💢 बीज अंकुरे अंकुरे...!!!

 


डॉ.अभिजीत सोनवणे लिखित

जुलै महिन्याचा लेखाजोखा

💢 बीज अंकुरे अंकुरे...!!!

 वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

माझं सर्व बालपण सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड नावाच्या छोट्याशा खेडेगावात आजीच्या सहवासात गेलं. इथे घडलेल्या गमती - जमती, कथा - व्यथा आणि माझ्यावर झालेले भले-बुरे परिणाम; हे सर्व मी माझ्या पुस्तकात काहीही न लपवता मांडलं आहे. माझ्या आजीचं नाव लक्ष्मीबाई...!

नावाप्रमाणेच ती होती. कपाळावर जुन्या रुपयाच्या कॉइन एवढं भलं मोठं कुंकू, नाकात बांगडीला लाजवेल एवढी मोठी नथ, काठापदराचं लुगडं घालून ती अशी चालायची; जसा राज घराण्यातला हत्ती निघाला आहे...! 

म्हणायला अशिक्षित, पण व्यवहार चातुर्य PHD झालेल्या माणसाला लाजवेल असं ...तोंडानं फटकळ, पण मायेचा जिवंत झरा हृदयात घेऊन फिरायची... गावात जबरदस्त दरारा...! 

एके दिवशी तिकडे तिचे वडील वारले आणि इकडे माझा जन्म झाला... 

त्यावेळच्या भाबड्या कल्पनेनुसार, एका माऊलीने तिला सांगितले, 'आगं लक्साबया... रडु नगो बाये, पांडुरंगाचे पोटी तुजा बापच जलमाला आलाय...!'

पांडुरंग माझ्या वडिलांचे नाव... ! 

झालं, तेव्हापासून माझी आजी मला तिचा बापच समजायला लागली, आणि तेव्हापासून माझे विशेष लाड आणि कोड कौतुक सुरू झालं. 

अख्खा गाव तिला मामी म्हणायचा, तिला घाबरायचा.... पण तिच्या प्रेमाने लाडावलेला मी तिला लहानपणी "ए लक्षे" म्हणून हाक मारायचो.... आजीचे वडील तिला याच नावानं हाक मारायचे, नातू पण त्याच नावाने हाक मारतो, म्हणजे खरोखरच आपला बापच नातवाच्या रूपाने जन्माला आला आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं... ! 

तिचा "बाप" असण्याचा, मग पुढे मी पुरेपूर फायदा घेतला.करारी आणि कठोर बाई हि, परंतु कोणत्याही गरिबाच्या अडल्या नडल्या मदतीला ही सर्वात प्रथम पुढे येई. सर्वांनाच हिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. 

गावातल्या श्रीमंतापासून ते गरिबातल्या गरीब घरापर्यंत कोणाच्याही घरात ती डायरेक्ट घुसायची... घरात जिथे उंच जागा सापडेल तिथे ती पायावर पाय टाकून बसायची.... आणि इकडे तिकडे पहात, पदराची दोन टोकं हाताच्या चिमटीत पकडत, स्वतःला वारा घालत, घरातल्या लोकांची हजामत करायची. हतरून पांगरून आजुन काडली न्हाईत ? शेळ्याच्या लेंड्याच हित पडल्यात...घरच नीट सारवलं न्हायी...गाई म्हशीचं श्यान उचलायला का तुजा बा येणार हाय का ए...? सुना म्हशीवानी खाऊन फुगल्यात... ए टवळे डोक्याला त्याल लाव कि.... का तमाशात नाचायला जायचं हाय ? डोक्यावर पदुर घ्यायला तुज्या आईनं शिकावलं न्हाय का तुला, व्हय गं ए उंडगे...!

इतभर गजरा आणि गावभर नखरा...

तिची टकळी चालू असायची... तिच्या तावडीतून कुणीच सुटायचं नाही. येणारा जाणारा प्रत्येक जण तिची नजर चुकवून जायचा...! 

यावेळी मी तिचा पदर धरून, डाव्या हाताने चड्डी सावरत  शर्टाच्या उजव्या बाहीला शेंबूड पुसत सर्व काही पहात असे.

