रानभाजी - कवठ

 

रानभाजी - कवठ  

शास्त्रीय नाव : फेरोनिया एलेफंटम

कुळ : रूटेसी

इंग्रजी : अ‍ॅपल फ्रुट, कर्ड फ्रूट, मंकी फ्रूट

वृत्त एकसत्ता न्यूज

संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भा. नायकुडे

मुंबई दिनांक 23 ऑगस्ट 2024 : कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष रूटेसी कुलातील असून फेरोनिया एलेफंटम या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. याचा प्रसार मुख्यत्वे आशिया मध्ये पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, म्यानमार, जावा इ. प्रदेशांत आहे. या काटेरी व पानझडी वृक्षाचे मूलस्थान दक्षिण भारत आहे. कवठाचे झाड ६-९ मीटर उंच वाढते. खोडाची साल पांढरट हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते. पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. दले ३-९, समोरासमोर, बिनदेठांची, अखंड व गोल टोकाची असून उन्हाळ्यात गळून पडतात. फुले लहान, फिकट लाल व आखूड देठांची असून फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर येतात. फुलांचा हंगाम फेब्रुवारी एप्रिल असून फळे २-३ महिन्या नंतर तयार होतात. घनकवची (कठिण सालीचे) मृदुफळ ५-७ सेंमी व्यासाचे मोठे, गोल, कठिण व करड्या रंगाचे असते. मगजामध्ये भरपूर बिया असतात. बिया लांबट व दबलेल्या असतात. फळातील मगज आंबटगोड व खाद्य असतो. मगज स्तंभक, उत्तेजक व दीपक असून पोटाच्या तक्रारीवर गुणकारी आहे. याची चटणी, बर्फी, मुरंबा व सरबत करतात. विषारी कीटकदंशावर बाहेरून लेप लावतात. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते; तसेच ती कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो. झाडातून पाझरणारा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. त्यापासून चित्रकाराचे जलरंग व इतर रंग-रोगणे तयार करता येतात. लाकूड करडे पांढरे किंवा पिवळसर, कठिण, मजबूत आणि टिकाऊ आहे. त्याचा उपयोग घरबांधणी तसेच तेलाचे घाणे, चाकाचे आरे व शेतीची अवजारे तयार करण्यासाठी होतो. फळाच्या कठिण कवचापासून शोभिवंत वस्तू बनवितात.

संदर्भ : मराठी विश्वकोश/राजा ढेपे

औषधी उपयोग

# पित्ताचे शमन होण्यासाठी कवठाचा मगज साखर घालून द्यावा.# अंगावर पित्तामूळे गांधी येतात त्यावर कवठाचा पाला बारीक वाटून त्याचा रस लावावा. किंवा वाटलेल्या पाल्यात दही घालून प्यावा. याने अर्ध्या तासात गांधी जातात. # तोंड बेचव पडल्यास कवठाच्या गरात सुंठ, मिरी, पिंपळी घालून ते मिश्रण मध व साखरेशी खावे. # उचकी व दम्यावर कवठाचा अंगरस, मध, पिंपळी या बरोबर द्यावा. # प्रदररोगात कवठ व वेळू यांचा समान पाला वाटून ती चटणी मधा सोबत खावी. # काविळीवर कवठाच्या पाल्याचा रस गाईचे दूध घालून रोज एकवेळ ५० मि.ग्रॅम खावा. # धातूपुष्टीसाठी कवठाच्या पाल्याचे चूर्ण दूधात खडीसाखर घालून द्यावे.

कवठाची चटणी

# साहित्य - कच्चे कवठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, तीळ.

# कृती - कवठातील गर चमच्याने काढून, बारीक लगदा करावा. नंतर पातेले घेऊन त्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, तीळ टाकून परतून घ्यावे. नंतर त्यात कवठाचा गर टाकून शिजू द्यावे. अशा प्रकारे कवठाची चटणी तयार होईल.

कवठाचे आंबील

# साहित्य - पिकलेले भरीव कवठ, कोथींबीर, लाल मिरचीची पावडर, जिरे, गुळ, भाजलेल्या शेंगदाण्याचे टरफल काढून कुट, मीठ, तेल.

# कृती - कवठाचा गर चमच्याने काढून घ्यावा. गुळ बारीक करून घ्यावा. मिक्सर मधे आधी कवठाचा गर घालावा. त्यात कोथींबीर, चिरलेला गुळ, मीठ, दाण्याचे कुट, तिखट घालावे. मिश्रण रवाळ वाटून घ्यावे. गॅसवर मातिचे भांडे किंवा कढई ठेवावे. त्यात तेल तापवून आधी जिरे घालावे. जिरे नीट तळल्या गेले की त्यात मिस्कर मधील वाटण घालावे आणि मिक्सर मधे एक ग्लासभर पाणी घालून विसळून तेच पाणी पातेल्यात ओतावे. पळीने सर्वकाही एकजीन करावे. वाढताना थोडी कोंथींबीर चुरडून आंबील वाढावे. हे आंबील छान दाट होईल. हाच प्रकार थंडीच्या दिवसामधे तिळ घालून करावा कारण तिळ उष्ण असतात.

कवठाचा वड्या

# साहित्य - कवठाचा गर, अर्धा कप दूध, दोन वाट्या नारळाचा खव, दोन वाट्या साखर, पाव वाटी पिठीसाखर.

# कृती - कवठाचा गर काढुन घ्यावा. त्यात अर्धा कप दूध मिसळुन घ्यावे. त्यातल्या बिया मोडल्या जातील पण अगदी वस्त्रगाळ होणार नाही अशा बेताने मिक्सर मधे वाटून घ्यावे. तयार झालेल्या मिश्रणाच्या समप्रमाणात प्रत्येकी नारळाचा खव आणि साखर घ्यावे. हे सर्व एकत्र करुन कढईत मध्यम आचेवर ठेवावे. एकसारखे हलवत आटवावे. शेवटी मंद आचेवर ठेवावे. घट्ट गोळा तयार झाला की तुपाचा हात लावलेल्या ताटात वड्या थापाव्यात. वरुन शोभेसाठी पिठीसाखर भुरभुरावी.

कवठाचे पंचामृत

# साहित्य - पिकलेल्या कवठाचा गर दीड वाटी, गुळ चिरून दीड वाटी, खोबरे कीस ३-४ वाटी, शेंगदाणे कुट १ टेबलस्पून, तेल १ टेबलस्पून, ३ हिरवी मिरची चिरून, हिंग पाव टीस्पून, तिखट १ टीस्पून, मीठ १ टीस्पून, मोहरी पाव टीस्पून, मेथी दाणे.

# कृती - कवठाचा गर, गुळ, खोबरे कीस, शेंगदाणे हे एकत्र करून, मिक्सर मध्ये वाटून घ्या. वाटताना एक वाटी पाणी घाला. कढईत तेल तापवून, मोहरी, मेथी घालून फोडणी करा. हिंग, हिरवी मिरचीचे तुकडे व हळद घालून, वाटलेले मिश्रण घालावे. मंद आचेवर ३-४ मिनिटे परतून घ्यावे, २ वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर दाट होई पर्यंत शिजवून घ्या. अधून मधून चमच्याने मिश्रण ढवळत राहा म्हणजे तळाला लागणार नाही. फ्रिज मध्ये चार पाच दिवस टिकते.

संदर्भ : इंटरनेट

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या