'जगण्यासाठी गावोगाव भटकंती करत, खडतर संघर्षातून आयुष्याची वाट शोधणारा जिद्दीनं केलेला प्रवास'-- 'तानाजी धरणे' यांची कादंबरी हेलपाटा

 पुस्तक परीक्षण.......✍️


'जगण्यासाठी गावोगाव भटकंती करत, खडतर संघर्षातून आयुष्याची वाट शोधणारा जिद्दीनं केलेला प्रवास'-- 

'तानाजी धरणे' यांची कादंबरी

हेलपाटा

वृत्त एकसत्ता न्यूज /अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 24 ऑगस्ट 2024 : लेखक 'तानाजी धरणे' यांचा माझा प्रत्यक्ष परिचय नाही, समोरासमोर कधी भेट नाही. पण त्यांच्या 'हेलपाटा' या कादंबरीतून ते मला भेटले, उलगडत गेले, आणि आयुष्याच्या वाटेवर एक सहप्रवासी सोबत असल्याची अनुभूती आली.

'हेलपाटा' ही अस्सल जीवनानुभव असलेली कादंबरी/ आत्मकथा आहे.

परिस्थितीशी सातत्यानं केलेला हा संघर्ष आहे. अनिश्चित वर्तमानातून निश्चित भवितव्याकडे केलेलं कष्टप्रद मार्गक्रमण आहे. 

आपल्या आई-वडिलांची (बाई आणि भाऊंची) स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंब जगवण्यासाठी गावोगावची ही भटकंती; कामाच्या - मजुरीच्या शोधात केलेली ही पायपीट मन हेलावून टाकणारी आहे.

वडिलांचं एका ठिकाणी बस्तान कधीच बसलं नाही! 'विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर' अशा रीतीनं झालेलं सततचं स्थलांतर, कायमची वणवण-धडपड, त्यात आलेले भले-बुरे अनुभव या कादंबरीत शब्दबद्ध झाले आहेत. 

संघर्ष आयुष्यात कोणालाच सुटत नाही पण त्याची 'जात' वेगवेगळी असते; त्याचा पोत निरनिराळा असतो! साध्या खर्चटण्यालाही घाव म्हणण्याची सध्या मानसिकता झाली आहे! -अशावेळी लेखकाच्या व त्याच्या कुटुंबियांच्या तनामनावर झालेल्या या खोल जखमा संवेदनशील मनाला निश्चितच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. 

बालवयातच करावी लागलेली काबाडकष्टांची कामं, शिक्षणासाठी जपावा लागलेला 'कमवा व शिका' हा मंत्र... तरीही अधेमधे शिक्षणात पडलेला खंड आणि त्यातूनही याच्या त्याच्या प्रोत्साहनानं आणि वेळप्रसंगी आजीच्या कानउघाडणीनं शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा येणं.... हे सर्वच प्रसंग लेखकाच्या जिद्दीची साक्ष देतात.

अतिशय बिकट परिस्थितीत सहावीपर्यंत शिक्षण घेणारे भाऊ (वडील), त्यांच्या आई वडिलांचा- भावा-बहिणींच्या मोठा परिवार होता. त्यामुळे मध्येच शाळा सोडून शेती कामाला लागणारे भाऊ...!

पण असं असलं तरीही शिक्षणाचं महत्त्व ते जाणून होते. त्यांनी पुढील आयुष्यात लेखकाच्या शिक्षणाला कधीच विरोध केला नाही; किंबहुना कशालाही विरोध न करण्याचा, खाली मान घालून सतत कष्ट करण्याचा त्यांचा स्वभावच होता. असे हे भोळेसांब वडील (भाऊ). आणि आई मात्र कडकलक्ष्मी! दोघेही काहीसे भिन्न स्वभावाचे. पण आपल्या कुटुंबासाठी वाटेल त्या खस्ता खात, गावोगावी मजुरीसाठी सतत भटकंती करत चार मुली आणि दोन मुलांचं संगोपन करणारी ... त्यांची आयुष्यं उभी करणारे भाऊ आणि बाई - उत्तम आई-वडिलांचा नमुना आहेत. लेखक म्हणतात 'माझे बाबा सालगडी होते, पण जगातले बेस्ट बाबा होते!' 

अन् या बाबानं आपल्या मुलांचं आयुष्य आपल्यासारखं मातीत जाऊ नये म्हणून एक दिवस बापूचं- लेखकाचं नाव शाळेत घातलं होतं.

१९७२ सालच्या भीषण दुष्काळातच लेखकाचा जन्म झाला. दुष्काळात खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होते. घरात जे असेल ते सर्वजण घास घास वाटून  खात होते, फाटके ठिगळ लावलेले कपडे घालत होते. 'काळाच्या धगीनं कोणालाच सोडलं नव्हतं'... आणि शेवटी गावात भागत नाही म्हणून भाऊनं आपलं मूळ गाव आंबळे -आनोसेवाडी सोडून मांडवगण- फराटा या गावी कुटुंबासह जात साल धरलं. लेखक म्हणतात या काळात आम्हाला आमच्या खिल्लारी गायीनं वाचवलं. 

