रानभाजी - कमळकाकडी

 

रानभाजी - कमळकाकडी  

शास्त्रीय : निलुम्बो न्युसिफेरा

कुळ : निलूम्बोनेसी

स्थानिक : पद्मकमळ, सूर्यकमळ, लक्ष्मीकमळ 

इंग्रजी : चायनीज वॉटर लिली, इजिप्शियन वॉटर लिली, पायथॅगोरीअन बीन, इंडियन सॅक्रेड लोटस

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/9/ 2024 : तळे, तलावामध्ये अनेक प्रकारची कमळे आढळतात. ही वनस्पती उष्ण प्रदेशात भारतात सर्वत्र तलाव तळ्यात वाढते. महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने कोकण, कोल्हापूर, हिंगोली, चंद्रपूर विदर्भात मुबलकपणे आढळून येते. कमळाच्या प्रत्येक भागास वेगवेगळी नावे असून, व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची आहेत. बियांना संस्कृत मध्ये 'पद्मबीज' म्हणतात, तर गुजराती मध्ये 'पबडी' म्हणतात. बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकडी म्हणतात. कमळाच्या कंदास कमळकंद म्हणतात, तर संस्कृत मध्ये कंदास 'शालूक' म्हणतात. कंदाचे सुकविलेले तुकडे 'भिशी' या नावाने मुंबईत विकतात. कंदापासून तयार केलेल्या पिठास मुंबईच्या बाजारपेठेत 'मखाण' म्हणतात, तर फुलांतील पुंकेसरास 'किंजल्क' म्हणतात.

खोड - कंदवर्गीय असून ते पाण्यात चिखलात असते. कंद लंबगोलाकार, प्रसर्पी, पेरांवर मुळे असतात.

पाने - साधी, वर्तुळाकार ०.३ ते ०.६ मीटर व्यासाची, अंतर्वक्र किंवा कपांसारखे, दोन्ही बाजू गुळगुळीत, तेलकट, किरणयुक्त शिरा. पानांचे व फुलांचे देठ खूप लांब. पद्मकमळाची देठे पाणी पातळीच्या वर येऊन पाने पाणी पातळीच्या वर वाढतात.

फुले द्विलिंगी, नियमित, आकाराने मोठी, एकांडी व आकर्षक. फुले २० ते २५ सेंमी व्यासाची, गुलाबी किंवा पांढरट गुलाबी फुलांना मंद गोड मधुर वास. पद्मकमळे अन्य कमळ प्रजाती पेक्षा आकाराने फार मोठी असतात. पाकळ्या अनेक, ५ ते १२.५ सेंमी लांब, लंबवर्तुळाकार. पुंकेसर अनेक, गदाकृती. बिजांडकोश अनेक, एकमेकापासून अलग. फुलाचा मधला भाग (पुष्पस्थली) गोलाकार, त्रिकोणी, नरसाळ्या सारखा सुमारे १५ ते १८ सेंमी उंच. या भागास 'कमळकाकडी' म्हणतात. यावर अनेक खळगे असतात. प्रत्येक खळग्यात एकेका किंजाचे बनलेले किंजपूट असते. किंजाच्या बैठकीच्या खालच्या दांड्यावर बारीक केसर उगवलेले असतात, ते चपटे असून अनेक असतात. पक्व किंजदल व्यस्त अंडाकृती व केशहीन. या वनस्पतीला मार्च ते जून या कालावधीत फुले येतात. ही वनस्पती भारत, श्रीलंका, इराण पासून ऑस्ट्रेलिया पर्यंत आढळते.

