संपादकीय........
गुरू म्हणजे कोण ?
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
मुंबई दिनांक 31 ऑगस्ट 2024 : 'गु' ह्या शब्दाचा अर्थ आहे अंध:कार व 'रु' चा अर्थ त्या अंध:काराला पुसून टाकणारा = प्रकाश! असा 'गुरूचा' अर्थ अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे शिष्यात असलेला अंध:कार दूर करणारा व त्याला ज्ञान देणारा म्हणजेच प्रकाश देणारा तो गुरू होय ! त्यालाच खर्या अर्थाने गुरू म्हणावा. गुरू म्हणजेच शास्त्रांचे अध्ययन व विचारांचे मनन करवीणारा होय. एकप्रकारे त्यांचे ते अमृतमंथनच होय. तो तपरूपी संपत्तीला एकत्रित करतो. गुरू हा आपल्या देवरूपी जीवनात जे अर्पित करतो ते सर्व आपल्या शिष्याला देऊन, त्याचे शरीर , मन , बुध्दी, आत्मा सर्वांना सशक्त, पुष्ट करतो. त्यांच्यात असलेले पशुतुल्य गुणधर्म ह्यांचा नायनाट करतो व हळूहळू मानवतेप्रत आणून पोहोचवतो. जीवनातला अंधार नाहीसा करून असा जीवनात प्रकाश आपल्या जीवनात करतो की त्यामुळे सारे जीवन सुखमय होते. गुरू आपल्याला संघर्ष करावयास शिकवतो. कठीण परिस्थितीला कसे सामोरे जायचे, परिस्थितीशी कसा संघर्ष करावयाचा इ. गोष्टी आत्मसात झाल्यावर सहजच शिष्य श्रेष्ठत्वाला पोहोचतो. गुरूच्या शिकवणी मुळे शिष्याचे अवगुण जाउन त्या ठिकाणी गुण आपोआपच तयार होतात. शिष्याच्या जीवनात श्रेष्ठतेचे बीज पेरल्यानंतर साहजिकच त्याला चांगली फळे चाखावयास मिळतात. हळूहळू शिष्यात शिष्टाचार आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहणे, तसेच उपजीविका करणे इत्यादी पासून तो ते जीवन निर्माण करेपर्यंतच्या सर्व प्रक्रियांतील उत्तमोत्तम मार्गदर्शन मिळते.
गुरू हा तप , त्याग, प्रेम, सेवा, लोभ नसणे, नि:स्वार्थीपणा , संयम, सदाचार आणि इंद्रियनिग्रह इ. ह्यांची साक्षात प्रतिमा आहे. आपल्याजवळ जे ज्ञानभांडार आहे ते सर्व शिष्याला देण्यातच गुरू समाधान व आनंद मानतात. शास्त्रे सुध्दा गुरूला ब्रह्मा- विष्णू - महेश मानून त्याचा गौरव करतात. आई-वडील मुलाला जन्म देतात, पालन-पोषण करतात. पण गुरू त्याला गुणांनी भूषवतो व संस्कार करतो. मनूने तर विद्द्येला आई व आचार्यांना वडील मानले आहे. त्याचप्रमाणे उपनिषदकार गुरूला देवाच्या ठिकाणी मानतात. देव तोच आहे, जो निरंतर देत राहतो आणि असा मार्ग दाखवतो की ज्यामुळे आयुष्यभर सर्व क्षेत्रात यश मिळत राहते. आपली प्रगती, आपला विकास हा नेहमी चांगल्या मार्गामुळेच होऊ शकतो, मार्ग कितीही खडतर असला, अडचणी कितीही आल्या तरी गुरूच्या सहवासामुळे यशोशिखरावर सहज पोहोचता येते. असा गुरू निश्चितच अभिनंदनाला पत्र असतो. त्याची पूजा का करू नये? त्याची पायाची धूळ आपल्या मस्तकी का लावू नये? ह्या सर्वांमुळे खरेतर आपण गुरूचे ऋणी असतो, नेहमी त्याच्याच सहवासात रहाणे आपण पसंत करतो व त्यातच धन्यता मानतो. त्याचे हे ऋण कधीही फिटू शकत नाही. महाभारतात आई वडिलांच्या पेक्षाही गुरूचे स्थान श्रेष्ठ मानले आहे. आईवडील मुलाला जन्म देतात तर गुरू शिष्यातील पुरूषार्थाला व अध्यात्माला जन्म देतात, त्याला संस्कार देतात. '