भाऊंनी मांडवगडहून पुन्हा स्थलांतर करत बुर्के गाव गाठलं! तिथून राहू- दुबेवाडी, येथेही कुटुंबाची 'गढी' चांगली बसेना म्हणून वर्ष दीड वर्षानंतर येथून माधव नगर या ठिकाणी गुऱ्हाळावर कामासाठी पुन्हा स्थलांतर करणं आलं! 

मागच्याच यातना भोगण्यासाठी परत पाठीवरचे बिऱ्हाड...पुन्हा नवीन डाव... असं चालू होतं! 

गुऱ्हाळावर अनेक गावातून समदु:खी लोकं दुष्काळाला कंटाळून जगण्यासाठी गाव सोडून आलेली; गरिबीतही माणुसकी जपणारी माणसं! जालिंदरचं गुऱ्हाळावरच त्याच्याच गावातील तरुणीशी झालेलं लग्न. लग्नात वेगवेगळ्या गावचे- जातीधर्माचे गुऱ्हाळावरील मजूर वऱ्हाडी म्हणून होते. 

लेखक म्हणतात 'गुऱ्हाळ म्हणजे आदर्श समाज व्यवस्थेचा नमुना होय'.

माधव नगरच्या बिनभिंतीच्या शाळेत लेखकाचं सुरुवातीचं शिक्षण झालं. वाण्याच्या गोठ्यात शाळा भरत होती, पण शिक्षण महत्त्वाचं होतं! ते दिवस आठवले की लेखक आजही बेचैन होतात. त्या चुकल्या चुकल्या वाताहतीच्या आयुष्याला सावरण्यासाठी त्यांना पुढे कित्येक वर्षे लागली. 

उपजीविकेसाठी अनेक गावं धुंडाळून झाल्यावर अखेर 'मुलांच्या शिक्षणासाठी गावीच राहा' या म्हाळस्करांच्या सल्ल्यानं भाऊ आपल्या कुटुंबासह आपल्याच गावी राहायला आले. 

काम करणारी, कष्ट उपसणारी माणसं सगळीकडेच हवी असतात... बापूशेठ फटफटीवरून भाऊंना पुन्हा गुऱ्हाळावर कामासाठी ये म्हणून विनवायला गावी आले! पण भाऊंनी आपला निर्णय बदलला नाही. आजोबांनी विकलेली जमीन पुन्हा विकत घेतली, तित विहीर खोदली.'ही काळी आई आपल्याला पुन्हा माणसात बसवील' अशी त्यांना आशा होती!- शेतकरी प्रचंड आशावादी होता; तसा आजही आहेच! शेतात मेहनत करायची. नांगरणी, वखरणी, पेरणी, कुळवणी, निंदणी ...शेतीची सर्व मशागत करत निसर्ग साथ देईल या अपेक्षेनं आकाशाकडे डोळे लावून बसायचं हे मात्र कायमचंच!- पण निसर्गच तो!- लहरीपणा हा त्याचा मूळ स्वभाव; दिलं तर भरभरून देईल, नाहीतर दुष्काळ!

पुन्हा १९८१ सालचा दुष्काळ, आणि यावेळीही दुष्काळाच्या धगीनं  कोणालाच सोडलं नव्हतं. त्यातचं लेखकाचा हात मोडणं, शाळा बंद होणं, पुन्हा कुटुंबाचं पोटासाठी वणवण फिरणं. 

भाऊंनी रामलिंग'ला एका शेठच्या शेतावर दोन महिने राबून सुद्धा त्यानं मजुरी न देता फुकट राबवून घेणं! अशा सगळ्या बऱ्या वाईट अनुभवातून आयुष्य रडत रखडत पुढे सरकत होतं. 

गावी शेती करताना सुगी असले की शेतावर राहायचं, सुगी संपली की गावात वस्तीवर राहायला यायचं. - - -लेखकांनं त्या काळातल्या गावच्या जीवनाचं सुंदर चित्र इथे उभं केलं आहे... ईर्जिक पद्धतीनं शेती केली जायची. लोक एकमेकांना आधार देत जगत होते. शेतीच्या कामात कुुचराई नव्हती! पहाटे कोंबडा आरवायलाच लोक शेतात कामाला जायचे.

कादंबरीत ग्रामीण भागाचं वर्णन करतानाच शेती व्यवसायाशी निगडित शब्द काढणी, खळं, मळणी, पाथ मधे मधे आल्याने तसंच पशुधनाचं वर्णन आल्यानं पोषक वातावरण निर्मिती होण्यास मदत होते. 

कष्ट करून पिकवलेल्या धान्यावर गावातील बारा बलुतेदारांचाही त्यांच्या त्यांच्या मगदूराप्रमाणे वाटा होता. 'समाज व्यवस्थेने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला होता'. 

'पूर्वीच्या लोकांना लई माया होती, तहानलेल्याला पाणी अन भुकेल्या माणसाला अन्न देण्याची दानत होती. गावातील लग्न कार्यात सर्व नाती आनंदात व उत्साहात न्हाऊन निघायची. सहकार्याचे बाळकडू घरातूनच मिळायचं. 