चड्डी माझ्या मापाची मला कधीच मिळाली नाही. 

थोडी मोटी दे... वाडतं वय हाय... अजून मोटी दे.... हांग आशी... म्हणत दुकानदाराला माझ्या चड्डीची ऑर्डर आजीच द्यायची...

डावा हात हा फक्त चड्डी सांभाळण्यासाठी असतो आणि उजवा हात शेंबूड पुसण्यासाठी... त्या वयात हाताचे इतकेच उपयोग मला माहित होते. 

तर सर्व उणीदुनी काढून झाल्यानंतर, पदरानं घाम पुसत, म्हातारी बिनदिक्कतपणे त्या घरात ऑर्डर सोडायची... ए टवळे, च्या टाक जरा मला... तुमाला आक्कल शिकवून दमले बया मी, तुमच्यापेक्षा गाडव बरं... 

वर तीच कांगावा करायची...! 

चहा येईपर्यंत, माझी नाकाची फुरफुर चालूच असायची... 

समद्या गावाचा शेंबूड तुलाच आलाय का काय मुडद्या ? असं म्हणत वैतागून उठत; ती मला दरा दरा ओढत घराबाहेर नेत, माझं नाक पदरात धरून असं शिंकरायची, की मृत्यु परवडला.... ! 

अजून थोडा जोर लावला असता, तर तीने माझा मेंदूच बाहेर काढला असता...

तुजं आसं हाय, शेंबूड आपल्या नाकाला, आन् रुमाल देतंय लोकाला... असं स्वतःशी पुटपुटत, मला कडेवर घेऊन ती परत घरात यायची. 

यानंतर कान नसलेल्या, फुटक्या कपात, किंवा चार ठिकाणी चेंबलेल्या फुलपात्रात चहा यायचा. बऱ्याच वेळा जर्मन च्या "भगुल्यात" च्या यायचा... बशी नसली तर...  आम्ही मग हा "च्या" गोल ताटात भरून भुरके मारत प्यायचो... आज जाणवतं, हा खऱ्या अर्थाने सोहळा होता...!!! 

आता कुठे आहे हे फुलपात्र ?  ते जर्मनचं भांडं आणि तो कान नसलेला फुटका कप ??? 

मी शोधतोय ...! 

आईच पात्र हरवलं... हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो, हे फुलपात्र... ते जर्मन चे भांडं आणि कान नसलेला फुटका कप सुद्धा तसाच हरवलाय... ! 

माणसं शिकत गेली आणि या जुन्या गोष्टी पुस्तकाच्या पानात दबून गेल्या... आठवण म्हणून  ठेवलेल्या पिंपळाच्या जाळीदार पानासारख्या...! 

आता या गोष्टी दिसतात फक्त जुन्या बाजाराच्या दुकानात... नाहीतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी घेऊन, अंताकडे वाटचाल करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या मनात...!!!

तर; बऱ्याच वेळा फुलपात्रातून किंवा फुटलेल्या कपातून, बशीत चहा सांडेस्तोवर दिला जायचा... 

फुलपात्र आणि कप सोडून बशी सुद्धा चहानं भरलेली असायची... !

डाव्या हाताने चड्डी, उजव्या हाताने नाक सांभाळताना.... मला चहा प्यायलाच जमायचं नाही, मग माझी म्हातारी एक घोट स्वतः प्यायची,  एक घोट मला पाजायची... ! 

हा चहा पिताना, माझ्या घशातून घुटुक घुटुक आवाज येत असावा... मला माहित नाही. 

पण यातही माझ्या आजीला कौतुक... 

बगा गं बायांनो, "माजा बाप" कसा घुटुक घुटुक च्या पितो, तुमाला दावते... म्हणत ती अजून चार फुलपात्रे नाक दाबून मला चहा पाजायची... 

पुढे डोक्यावरून पाणी गेलं... 

रडत खडत शिकलो.... त्यानंतर मोठ्या मुश्किलीने डॉक्टर झालो... पुढच्या खाचखळग्यातून वाटा काढत चालत राहिलो... 

आयुष्यातली सगळी पानीपते हरलो... 

