रानभाजी - बहावा
शास्त्रीय नाव : Cassia fistula
कुळ : Caesalpinaceae
मराठी नाव : बहावा, कर्णिकार
इंग्रजी नाव : Labernum
हिंदी नाव : अमलतास
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क / वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/8//2024 : बहावाचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात.
वर्णन
बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो. बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्या सारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो. बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात. फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते.
उपयोग
# कर्णिकाराच्या मोठ्या खोडा पासून इमारती लाकूड मिळते.
# बहाव्याची साल कातडे कमावण्याच्या उपयोगी आहे.
# शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.
# जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन तीन दिवस रोज सकाळी १५ ते २० मिलीलिटर तूप देऊन तिसऱ्या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध (बहावा/अमलताश) मगज १५ ते २० ग्रॅम पाण्या बरोबर देतात. आरग्वधाचा मगज हा पदार्थ गाभुळेल्या चिंचे सारखा असतो. त्याच्या सेवनामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.
पाककृती
# साहित्य- बहाव्याची फुले, कांदे २ मध्यम आकाराचे, लसूण ४-५ पाकळ्या, हिरव्या मिरच्या २, मोहरी १ लहान चमचा, हिंग पाव चमचा, हळद १ लहान चमचा, लाल तिखट १ लहान चमचा, मीठ चवीनुसार, बेसन २ चमचे.
# कृती- बहाव्याच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून २ पाण्यातून धुवून घ्या व निथळत ठेवा. कांदा उभा चिरून घ्या. लसूण ठेचून घ्या. कढईत तेल गरम करून हिंग मोहरीची फोडणी करा. त्यात ठेचलेला लसूण घालून खरपूस होऊ द्या. आता कांदा घालून गुलाबीसर होऊ द्या. हळद, लाल तिखट घाला. त्यात बहाव्याच्या पाकळ्या घालून परतून घ्या. त्यानुसार नंतर मीठ घाला. २ चमचे बेसन लावून झाकण ठेवा आणि ५ मिनिटे दणदणीत वाफेवर शिजवून घ्या. बहाव्याची भाजी तयार आहे. वर कोथिंबीर पेरून भाकरी सोबत खा.
सौजन्य : लेट्स अप/विकिपीडिया
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या