लेखक अधेमधे पूर्वीच्या काळातील माणुसकीच्या ओलाव्याची आणि वर्तमानातील कोरड्या व व्यवहारी जीवनाची वास्तव तुलना करतात.

स्वाभिमानी आणि कष्टाळू असलेला लेखकाचा मोठा भाऊ- अण्णांबद्दल लेखक लिहितात, 'अण्णा देखील इकडे तिकडे साल धरत संसाराचा गाडा ओढत होता, कामचुकार म्हटल्याच्या रागातून स्वाभिमानी आणि प्रामाणिक अण्णांनी मालकाच्या कानशिलात लगावली होती! आम्ही गरीब नक्की आहोत पण लाचार नाही ही त्याची भूमिका होती.

लेखकाच्या बहिणी आणि त्यांचे ओढगस्तीचे तथा सासुरवासाचे संसार याचंही वर्णन लेखकांनं केलं आहे. त्यातल्या त्यात मुंबईत झोपडपट्टीत राहणाऱ्या बहिणीचा- मेव्हण्यांचा लेखकाला मोठा सहारा झाला. सुट्टीच्या कालावधीत बापू मुंबईला धाव घेत असे. मेव्हण्याच्या साथीने आणि मदतीने त्यानं भाजी विकायचा व्यवसाय सुरू केला. त्यातून शिक्षणाला आणि घराला हातभार लागत असे. 

मुंबईहून बापूनं पाठवलेल्या पत्राचं गावी भाऊकडून सामूहिक वाचन होत असे, आणि सर्व कुटुंबीय हमसून हमसून रडत असत. तो काळ भावनांच्या आवेगाचा होता; नात्यातला जिव्हाळा जिवंत होता, पैशानं माया ममतेवर अद्याप मात केली नव्हती! 

असे अनेक मायेन ओथंबलेले प्रसंगही कादंबरीत आलेले आहेत. 

लेखक पुढे म्हणतात १९८९साली  जीवनात एक वेगळीच क्रांती आली!सातवीत असताना पहिली कविता लिहिली. शाळेत सर्वांनाच ती आवडली. लेखकाला अभिव्यक्तीचं साधन प्राप्त झालं. 

लेखक दहावीत असताना खासदार मोरे साहेबांच्या सांगण्यावरून भवरीलाल शेठनं वह्या पुस्तकांची व्यवस्था केली. शिक्षणासाठी मोरे साहेबांसह अनेकांनी मदत केली, अनेक मित्रांनी ऊर्जा दिली. 'जगात देव आहे की नाही... पण देवासारखी माणसं आहेत' यावर त्यांचा विश्वास बसला. 

डीएड करायचं स्वप्न हुकल्यानं लेखकानं 'मांजरी कृषी विद्यालया'त प्रवेश घेतला. आणि त्या कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर लेखकांनं स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ग्रामसेवकाची सरकारी नोकरी हस्तगत केली. 

भाऊ म्हणाले, "बापू आजपासून तुझी डोक्यावरची पाटी गेली!" 

लेखकानं मांडलेला जीवन संघर्ष खराखुरा आहे, कुठेही लपवाछपवी नाही. नात्यातले भावबंध; मैत्रीतले अनुबंध हे जसेच्या तसे अवतरले आहेत. 

कुटुंब जगवण्यासाठी वडिलांनी या गावाहून त्या गावी साल धरत घातलेले 'हेलपाटे', आईनं खाल्लेल्या खस्ता हृदय फिरवटून टाकणाऱ्या आहेत.

बापूंनं शिक्षणासाठी केलेली धावाधाव, कामाची लाज न धरता आणि कष्टाची तमा न बाळगता आपली वाट आपणच तयार करणं, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि अगम्य विश्वासाच्या जोरावर आयुष्याची दिशा शोधणं...आणि या साऱ्या प्रतिकूलतेतून जोरदार मुसंडी मारत बळ एकवटून बाहेर पडणं...

हे सर्वच मुळापासून वाचण्यासारखं आहे.

 जोपर्यंत आपल्या जगण्यात काही उणिवा आहेत त्याची जाणीव आपल्याला होत नाही; त्या जाणिवेनं आम्ही अस्वस्थ होत विचार करत नाही, तोपर्यंत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आम्हाला सापडत नाही! 

ही अंतर्मनातली अस्वस्थताच माणसाला विकासाकडे नेते, अधिक प्रगल्भतेकडे झुकवत उन्नत करते.

-लेखकही या सर्व प्रक्रियेतून तावून-सुलाखून निघत यशस्वी झाला आहे यात वाद नाही.

कादंबरी : हेलपाटा

लेखक :  तानाजी धरणे

प्रकाशन : पी आर ग्रुप आॅफ पब्लिकेशन वरुड , अमरावती

पृष्ठे : 144

मूल्य :225

परीक्षण   :   प्रा. किसन वराडे, अंबरनाथ, (मुंबई)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या