तरीही पुढे कष्ट करून मनातला "विश्वासराव" जिवंत ठेवला... ! 

आयुष्याच्या एका टप्प्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला लागलो... आर्थिक स्थैर्य आलं.

मग अनेक उच्चभ्रू लोकांशी / ऑफिसशी संपर्क येऊ लागला. 

सुरुवातीला...  "खेड्यातनं आलंय येडं, आन भज्याला म्हनतंय पेडं ...." अशी माझी अवस्था होती. 

खेड्यातला येडा मी....  तिथले मॅनर्स आणि एटिकेट्स शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. 

चकचकीत आणि महागड्या कपांमध्ये चहा मिळू लागला... 

भल्या मोठ्या कपामध्ये / मगमध्ये सांडणार नाही, अशा पद्धतीने निम्माच चहा किंवा कॉफी असायची... ! 

पुढे मी सरावलो... 

एकदा हि माझी खडूस म्हातारी... बऱ्याच वर्षांनी माझ्या घरी आली.... 

आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्राचा प्रमुख मी.... 

तिला एका मोठ्या पांढऱ्या स्वच्छ कपामध्ये मी तिला चहा दिला... 

कपाला सोन्याचीच वाटावी, अशी सोनेरी रंगाची नक्षी होती...

शिकलेले मॅनर्स सांभाळत, भल्या मोठ्या कपामध्ये; सांडणार नाही अशा पद्धतीने तिला निम्मा चहा दिला होता. 

विहिरीत वाकून बघावं, तसं तीनं कपात वाकून बघितलं... 

कपातला अर्धा चहा बघून ती खवळली.... तिच्या स्वभावानुसार ती बोलली.... 'येवडासा च्या ? ल्हान पोरगं हेच्यापेक्षा जास्त मुततंय... तू कंनच्या कंपनीत काम करतूय रं... ?  सायबाला म्हणावं पाच धा रुपय पगार जास्त दे... घरात आलेल्या पावण्यांना कप भरून च्या पाजू दे...!'

पाच लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या तोंडात माझ्याच म्हातारीने सणसणीत चपराक हाणली. 

मलाही राग आला, गावाकडे चेंबलेल्या फुलपात्रात आणि फुटक्या कपात च्या पिणारी माजी म्हातारी, आज इतक्या मोठ्या, सुंदर सोनेरी नक्षीच्या कपात चहा पीत आहे,  नातवाचं हिला काहीच कौतुक नाही...??? 

मी तिला हे बोलून दाखवलं. 

यावर जोरदार पलटवार करत म्हातारी म्हणाली, ' गप ए शेंबड्या... तूजा कप किती छोटा हाय, का मोटा हाय.... त्याला सोन्याची का चांदीची नक्षी हाय, त्याला किंमत नसती... या कपातून तू काय देतू, किती देतू, कोनच्या भावनेनं देतू त्याला जास्त किंमत आसती...!' 

आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये दरवर्षी "मॅनेजमेंट" या विषयावर किमान चार सेमिनार असतात... असे मागील दहा वर्षात मिळून मी 40 सेमिनार अटेंड केले असतील... 

तू काय देतो, किती देतो, कोणत्या भावनेनं देतो त्याला जास्त किंमत असते... !

सेमिनार मध्ये किती कळलं मला माहित नाही... पण माझ्या म्हातारीने दोन मिनिटात मॅनेजमेंटचं सर्व सार सांगितलं...!

हातातला कप माझ्या हातातच राहिला... तिच्याकडे भारावून मी पाहत राहिलो... "कपावरची" सोनेरी नक्षी आता तिच्या "कपाळावर" उमटलेली मला भासली... !!! 

*गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची...!!!

'ए चेंगट बेण्या...  माजा कप आक्का भर... बशीत च्या सांडला पायजे बग...' 

तिच्या या वाक्याने मी भानावर आलो आणि बशीत सांडेस्तोवर च्या तिच्या कपात "वतला". 

समाधानाने तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हसल्या.

यानंतर बशीत सांडलेला चहा तिने घरातल्या तुळशी वृंदावनाच्या मातीत टाकला, थोडा चहा एका प्लेटमध्ये टाकून ती प्लेट तीने घराबाहेर ठेवली. 