औषधी गुणधर्म

# पद्मकमळ या वनस्पतीचे कंद, पाने, फुले, बिया व पुष्पस्थली औषधात वापरतात. # कमळाच्या पाकळ्या शीतल, दाहप्रशमन, हृदयबल्य, हृदयसंरक्षक, रक्तसंग्राहक, मूत्रजनन आणि ग्राही आहे. यामुळे रक्तवाहिन्यांचे संकोचन होते व हृदयाची गती कमी होते. # कमळपुंकेसर दाहप्रशमन आणि रक्तसंग्राहक आहेत. ज्वर आणि रक्तस्राव होणाऱ्या रोगांत कमळ वापरतात. रक्तस्राव होणाऱ्या रोगांत पाकळ्या व पुंकेसर उपयुक्त आहेत. रक्तार्श आणि दाह कमी होण्यास पुंकेसर खडीसाखरे बरोबर देतात. # कमळकाकडी (पुष्पस्थली) पौष्टिक, स्नेहन, ग्राही व रक्तसंग्राहक आहे. कमळकंदाचे पीठ पौष्टिक, स्नेहन, ग्राही आणि रक्तसंग्राहक आहे. बिया पौष्टिक आहेत. # गरोदरपणात गर्भशयातून रक्त वाहत असल्यास फुलाचा फांट देतात. फुलाच्या फांटामुळे हृदयाची धडधड व नाडीचे जलद चालणे कमी होते. तीव्र ज्वरात उष्णतेमुळे हृदयास शिथिलता येते, पण फुलाच्या फांटामुळे हृदयास अशक्तपणा येत नाही. # रक्तयुक्त आंव, कुपचन आणि अतिसारात कमळकंदाची पेज देतात, यामुळे रक्त त्वरित बंद होते. # कमळाचे फुल, चंदन, रक्तचंदन, वाळा, ज्येष्ठ मध, नागरमोथा आणि साखर यांचा मंदाग्नीवर केलेला काढा ज्वरात फार हितकारक आहे. # ज्वरात पाकळ्या वाटून हृदयावर लेप करतात व अंगावर पानांचे पांघरुण घालतात. # कमळकाकडीच्या पेजेने उलटी व उचकी बंद होते. प्रदरांत कमळकाकडीची पेज देतात. # कमळकंदाचे चूर्ण मूळव्याधीसाठी शोथशामक म्हणून वापरतात. हे अपचन व आमांशातही वापरतात. कंदाची पिष्टि गजकर्ण व त्वचारोगांवर गुणकारी आहे. # पान व देठाचा पांढरा चिकट दुग्धपदार्थ अतिसारात उपयुक्त आहे. # फुले अतिसारात स्तंभक म्हणून वापरतात, तसेच यकृत रोगात मुलांसाठी मूत्रवर्धक म्हणून वापरतात, तसेच यकृत रोगातही देतात. # वीर्य पातळ झाल्यास बियांची पेज देतात. बिया वांती थांबविण्यासाठी देतात, तसेच लहान मुलांसाठी मूत्रवर्धक म्हणून वापरतात. # कुष्ठरोगासाठी हे शीतल औषध आहे. पुंकेसर रक्तस्राव होणाऱ्या मूळव्याधीत आणि मासिक अतिस्रावात उपयोगी आहे. # मूळव्याधीत पुंकेसर मध व लोण्याबरोबर देतात. पाकळ्या व पुंकेसर सौंदर्यप्रसाधन म्हणून त्वचा चांगली होण्यासाठी चेहऱ्याला लावतात.

भाजीचे औषधी गुणधर्म

कमळकाकडी भाजी करण्यासाठी वापरतात. अत्यंत थंड व पौष्टिक असल्याने शरीरातील ताकद वाढविण्यासाठी ही भाजी उपयुक्त मानतात. या भाजीमुळे रक्तातील उष्णता कमी होते. या भाजीने बाळंतीणीचे दूध वाढते. कमळकाकडीच्या भाजीने पित्तामुळे होणारा त्रास, लघवीची जळजळ इ. लक्षणे कमी होतात. ताप येऊन गेल्यानंतर उष्णतेचा परिणाम कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. कमळकाकडीची भाजी काश्‍मीर व गुजरात मध्ये अगदी आवर्जून खातात, तर सिंधी खाद्यसंस्कृतीत या भाजीला विशेष महत्त्व आहे.

कमळकाकडीची भाजी

# साहित्य - कमळकाकडी, मटार दाणे, कांदा, लसूण, हळद, टोमॅटो, खोबरे, गरम मसाला किंवा खडा मसाला, आले, कोथिंबीर, लाल मिरच्या, पुदिना, धने, मीठ

# कृती - कमळकाकडी चांगली सोलून घ्यावी. कुकर मध्ये कमळकाकडीच्या फोडी आणि मटार दाणे उकडून घ्यावेत. कमळकाकडी फार मऊ होऊ नये, यासाठी शिजवताना पाण्यात अर्धा चमचा मीठ घालावे. कांदा, खोबरे, धने, मिरच्या, खडा मसाला असल्यास तव्यावर तेल टाकून भाजून घ्यावा. तेल गरम करून त्यावर वाढलेला मसाला, हळद घालून सुगंध येई पर्यंत परतावे, मग त्यात शिजवलेली कमळकाकडी व मटार दाणे व चिरलेला टोमॅटो घालावा, नंतर चांगले परतून घ्यावे. मग कमळकाकडी शिजवून राहिलेले पाणी न फेकता भाजीत घालावे. नंतर मीठ व कोथिंबीर टाकून पाच मिनिटे मंद आचेवर शिजवावे.

कमळकाकडीची भाजी

# साहित्य - कमळकाकडी, तिखट, सुंठूपूड, बडीशेप, घुसळलेले दही, मीठ, तेल, जिरे, हिंग पावडर इ. 

# कृती - कमळकाकडी सोलून दोन इंची तुकडे करावेत. हे तुकडे तेलात तांबूस तळावेत. तेलात हिंग टाकून थोड्या पाण्यात तिखट, बडीशेप, सुंठ पूड मिसळून ते तेलात घालावे. जिरे व दही घालावे. उकळून त्यात मीठ व कमळकाकडीचे तुकडे घालावेत. मंद आचेवर शिजवावे. या पाककृतीस 'रोगनजोश' म्हणतात.

डॉ. मधुकर बाचूळकर

संदर्भ : विकासपीडिया/अ‍ॅग्रोवन

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या