एनसीएमसी कार्डात कोल्हापूर पाचव्या स्थानी, राज्यात प्रथम क्रमांक कोणत्या विभागाचा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/9/2026 :
एसटीच्या 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (एनसीएमसी कार्ड) काढण्यात पुणे विभागात कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर आहे. पुणे विभाग सर्वात आघाडीवर असून ७ लाख १३ हजार ८६६ कार्ड प्रवासी वापरत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सोलापूर विभाग असून ५ लाख ४९ हजार ६४७, तिसऱ्या क्रमांकावर सातारा विभाग असून ४ लाख ९० हजार १९४ आणि चौथ्या क्रमांकावर सांगली विभागात ३ लाख ६३ हजार ४५३ कार्ड वापरली जात आहेत. तर कोल्हापूर विभागात ४ लाख ३८ हजार ३८८ कार्ड प्रवासी वापरत आहेत.
एनसीएमसी कार्ड म्हणजेच 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' देशातील विविध सार्वजनिक वाहतुकीसाठी आणि कॅशलेस व्यवहारांसाठी वापरले जाणारे एक ‘ऑल-इन-वन’ प्रीपेड किंवा डेबिट स्मार्ट कार्ड आहे. केंद्र सरकारच्या 'एक देश, एक कार्ड' या संकल्पनेवर आधारित आहे.
याद्वारे तुम्हाला तिकीट काढताना सुटे पैसे किंवा रोख रक्कम बाळगण्याची गरज भासत नाही. मशीनवर फक्त कार्ड टच करून तिकीट काढता येते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ एप्रिलपासून या कार्डची घोषणा केली. विविध अडचणींचा सामना करावा लागल्याने त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून सुरू झाली.
कार्ड कोणासाठी
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांसाठी ५० टक्के सवलत, ६५-७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के सवलतीसह मासिक पास आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्ता १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत पास आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.
राज्यात छत्रपती संभाजीनगर विभाग प्रथम
एसटीचा छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या विभागात ३० लाख ३१ हजार ७७ जणांनी या कार्डची नोंदणी केली. तर २६ लाख ४५ हजार ७६६ जणांना ही कार्डे देण्यात आली. या विभागात बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी विभागाचा समावेश आहे.
सव्वा कोटी प्रवाशांची नोंदणी
राज्यात या कार्डसाठी १ कोटी २५ लाख ६४ हजार १२७ कार्डची नोंदणी झाली. पैकी आजअखेर १ कोटी ७ लाख १५ हजार ९१ कार्ड देण्यात आली.
पुणे विभाग आकडेवारी
कोल्हापूर : ४ लाख ३८ हजार ३८८
सांगली : ३ लाख ६३ हजार ४५३
सातारा : ४ लाख ९० हजार १९४
सोलापूर : ५ लाख ४९ हजार ६४७
पुणे : ७ लाख १३ हजार ८६६
राज्यातील प्रमुख सहा विभागांतर्गत एनसीएमसी कार्डची नोंदणी, वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. नोंदणी आणि वितरण प्रक्रियेत काही बदल केले आहेत. - अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी
≈==================
0 टिप्पण्या