आता कपात पुन्हा निम्माच चहा उरला. 

हा निम्मा चहा तिने बशीत ओतून समाधानानं भुरके मारत पिला.

म्हातारीला मी पुन्हा वैतागून म्हणालो, 'म्हातारे, मी तुला आधी कपात निम्माच चहा दिला होता,  तू इकडे तिकडे ओतून निम्माच चहा पिलास.... मग मला मघाशी संपूर्ण कप सांडेपर्यंत का भरायला लावलास ?' 

यावेळी ती, न चिडता भावुक होत म्हणाली... *'माज्या बाळा, आपून इतकं कमवायचं... इतकं कमवायचं... की ते सांडून कपाभायेर येऊन बशीत पडलं पायजे... पन बशीत जे पडंल त्ये मात्र आपलं नसतंय... त्ये आस्तय प्राणी, पक्षी, गुरांचं... त्ये त्यांना वाहायचं...' 

'द्येव आपल्याला कप भरून देतो, पण म्हनुन आपुन अख्खा कप प्यायचा नसतो.... निम्मा कप समाजातल्या गोरगरिबांसाटी आसतो... निम्म्या कपाचं दान तिथं करायचं आस्तय बबड्या...'*

माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत तिनं माणुसकीची व्याख्या सांगितली. 

कुठं गं शिकलीस हि जगण्या आणि जगवण्याची कला.... ??? 

माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले... 

मला तिचे पाय धरायचे होते... 

पण मला हे नक्की माहीत होतं, की मी तीचे पाय धरताना; पाठीत धपाटा घालून ती मला म्हणेल, ' न्हाई भजं खायाला मी तुला आट आनं द्येनार न्हाई हां मुडद्या, लय नाटकं नगों करुस...' 

पाच लाख दरमहा कमावणारा मी.... 

तरीही आज "भजं खायाला" माझ्याकडे आठ आणे नाहीत... गरीब कोण...?  श्रीमंत कोण... ?

माझ्याकडे पैसा होता; पण तिच्याकडे लक्ष्मी...!!! 

*गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची...!!!

एकदा ती मला म्हणाली होती, 'मेल्यावर बिन बोलवता बी "खांदा" द्यायला समदं गाव जमतंय,  पन भुकेजलेल्या जित्त्या माणसाला आणि जनावराला आपल्या जवळची कोरभर भाकर आणि "कांदा" कुनी देत न्हाय... '

खांदा दिवून पुन्य मिळवन्या पेक्षा... 

जित्या मानसाला "भाकर आनं कांदा" दीवून पुन्य मिळव 

आपल्याला दगडातला द्येव् व्हायचाच न्हायी ...चालता बोलता मानुस व्हयाचं हाय...! 

आंतरराष्ट्रीय संस्थेचा प्रमुख मी... Management आणि Humanity या विषयावर माझ्याकडे पारितोषिके आहेत. Doctor for Beggars या कामामध्ये मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकूण 3000 पेक्षा जास्त पुरस्कार आहेत. 

माझे हे सर्व पुरस्कार आणि पारितोषिके एका पारड्यात.... आणि माझ्या म्हातारीचे विचार एका पारड्यात.... ! 

कसं कोण जाणे... पण तीचंच पारडं खाली जातं... ! 

तिच्या विचारांचं वजन नेहमीच जास्त भरायचं. 

"ओझं" "भार" आणि "बोजा" हे; वरवर "वजन" या शब्दाचे समानार्थी शब्द वाटतात. खरंतर तिघांचेही अर्थ वेगळे आहेत. 

*मनाविरुद्ध अंगावर पडतं ते ओझं...नाईलाजाने वाहिला जातो तो भार...इच्छा नसतानाही लादला जातो तो बोजा...पण, मनापासून आणि आनंदाने खांद्यावर वागवलं जातं ते वजन...! 

माझी अशिक्षित म्हातारी, विचारांचं धन डोक्यावर घेऊन... खऱ्या अर्थाने लक्ष्मी होते...

आणि, इतकं सर्व मिळवून माझी झोळी रिक्त राहते.... आणि हातात काही नसून, माझी म्हातारीच श्रीमंत होऊन जाते...!!! 

