रानभाजी अळू
शास्त्रीय नाव : कलोकेशिया एस्क्युलेंटा
कुळ : Araceae
इंग्लिश : Taro (टॅरो)
वृत्त एकसत्ता न्यूज
संग्रहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 8/82024 :
अळू ही मूळची रानभाजी. ती रानावनात आपोआप उगवते. अळूचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. मुंडले अळू, काळे अळू, झाडावर वाढणारे अळू, रान अळू असे अनेक प्रकार आहेत. काही जातींच्या अळूला खाज असते. ज्या अळूच्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात, ती पानं अळुवडीसाठी वापरतात.
फायद
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन 'ए' मुबलक प्रमाणात आढळते. सुमारे १००-२०० ग्रॅम अळू मधून व्हिटॅमिन-ए ची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते. अळू मध्ये १२०% व्हिटॅमिन-ए आढळते. यामुळे त्वचा सतेज होण्यास मदत होते. केवळ आंबट पदार्था मध्ये व्हिटॅमिन-सी आढळते हा समज दूर करून अळूचा आस्वाद घ्या. कारण अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी चा सुमारे ८०% साठा असतो. त्याचा फायदा जखम भरून निघण्यास होतो. तसेच हिरड्यांचे आरोग्य सुधारते. रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अॅनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळू मध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन-सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमता देखील सुधारते.
अळूच्या पानांच्या सेवनामुळे दृष्टी सुधारायला मदत होते. तसेच डोळ्यातील शुष्कपणाच्या समस्येवर फायदेशीर आहे.
अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम घटक आढळतात. त्याचा फायदा हाडांची कमजोरी कमी करण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते. कॅल्शियमची कमतरता भरून काढेल.
शरीरात वाढणारा ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस, फ्री रॅडीकल्सचा त्रास कमी करण्यास मदत करते. यामुळे अनेक घातक आजारा पासून बचाव होतो. अळूच्या पानांमधील आयोडीन घटक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.
अळूचा आहारात समावेश
अळूच्या पानांमध्ये फायबर घटक अधिक आणि कॅलरीज अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यामुळे हा अल्काईन स्वरूपाचा, थंड प्रवृत्तीचा आहे. यामुळे वजन घटवणार्यांच्या, मधूमेहींच्या आहारात फायदेशीर ठरते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास अत्यंत फायदेशीर आहे.
अळूच्या पानांमधून केवळ फायबरचा पुरवठा होतो. परंतू त्याच्या सोबतीला डाळीचा समवेश केल्यास प्रोटीन्सचा देखील पुरवठा होतो. त्यामुळे हे एक उत्तम आणि परिपूर्ण आहार बनते. अळूवडीत बेसनाचा समावेश असल्याने त्या अधिक रूचकर आणि आरोग्यदायी बनतात. परंतू अळूवडीचा उंडा वाफवल्या नंतर खाण्यास आरोग्यदायी आहे. अळूवडी प्रमाणेच त्याची पातळ भाजी बनवता येऊ शकते. यामध्ये अळूची पानं डाळी शिजवून त्याचा आहारात समावेश करावा.अळूला नैसर्गिकरित्या खाज असल्याने तो स्वच्छ आणि नीट साफ करणे आवश्यक आहे. तसेच अळू अपुरा शिजवल्यास पोटदुखीचा त्रास होतो, त्यामुळे तो योग्यरित्या शिजवा. युरिक अॅसिड अधिक प्रमाणात असलेल्यांनी अळू कमी खावा. तसेच काहींना अळूची अॅलर्जी असू शकते. त्यामुळे अळूवर ताव मारण्याआधी त्याची अॅलर्जी नाही याची खात्री करून घ्यावी.
अळूच्या पानांची वडी
साहित्य - अळुची पाने, बेसन, तेल, तिखट, मीठ, हळद,
कृती - सर्वात प्रथम बेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे. त्यामध्ये चवी नुसार तिखट, मिठ, हळद मिसळून घ्यावे. मळलेले बेसन पीठ अळूच्या प्रत्येक पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने एकावर एक ठेऊन गुंडाळून घ्यावे. नंतर आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून घ्याव्या. नंतर त्याचे बारीक तुकडे किवा वड्या करून तव्यावर तेलात तळून घ्यावे. अशा प्रकारे अळुच्या पानांची वडी तयार होईल.
