदारांनी प्रतिभा धानोरकर यांनाही मते दिली असतील. तो त्यांचा अपमान होत नाही का?

मुद्दा असा आहे की, देशाची राज्यघटना जात, पात, धर्म, लिंग, वर्ण असा कोणताही भेदाभेद मानत नाही. या देशातील हुशार, बुद्धीमान, सुशिक्षित माणसं देशाच्या विधीमंडळ व संसदेत असावी अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. पहिली निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे पहिले कायदा मंत्री केले ते त्यांची कुशाग्र बुद्धी आणि शैक्षणिक क्षमता पाहून केले. त्यावेळी ते कोणत्या जातीचे, धर्माचे याचा विचार नेहरुंनी केला नाही. बाबासाहेब काँग्रेसचे नसतानाही नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले त्या मागे त्यांच्या हुशारीचा, बुद्घीमत्तेचा देशाला फायदा व्हावा हाच उद्देश होता. पंडित नेहरुंनी चीनच्या युद्धांनंतर यशवंतराव चव्हाणांना देशाचे संरक्षणमंत्री म्हणून बोलावून घेतले. ते यशवंतरावांची गुणवत्ता पाहून, महाराष्ट्रात त्यांचा समाज जास्त आहे म्हणून नाही. देश चालवायला, राज्य चालवायला हुशार, बुद्धीमान लोक लागतात. ते कोणत्या जातीचे आहेत याच्याशी काहीही संबंध नाही. पण आज सारा इतिहास, परंपरा लोक आणि सोबतच राजकारणीही विसरुन गेले. सर्वजण केवळ आपल्यापुरते व जातीपुरते पाहत आहेत. प्रतिभाताई असेही म्हणाल्यात, जेवढी ज्यांची टक्केवारी तेवढी त्यांची हिस्सेदारी. मग यापुढे काय लोकांनी प्रत्येक जातीची किती टक्केवारी याचा हिशोब करुन मतदान करायचे?  लोकशाहीत लोक प्रतिनिधी बहुमताने निवडतात. त्या प्रतिनिधीच्या समाजाची किती टक्केवारी आहे ही पाहिली जात नाही. एकदा निवडणूक झाली की, तो प्रतिनिधी कोणत्याही एका समाजाचा राहत नाही. तो सर्व समाजाचा प्रतिनिधी होतो. त्यामुळे विशिष्ट समाजाने, विशिष्ट उमेदवारालाच मते द्यावीत हाच विचार लोकशाहीसाठी घातक आहे. यामुळे समाजात एकी राहणार नाही. समाजा-समाजात दुही निर्माण होईल. त्यामुळे सामाजिक अराजक माजेल. याचे भान किमान लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आमदार-खासदारांनी तरी ठेवणे गरजेचे आहे. केवळ आपल्या समाजाची टक्केवारी जास्त आहे या एका निकषावर जर आपलाच माणूस निवडून यावा असा अट्टाहास असेल तर मग इतर समाजाने त्यांना मते द्यायचे नाही असे ठरविले तर त्याचा परिणाम काय होईल? याचा तरी विचार केला पाहिजे. मतदार संघात विशिष्ट समाजाची मते सर्वाधिक आहेत म्हणून त्यांचाच लोकप्रतिनिधी निवडून येईल हा विचारच घातक आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे केवळ अल्पसंख्य आहोत म्हणून इतरांनी काय आयुष्यभर सतरंज्याच उचलत राहायच्या? इतर समाजातही बुद्धीमान, हुशार लोक आहेत. त्यांचाही फायदा देशाला, राज्याला, सर्व समाजाला झाला पाहिजेत.

मी ज्या गावचा आहे त्या उमरखेडचे उदाहरण मुद्दाम देतो. उमरखेड हा मराठा-कुणबी बहुल मतदार संघ आहे. भाऊसाहेब माने, अनंतराव देवसरकर, भिमराव देशमुख, प्रकाश पाटील देवसरकर अशा अनेक लोकप्रतिनिधींनी या मतदार संघात अनेक निवडणुका जिंकून विधीमंडळात केले आहे. परंतु १९९५ च्या निवडणुकीत प्रकाश पाटील देवसरकर यांच्या विरोधात पोलिस कर्मचारी असलेले उत्तम इंगळे यांनी उमेदवारी दाखल केली. या मतदार संघात मराठा-कुणबी समाजाचे सर्वाधिक जवळपास ७५ हजार मते होती. उत्तम इंगळे आदिवासी समाजाचे आहेत. त्यांच्या समाजाची केवळ ३० हजार मते होती. परंतु तरीही विद्यमान आमदार असणा-या प्रकाश पाटलांना पराभूत करुन उत्तम इंगळे विजयी झाले. २००४ मध्ये पुन्हा याच उत्तमराव इंगळे यांनी पूर्वी आमदार असलेल्या अनंतराव देवसरकर या आमदारांचा पराभव केला. मतदार संघात सर्वाधिक मते असूनही प्रकाश पाटील व अनंतराव देवसरकर या मराठा आमदारांना पराभव पत्करावा लागलाच ना. कोणत्याही निवडणुकीत प्रतिनिधी त्याची गुणवत्ता पाहून निवडला गेला पाहिजेत. जात, पात, धर्म पाहून नव्हे. एकीकडे जातीअंताची लढाई लढतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे निवडणुकीतील फायद्यासाठी जातीचे राजकारण करायचे हे दुर्देवी आहे. आपली राज्यघटना सर्वोच्च आहे असे आपण अभिमानाने सांगतो. त्या राज्यघटनेने जातीपातीला कोणतेही महत्व दिलेले नसताना आपल्या जातीचाच लोकप्रतिनिधी निवडून आला पाहिजेत असे संसदेत बसणा-या लोकप्रतिनिधीने सांगणे हा राज्यघटनेचा अपमान होत नाही का? दुर्देवाने महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती तर कमालीची रसातळाला गेली आहेच, सामाजिक परिस्थितीही त्याच मार्गाने जात आहे. खासदाराचे भाषण त्याचे द्योतक आहे. आजमितीला प्रतिभाताई कोणत्या समाजाच्या आहेत याला महत्व नाही. त्या चंद्रपुरच्या खासदार आहेत. त्यांना सर्व समाजाने कमी अधिक प्रमाणात मते दिली आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका एकांगी न राहता सर्व समावेशक राहिली पाहिजेत. आणि ते ज्या पक्षाचे धोरण स्वीकारतात, तो काँग्रेस पक्ष कोणताही जाती, धर्म, पंथ वाद पाळत नाही याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजेत. वडेट्टीवारावर जरुर टीका करा, परंतु ती करताना कोणत्याही समाजाला हानी पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या.  


                       विनायक एकबोटे

                   ञजज्येष्ठ पत्रकार नांदेड  

दि. ९.९.२०२४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या