अशीच एकदा ती मला म्हणाली होती, 'नारळाच्या झाडागत बोंबलत उच्च नगो होवूस... शेळ्या मेंढ्या ह्यांच्या तोंडाला तुजी पानं लागून त्यांची भूक भागंल, असं दोन फुटाचं बुटकं झाड हो...' "दुसऱ्यासाटी तू किती झुकतोस, यावर आपली उंची ठरत्ये माज्या सोन्या..." 

तिची ही वाक्ये ऐकून माझ्या अंगावर शहारे आले होते... ! 

डाव्या हाताने मग मी चड्डी सांभाळत, उजव्या हाताने नाकाचा शेंबूड पुसत... मी पुन्हा लहान होतो आणि पुन्हा तिच्या पदराखाली जातो... पुन्हा पुन्हा तिच्या पदराखाली जातो... 

आणि दरवेळी हा पदर मला माणुसकीच्या रस्त्यावर घेऊन येतो, एखाद्या दिशादर्शकासारखा ...!!! 

तिच्या फाटक्या पदराची हि पताका;  हेच माझं भरजरी वस्त्र आहे...!!!

*गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची...!!!

ती जायच्या अगोदर काही दिवस मला म्हणाली होती... 'खेड्यातली ल्वोकं फुलपात्रातून च्या देत्यात यात तुला गावंडळपना वाटतू ना ... ?' 

मी खाली मान घालून गप्प बसलो. 

यावर तिने तिच्या भाषेत, फुलपात्र या शब्दाचा व्यापक अर्थ सांगितला तो असा...

प्रत्येकाजवळ स्वतःचं असं एक भांडं... एक पात्र असतं. हे पात्र कधी रिकामं असतं... तर कधी भरलेलं असतं. ज्याच्याकडे हे रिकामं पात्र असतं त्याला हिणवू नये कधीच... कदाचीत स्वतः कडचं सर्वस्व पोरा बाळांना देऊन माघारी फिरला असेल तो... कधी आई होऊन... कधी बाप होऊन... आई बापाचं भांडं दिसायला रिकामं दिसलं तरी ते पात्र कायम Full च असतं...!आपल्या ताटातली भाकरी जेव्हा आपण दुसऱ्याला देतो... तेंव्हा दिसायला ताट रिकामं दिसतं... पण खऱ्या अर्थाने ते तेव्हाच भरलेलं असतं... आणि तुमचं पात्र आपोआप Full होतं. घेण्यात आनंद आहे बाळा... पण देण्यात समाधान...! 

आपण घ्यायचं सुद्धा असतं आणि द्यायचं सुद्धा...

कधीतरी एखाद्याची भूक उसनी घेऊन, त्याच्या चेहऱ्यावरचा "आनंद" आपण घ्यायचा... आणि त्याला भाकर देऊन, आपल्या मनातलं "समाधान", त्याच्या मुखात ठेवायचं....! 

'हितं तुजं भांडं रिकामं दिसंल... पन तवाच तुजं पात्र Full होतंय गड्या...!' 

*गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची...!!!

खाटेवर  पडलेल्या आजीचे क्षीण झालेले, सुरकुतलेले हात मी माझ्या दोन्ही हातात घेतले... 

या हातांवर आपोआप अश्रूंचा पाऊस झाला... आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भेगाळलेल्या जमिनीवर, एक अंकुर उगवून आला.... "डॉक्टर फॉर बेगर्स...!!!"

माझी हि आजी... "लक्ष्मी" होऊन माझ्या पदरात आली... अक्षय विचारांचे धन देऊन मला श्रीमंत बनवून; अक्षय होऊन गेली... ! 

ती गेली तो दिवस होता "अक्षय तृतीया".... हा योगायोग नक्कीच नव्हता...!!!

ती माझं पात्र... फुल्ल करून गेली... अक्षय्य करून गेली...! 

आता चेंबलेलं का असेना... जुनं का असेना... फुटकळ का असेना... पण हेच "फुलपात्र"; मी रोज याचकांच्या चरणी रीतं करतो... 