अळुच्या पानांची भाजी
साहित्य - अळुची पाने, बेसन, तेल, जिरा, तिखट, मीठ, हळद, मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर # कृती - सर्वात प्रथम वेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळून घ्यावे. त्यामध्ये एक चमचा हळद व एक चमचा मिठ मिसळुन घ्यावे. मळलेले बेसन पीठ अळूच्या पानावर पसरवुन त्वरित अळूची पाने गुंडाळून घ्यावे. नंतर आळुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून नंतर तेलामध्ये तळून घ्यावे. नंतर त्याचे बारीक तुकडे करुन घ्यावे. नंतर भाजी करण्यासाठी एक पातेले घेऊन त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे तेल, जिरा, तिखट, गरम मसाला, कांदा टाकून तळून घ्यावे. नंतर त्यामध्ये आळूची तुकडे किंवा वड्या टाकुन शिजवुन घ्यावे. अशा प्रकारे अळूच्या पानांची भाजी तयार होईल.
अळूचं फदफदं
साहित्य - ७ ते ८ अळूची मध्यम पाने, ३ ते ४ टीस्पून शेंगदाणे, २ ते ३ टीस्पून चणा डाळ, ३ टीस्पून बेसन, १ टीस्पून चिंच, २ टीस्पून गोडा मसाला, २ टीस्पून गूळ, चवीपुरते मीठ.
फोडणी - १ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट.
कृती - शेंगदाणे आणि चणा डाळ किमान २ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर प्रेशर कुकर मध्ये १ किंवा २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. चिंच १/२ कप पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवावी. नंतर चिंच कुस्करून कोळ काढून घ्यावा. अळूची पाने धुवून पुसून घ्यावी. देठं वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. नंतर पानं बारीक चिरून घ्यावी. देठंही चिरून घ्यावीत. कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. १/२ टीस्पून मीठही घालावे. झाकण ठेवून ६ ते ७ मिनिटे शिजवावे. अळू जर कोरडा वाटत असेल तर थोडे पाणी शिंपडावे. चिंचेचा कोळ घालून अजून ३-४ मिनिटे शिजू द्यावे. १/२ कप पाण्यात २ टीस्पून बेसन गुठळी न होता मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण कढईत घालून ढवळावे. यात शिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे घालावे. गरजेनुसार थोडे पाणी घालावे. भाजी पळीवाढी करावी, प्रचंड घट्टही नको आणि पातळही नको. गोडा मसाला, गूळ, आणि लागल्यास मीठ घालून मिक्स करावे. बेसन शिजेस्तोवर उकळी काढावी. गरमागरम तूप भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावे.
टीप - अळूची पाने फोडणीला टाकून मग शिजवण्या ऐवजी आधी प्रेशर कुकर मध्ये शिजवली तरीही चालतात. चिरलेली पाने शिजवून मग फोडणीस टाकावी. पारंपारिक पद्धती नुसार या भाजीत आंबट चुका आणि मुळा घालतात. आवडत असल्यास १/४ ते १/२ कप बारीक चिरलेला आंबट चुका अळू बरोबरच फोडणीला टाकावा. याला चव फार आंबट असते त्यामुळे जर आंबट चुका वापरणार असाल तर चिंच घालू नये. आणि घातल्यास आधी चव पाहून मगच घालावी. तसेच १/२ मुळा बारीक चिरून फोडणीस घालावा. ओल्या नारळाच्या पातळ चकत्या शेंगादाण्या बरोबर घालाव्यात. तिखट, मीठ, गुळ, चिंच आणि गोड मसाला आवडी प्रमाणे कमी किंवा जास्त करावा. पण या भाजीला मसाले आणि आंबट गोडपणा थोडा पुढे असल्यास भाजी लज्जतदार लागते.
अळूच्या देठापासून देठी
अळूचे देठ सोलून त्याचे लहान तुकडे करावे. ते कुकर मध्ये वाफवून घ्यावेत. त्यानंतर ते थंड झाल्यावर हाताने कुस्करावे. त्यात गुळ, कांदा बारीक चिरून, हळद, मीठ, तिखट व दही घालावे. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून वाढावे. हा पदार्थ जेवणापूर्वी खूप आधी करून ठेवू नये.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या