सकाळी रिकाम्या पोटी अंघोळ फायदेशीर आहे की नाही? तुम्हालाही ही सवय असेल तर जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान

 

सकाळी रिकाम्या पोटी अंघोळ फायदेशीर आहे की नाही? तुम्हालाही ही सवय असेल तर जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/10/2026 :

Bathing On Empty Stomach In Morning: सकाळी रिकाम्या पोटी अंघोळ करण्याचे फायदे, तोटे आणि काय काळजी घ्यावी जाणून घ्या.

*Bathing On Empty Stomach In Morning:* सकाळी उठल्यानंतर अंघोळ करणे ही अनेकांच्या रोजच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग असतो. भारतात सकाळी रिकाम्या पोटी अंघोळ करण्याची पद्धत अनेक वर्षांपासून आहे. सकाळी अंघोळ केल्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते, आळस दूर होतो आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने करता येते. मात्र, रिकाम्या पोटी अंघोळ केल्याने खरंच आरोग्याला विशेष फायदे होतात का? तसंच, काही लोकांसाठी ही सवय त्रासदायक ठरू शकते का? तर याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

*सकाळी रिकाम्या पोटी अंघोळ करण्याचे ५ फायदे*

- *१. शरीराचा आळस होतो दूर:* रात्रभर झोपल्यानंतर सकाळी शरीर सुस्त वाटू शकते. अशा वेळी अंघोळ केल्याने ताजेतवाने वाटते आणि झोपेचा आळस कमी होण्यास मदत होते. पाण्याच्या तापमानानुसार शरीराला आरामदायी किंवा उत्साही वाटू शकते. त्यामुळे दिवसाची सुरुवात अधिक प्रसन्नपणे करता येते.

- *२. मन प्रसन्न राहण्यास होते मदत:* सकाळी अंघोळ केल्याने मनाला ताजेतवाने वाटू शकते. दिवसभरातील कामांची सुरुवात करण्यापूर्वी अंघोळ केल्यामुळे काही जणांना मानसिक शांतता आणि एकाग्रता अनुभवायला मिळते. मात्र, रिकाम्या पोटी अंघोळ केल्यानेच ताण कमी होतो, असे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.

- *३. त्वचेची स्वच्छता राखली जाते:* रात्री झोपताना शरीरावर जमा झालेला घाम आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यासाठी सकाळी अंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. नियमित स्वच्छतेमुळे शरीर ताजेतवाने राहते. मात्र, त्वचा कोरडी पडत असल्यास खूप गरम पाणी आणि जास्त वेळ अंघोळ करणे टाळावे. 

- *४. रक्ताभिसरणावर होऊ शकतो परिणाम:* कोमट पाण्याने अंघोळ केल्याने रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो आणि शरीराला आराम मिळू शकतो. मात्र, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी अंघोळ करणे आवश्यक नाही. तसेच, खूप गरम किंवा अतिथंड पाण्यामुळे काही व्यक्तींना अस्वस्थ वाटू शकते. 

- *५. दिनचर्या राहते शिस्तबद्ध:* सकाळी ठराविक वेळी अंघोळ करण्याची सवय लावल्याने दिवसाची सुरुवात व्यवस्थित करता येते. वैयक्तिक स्वच्छता राखण्यासोबतच कामांचे नियोजन करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. 

*रिकाम्या पोटी अंघोळ केल्याने केसगळती थांबते, वजन कमी होते? काय आहे सत्य!*

सकाळी उपाशीपोटी अंघोळ केल्याने केसगळती थांबते, वजन झपाट्याने कमी होते किंवा डोळ्यांची दृष्टी सुधारते, असे अनेक दावे केले जातात मात्र, या दाव्यांना ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. केसगळतीची कारणे पोषणातील कमतरता, हार्मोन्समधील बदल, आनुवांशिकता किंवा काही आजार असू शकतात. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप महत्वाची असते. केवळ रिकाम्या पोटी अंघोळ केल्याने या समस्या दूर होत नाहीत. 

*सकाळी रिकाम्या पोटी अंघोळ करण्याचे तोटे कोणते?

- *१. चक्कर येण्याची शक्यता:* काही व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर रक्तदाब कमी होणे, डिहायड्रेशन किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी होणे यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो. अशा वेळी खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास चक्कर येण्याची किंवा अस्वस्थ वाटण्याची शक्यता वाढू शकते. मधुमेह असलेल्या आणि रक्तातील साखर कमी करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. 

- *२. थंड पाण्यामुळे वाढू शकते अस्वस्थता:*  हिवाळ्यात अतिथंड पाण्याने अंघोळ केल्यास काही लोकांना कंप सुटणे, श्वास वेगाने घेणे किंवा अस्वस्थ वाटणे असे त्रास होऊ शकतात. हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अचानक अतिथंड पाण्याचा संपर्क टाळणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. 

*३. आधीपासून अशक्तपणा असल्यास त्रास:* रात्रभर पुरेसे पाणी न पिणे, आजारपण किंवा दीर्घकाळ उपाशी राहणे यामुळे काही व्यक्तींना सकाळी थकवा जाणवू शकतो. अशा वेळी अंघोळ करताना चक्कर येत असल्यास ती त्वरित थांबवावी आणि सुरक्षित ठिकाणी बसावे. 

- *४. कमी रक्तदाब असणाऱ्यांनी घ्यावी काळजी :* कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींना खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर चक्कर येऊ शकते. त्यामुळे कोमट पाणी वापरणे, अंघोळीच्या वेळी सावध राहणे आणि गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 

*मग सकाळी अंघोळ करताना कोणती काळजी घ्यावी?*

- *कोमट पाण्याचा वापर करा:* हिवाळ्यात अतिथंड किंवा खूप गरम पाणी टाळा.

- *शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या:* चक, घाम येणे, थरथर किंवा अशक्तपणा जाणवल्यास अंघोळ थांबवा. 

- *गरज असल्यास आधी कांहीतरी खा:* उपाशीपोटी अशक्तपणा जाणवत असेल, तर सुरक्षितपणे बसून हलका नाश्ता घ्या. मधुमेह असल्यास रक्तातील साखरेनुसार डॉक्टरांनी सांगितलेले उपाय करा. 

- *अंघोळ करताना घाई करू नका:* विशेषतः वृद्ध व्यक्तींनी आणि तोल जाण्याची समस्या असलेल्यांची काळजी घ्यावी. 

- *आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या:* हृदयविकार, कमी रक्तदाब किंवा वारंवार चक्कर येण्याची समस्या असल्यास वैयक्तिक सल्ला घेणे योग्य ठरते. 

*रिकाम्या पोटी अंघोळ करावी की आधी नाश्ता करावा?*

सर्वसाधारणपणे निरोगी व्यक्तींना सकाळी रिकाम्या पोटी अंघोळ करण्यात काही विशेष अडचण नसते. अंघोळीपूर्वी खाणे आवश्यक आहे, असा नियमही नाही. मात्र, उपाशीपोटी अशक्तपणा किंवा चक्कर येत असल्यास आधी त्या समस्येचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

अंघोळीची वेळ किंवा पोट रिकामे असणे यापेक्षा पाण्याचे योग्य तापमान, शरीराची स्थिती आणि वैयक्तिक आरोग्य यांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या शरीराला काय अनुकूल आहे. हे लक्षात घेऊनच सकाळची दिनचर्या ठरवा.

संकलन : यशवंत वाघ 

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या