परतताना मात्र माझं हे पात्र तुम्ही सर्वजण पुन्हा Full करता... परत परत Full करता...

आणि Full झालेलं हे "फुलपात्र"; मी जपून ठेवतो, दरिद्री नारायणाची उद्याची पूजा मांडण्यासाठी... !!! 

आणि म्हणून आजचा हा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर !


या महिन्यात झालेल्या कामाचा आढावा आता विस्तृत सांगत नाही... 

फक्त इतकंच सांगेन, या महिन्यात जे अंध, अपंग - विकलांग, भिक मागणारे लोक सापडले, अशांना हातगाडी, वजन काटे, कापडी पिशव्या विकायला देऊन, छोटे छोटे व्यवसाय काढून देऊन व्यवसायाचं एक साधन त्यांच्या चरणी अर्पण केलं आहे... हाच मी वाहिलेला नैवेद्य... ! 

भीक मागणाऱ्या पालकांची मुलं किंवा खुद्द भीक मागणारी मुलं, यांना एकत्र करून सॉक्स बुट आणि युनिफॉर्म पासून शाळा कॉलेजेच्या त्यांच्या फिया भरल्या आहेत. 15 जुलैला जेव्हा ही मुलं दप्तर - रेनकोट घेऊन शाळेत निघाली, त्यावेळी मला त्यांच्यात, आयुष्यातला "विठ्ठल" शोधायला निघालेला वारकरी दिसला...

इथेच झाली माझी वारी, 

आणि म्हणून विठ्ठला मी आलोच नाही  पंढरपुरी...!!

रस्त्यावरील याचकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा दिल्या, रस्त्यावर जे जमत नाही अशा गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. 

आषाढी एकादशीला पंढरपुरात हातातले टाळ तिकडे दुमदुमत होते... मला इथे ते आजारी याचकांच्या धडधडणाऱ्या हृदयात ऐकायला आले... माझा स्तेथोस्कोप आज टाळ झाला ...! 

काय गंमत आहे पहा, "वि-ठ्ठ-ल" नाम स्मरण हे हृदयाशी निगडित आहे... शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या नामस्मरणास "विठ्ठल क्रिया" असं म्हटलं जातं. 

पंढरीच्या राजा, आम्ही इथेच बसून रोज "विठ्ठल क्रिया" केली...! 

"हात हे उगारण्यासाठी नाही... उभारण्यासाठी असतात..." हे ज्या वृद्ध याचकांनी मला रस्त्यावर शिकवलं, मी त्यांनाच गुरु मानुन त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो... ! 

त्यांच्या विचारांच्या उजेडात, माझी प्रत्येक अंधारी रात्र मग "पौर्णिमा" झाली...!

आज खूप वर्षांनी विचार करतो.... भिकाऱ्यांच्या डॉक्टर /भिक्षेकर्‍यांचा डॉक्टर/डॉक्टर फॉर बेगर्स... याचं बीज नेमकं आहे कशात... ?

खडकाळ जमिनीत सुद्धा तृण उगवतं... कुणीही बीज न रोवता बांधावर एखादं बाभळीचं / रानफुलाचं झाड उगवतं... याला ना खत लागत ना मशागत... तरीही ते फोफावतं... सावली देण्याची त्याची पात्रता नसेलही, पण शेळ्या मेंढ्यांचं खाद्य होण्यात ते धन्यता मानतं...!

खडकाळ ... भेगाळ का असेना .... पण माझी म्हातारीच माझी जमीन झाली...

आणि माझं बीज इथेच अंकुरलं...

माझ्याच म्हातारीच्या भाषेत सांगायचं तर; मला अफाट, पण खारट समुद्र व्हायचंच नाही... मला व्हायचंय एक छोटंसं, पण गोड पाण्याचं तळं... जिथं कोणाची तरी तहान भागेल... शेतकऱ्याचं बीज पिकेल...! 

त्यावेळी माझ्या थेंबा थेंबाने गाणं म्हणावं.... बीज अंकुरे अंकुरे...!!!

३१ जुलै २०२४

डॉ.अभिजीत सोनवणे 

डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे 

9822267357

sohamtrust2014@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या