रानभाजी - चिघळ


वृत्त एकसत्ता 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे,

मुंबई दिनांक 3ऑगस्ट24.

*शास्त्रीय नाव :  पॉरच्युलिका कॉड्रीफिडा

*कुळ : पॉरच्युलिकेसी

*स्थानिक नावे: चिघळ, घोळ

*इंगजी नाव : चिकन वीड

या वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्या पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला 'चिकन वीड' असे इंग्रजीत म्हणतात. ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिघळ कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वाढते. ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही वनस्पती अगदी नाजूक असून खोडांचा, फांद्यांचा व पानांचा आकार लहान असतो.

खोड - नाजूक, मांसल, पसरणारे, पेरांवर बारीक केसांचे वलय, पेरांपासून तंतूमय मुळे फुटतात.

फांद्या - अनेक, जमिनीवर सर्वत्र पसरणाऱ्या, मांसल पण नाजूक असतात.

पाने - साधी, समोरासमोर, ०.४ ते ०.६ सेंमी लांब, लंबगोलाकार, मांसल जाडसर. देठ अगदी लहान, फुले द्विलिंगी, नियमित, पिवळ्या रंगाची, फांद्यांच्या टोकांवर एकांडी येतात.

फुले - फुलांच्या सभोवताली चार पाने असतात. फुलांचे देठ अगदी लहान. पुष्पमुकुट दोन दलांचा, पाकळ्या चार. पुंकेसर आठ. बीजांडकोष एक कप्पी, परागवाहिनी एक. टोकाकडे चार विभागी.

फळे - लहान. ०.३ ते ०.४ सेमी लांब, कोनाकृती. बिया असंख्य, लहान, गोलाकार, काळसर तपकिरी रंगाच्या, खडबडीत. या वनस्पतीला नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत फुले येतात.

औषधी गुणधर्म

◆चिघळ या वनस्पतीच्या बिया मूत्रपिंड आणि बस्ती यांच्या रोगात वापरतात.

◆चिघळीच्या बिया स्नेहन आणि मूत्रजनन गुणधर्माच्या आहेत. बियांच्या फांटामुळे लघवीचे प्रमाण वाढते.

◆दातांतून, कफातून तसेच लघवीतून रक्त जात असल्यास ते बंद करण्यास चिघळीचा रस देतात.

◆मार लागल्यास, ठेच लागल्यास दाह आणि सूज कमी करण्यासाठी ही वनस्पती वाटून त्यावर बांधतात.

◆चिघळ ही वनस्पती मूळव्याधीवर गुणकारी आहे.

◆चिघळची भाजी शीतल, ग्राही, शोथहर आणि रक्तशुद्धी करणारी आहे.

◆रक्तपित्तात ही भाजी प्रशस्त तर ज्वरात पथ्यकर आहे.

◆चिघळची भाजी शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.

◆लघवीची, हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ चिघळच्या भाजीने कमी होते.

◆चिघळ वनस्पती मध्ये मज्जासंस्थेवर प्रभावी कार्य करणारे; तसेच कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असल्याचे अलीकडील संशोधनावरून सिद्ध झाले आहे.

पाककृती

◆साहित्य - चिघळीची भाजी, डाळीचे पीठ, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, लसूण, हिरव्या मिरच्या इत्यादी. 

◆कृती - भाजी स्वच्छ निवडून, धुऊन, बारीक चिरून घ्यावी. कढईत तेल गरम करून फोडणी करून घ्यावी. मिरच्यांचे तुकडे करून फोडणीतच टाकावेत. नंतर त्यात चिरलेली भाजी घालावी. चवीपुरते मीठ घालून दोन मिनिटे परतून घ्यावी. ही भाजी पटकन शिजते. नंतर त्यावर डाळीचे पीठ हळूहळू भुरभुरत एकीकडे हलवत गुठळ्या न होता पेरावे. ही भाजी पटकन शिजून हलकी व मोकळी होते. काही वेळा फोडणीत लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. यामुळे भाजीला चांगला स्वाद येतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या