ब्रह्मविद्द्या उपनिषदात' म्हटले आहे की " गुरू जो आदेश देतो, त्याचे पालन शिष्याने बिनधास्त करावयास हरकत नाही. त्याचा विचार करण्याची गरजच नाही. गुरूची सेवा, शुश्रुषा करावी, म्हणजे कल्याण होते. मनूचे सुध्दा हेच सांगणे आहे की जे गुरूला आवडेल तेच करावे, त्याचे समाधानातच आपले सुख-समाधान सामावलेले असते. सर्वात श्रेष्ठ ' गुरुसेवा ' मानली आहे, त्याची आज्ञा हीच धर्म-आज्ञा समजून पा लावी सगळा . गुरू हाच वेद, गुरूच स्वर्गलोक व गुरूच आश्रयस्थान होय ! जी व्यक्ती गुरूच्या आज्ञेप्रति सावधान असते, त्याला तिन्ही लोकात यश प्राप्त होते. त्यालाच स्वर्गातही ईश्वराप्रमाणे प्रकाशित होता येते. गुरूच्या सन्मानात इतर धर्माचा सन्मान जुडलेला आहे, जीवनाच्या अखेर पर्यंत गुरूची सेवा करावी. माणसाचा मुख्य धर्म गुरुसेवा, कर्तव्यपालन आणि त्यांचा आदेश मानणे. बाकी सगळे उपधर्म मानले आहेत. आईवडिलांच्यापेक्षा गुरूचे स्थान श्रेष्ठ कसे ते मनू सांगतो " ब्रह्मज्ञान देणारा गुरू असतो. त्यामुळे तो आदराला पात्र असतो. उद्द्ययतारक उपनिषदात म्हटले आहे की गुरू हाच परब्रह्म, गुरू हाच परम गती , गुरू हीच परविद्द्या आहे. हाच परायण योग्य आहे, गुरू हीच पराकाष्ठा आहे. गुरू हाच परम-धर्म आहे. तो उपदेष्टा आहे. म्हणून श्रेष्ठांपेक्षा श्रेष्ठ गुरूच असतो ! गुरू हाच माणसातील पशुवृत्ती घालवतो व त्याला 'माणसात आणतो' . केवळ गुरूच्या ज्ञानामुळेच माणसाचे 'डोळे उघडतात'. जीवन-यात्रेत गुरू आपला मार्गदर्शक असतो. केवळ त्याच्यामुळे माणूस वाईट मार्गापासून वाचवला जातो. बरेच वेळा आपण बघतो की माणूस खूप आक्रमक होतो, त्याचे वागणेही पशुवत होते, ह्या सर्वाला गुरूच आवर घालतो. सदाचाराची दीक्षा तो देतो. बुध्दिचा विकास त्याच्यामुळे होतो. म्हणून आपण गुरूला देवत्व बहाल केले आहे. शिष्य गुरूच्या सहवासात असला तर त्याचे जीवन विकसित होते. शिष्य गुरुकडून सतत घेताच असतो. एकूण तो गुरूच्या ऋणातच कायम असतो.
आपण फक्त कृतज्ञता प्रदर्शित करू शकतो. असे जो करीत नाही तो एक प्रकारे मानवतेचा व सज्जनतेचा अपमान करतो. त्यामुळे अर्थातच तशा शिष्याची किंमत शून्यच ठरते. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूचा आदर करणे, मान देणे, हे महत्वाचे मानले आहे. आपला आत्मिक विकास करावयाचा असेल तर त्याला गुरूचे 'मार्गदर्शन' आवश्यक आहे, ज्या उद्देशाने तुम्ही साधना केली असेल. त्याची पूर्तता होण्यासाठी इतर गोष्टींप्रमाणे गुरुसुध्दा आवश्यक आहे. मात्र तो गुरुही तसाच हवा. म्हणून गुरू निवडताना सुध्दा हे बघणे जरूर आहे की तो 'गुरू' होण्यास लायक आहे किंवा नाही. त्याच्यात सर्व गुण आहेत का? आपल्या कार्यासाठी तो अनुकूल आहे का? त्याबाबत त्याला सगळी माहिती आहे? नाहीतर आपण गुरू निवडण्यात चुक केली अशी पश्चातापाची पाळी येईल ! म्हणून तो काळजी पूर्वक निवडावा.
अध्यात्म - मार्ग हा तर ह्या भौतिक अध्ययना पेक्षा भिन्न आहे. अध्यात्मात तुम्हाला गुरूची पावलो-पावली आवश्यकता किंवा मदत लागते. गुरू, आपल्या शिष्य खरा शिष्य व्हावा ह्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. त्याच्या चुका सुधारतो, त्याच्यातील दोष दाखवून देतो, व त्या सुधारण्यास मदत करतो, त्याला तणावपूर्ण वातावरणातून बाहेर काढतो. त्याचे अज्ञान दूर करतो. शिष्याचे हित गुरूला धरून ठेवण्यातच आहे. गुरूबद्दल आस्था मात्र मनापासून हवी. नुसता देखावा नको. गुरूचे चित्र घरात ठेवून त्याची पूजा केली पाहिजे, जेव्हा आपण ध्यान साधना करतो, त्यावेळेस गुरू आपल्या जवळच आहे असे वाटले पाहिजे.
गुरु: ब्रह्मा: गुरु: विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: | गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः || साभार अज्ञात!
0 टिप्पण्या